Pune Rains : टेकडीफोड आणि अनधिकृत बांधकामांचा फटका

गुरूराज सोसायटी, पद्‌मावती - पुराने वाहनांची झालेली अवस्था.
गुरूराज सोसायटी, पद्‌मावती - पुराने वाहनांची झालेली अवस्था.

मांगलेवाडी, भिलारीवाडीच्या पुढच्या भागात बहुतांश ठिकाणी अनधिकृत बांधकामे झालेली दिसतात. कोणत्याही डोंगर उतारावर बांधकामांना परवानगी नाही; पण टेकड्या फोडल्या आहेत. त्यामुळे आंबिल ओढ्याला येऊन मिळणारे नैसर्गिक जलस्रोत बंद झाले आहेत, नैसर्गिक प्रवाहात अडथळे आले आहेत.

‘प्रत्येक नैसर्गिक स्रोताची पाणी वाहून नेण्याची एक क्षमता असते, त्यापेक्षा जास्त पाणी त्यात आल्यास स्वाभाविकपणे ते पाणी मागे फिरणार. आंबिल ओढ्याबाबत बुधवारी रात्री नेमके तेच झाले. अनधिकृत बांधकामे, नैसर्गिक प्रवाहात टाकलेला राडारोडा आणि टेकडीफोड यामुळे आंबिल ओढ्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता संपली आणि ते पाणी मागे फिरून वाट मिळेल तिथून बाहेर पडू लागले.

आंबिल ओढ्याचा उगम हा कात्रजच्या घाटातून आहे. सिंहगड- भुलेश्‍वर डोंगरांची ही रांग आहे. त्यात भिलारेवाडी, मांगलेवाडी, गुजर- निंबाळकरवाडी हे या ओढ्याचे पाणलोट क्षेत्र. आंबिल ओढ्याच्या फक्त ओढ्याकडेच आजपर्यंत बघितलं जातं, त्यातसुद्धा फक्त कात्रजच्या तलावापासून सुरू होणाऱ्या ओढ्याच्या भागावरच भर असतो; पण हा आंबिल ओढ्याचा फक्त ५० टक्के भाग आहे. या भागात आपण ओढ्याच्या दोन्ही कडेला भिंती घातल्या, त्याला प्रवाही ठेवण्यासाठी नाला काढून दिला. भिलारेवाडी आणि गुजर- निंबाळकरवाडी हा डोंगराळ भाग आहे. याची समुद्र सपाटीपासूनची उंची सुमारे एक हजार मीटर आहे. त्या उंचीवर आंबिल ओढा उगम पावतो. हा ओढा वाहत मुठा नदीला जिथे मिळतो त्याची उंची समुद्र सपाटीपासून ५२५ मीटर आहे, त्यामुळे उगम आणि नदीला मिळतो त्यात सुमारे ५०० मीटर उंचीचा फरक पडतो.

मांगलेवाडी, भिलारीवाडीच्या पुढच्या भागात बहुतांश ठिकाणी अनधिकृत बांधकामे झालेली दिसतात. टेकड्या फोडल्या आहेत. त्यामुळे आंबिल ओढ्याला येऊन मिळणारे नैसर्गिक जलस्रोत बंद झाले आहेत, पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे आले आहेत. ‘सर्वे ऑफ इंडिया’ने १९७१ मध्ये केलेले सर्वेक्षण आणि आता यात मोठा फरक पडला आहे. अनधिकृत बांधकामे हे त्यामागचे मुख्य कारण आहे. या बांधकामांमुळे ओढ्याला येऊन मिळणारे हे प्रवाह तोडले गेले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.  नैसर्गिक प्रवाहात अडथळे आल्याने गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पाण्याला जशी वाट मिळेल, तसे ते वाहू लागते.

बुधवारी रात्री राजस सोसायटीजवळही पाणी शिरल्याची घटना घडली. आंबिल ओढ्याचा पश्‍चिम भाग हा उतारावर आहे. पण, येथे झालेल्या बांधकामांमुळे हा पाण्याचा प्रवाह पूर्णतः अडविण्यात आला आहे, त्यामुळे येथून पावसाचे पाणी पुढे जाऊ शकत नाही. भिलारेवाडी ते कात्रजच्या नवीन तलावापर्यंत पावसाच्या पाण्याने हा तलाव भरला जातो, त्यानंतर हे पाणी परत फिरायला लागते.

चिखल का झाला?
पाणी नैसर्गिकपणे वेगाने वाहताना स्वतःबरोबर काही गाळ वाहून आणत असते. पण, पाणी वाहून जाणाऱ्या नैसर्गिक स्रोतांमध्ये मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकलेला आहे. त्यामुळे पाणी वाहत असताना हा राडारोडाही बरोबर घेऊन वेगाने वाहते. पाणी शिरलेल्या सोसायट्यांमध्ये इतक्‍या मोठ्या प्रमाण चिखल का झाला, याचे उत्तर यात मिळते. सांडपाणी वाहून घेऊन वाहिन्यांमधून पाणी वाहणे अपेक्षित असते. पण, त्या बंद झाल्याने मॅनहोलमधून पाणी बाहेर येऊ लागल्याचे दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com