माय आणि साय; आई बोलली "हे बघ आयुष्य हे या दूधाच्या पेल्यासारखं असतं बघ''

पूर्वा गोडसे
रविवार, 8 डिसेंबर 2019

अंधाऱ्या खोलीत बाळंतपनाच्या कळा सोसत एक पहिलटकरिन बिछान्यावर पहुडली होती. गरम पाणी, ब्लेड, कापूस आणि सुईन या भोवऱ्यात ती स्वतःला समजावत होती. कधीतरी जन्म होईल इवल्याशा जीवाचा... 

तांबडया मातीचा धुराळा उडवत एक गाडी गावात येत होती. थंडीचे दिवस होते. संध्याकाळ प्रियकराला भेटायला गेलेल्या प्रेयसीसारखी गुलाबी झाली होती. छोटी छोटी कौलारू घर, हिरवी हिरवी शेती, शेकोटी भोवती बसलेली माणसं, जगाची कसलीच फिकीर नसणारी शेंबड्या पोरांमुळे गाव भरल्यासारखं वाटत होतं.  

गाडीत बसलेल्या आईची मात्र घालमेल चालली होती. भरल्या गावात पोकळी जाणवत होती.
कस होणार पोरीचं?  एकतर पहिलीच वेळ, त्यात ही अति नाजूक. झेपेल का तीला बाळंतपण?? साधी विळी कापली तर आकंडताडव करून घर डोक्यावर घेणारी ही. एका नव्या जीवाला जन्म द्यायला जाणार. इतक्यात गाडी घराजवळ आली. 

सोफ्यामध्ये पाहुणे राऊळी बसले होते. सगळ्यांचे डोळे त्याच प्रतीक्षेत होते. काय होणार?  मुलगा की मुलगी?? 

सुईन बाहेर आली. जिलेबी द्या, जिलेबी... मुलगी झाली. पहिली बेटी धनाची पेटी.
आईच्या चेहऱ्यावर चांदणे पसरले. घरातील म्हाताऱ्या कोताऱ्यांचा जरासा हिरमोड झाला खरा. पण नव्या आईच्या गोड हसण्यामुळे तो मावळला.
त्याच अंधाऱ्या खोलीत आता नवजात बाळामुळे प्रकाश पसरला. 

छोटी छोटी कपडे, बाळाला अंघोळ घालताना होणारी धावपळ, दृष्ट काढते वेळेचा वास आणि पदराखाली बिनधास्त झोपलेले बाळ. सगळं कस मोहून टाकणार. 

खरी तृप्ती, खरं समाधान जर कुठं असेल. तर बाळ होऊन आईच्या कुशीत जाण्यात. तो आनंद उभ्या आयुष्यात कधीच मिळत नाही. 

रंगीबेरंगी फुलाफुलांचा फ्रॉक घालून ती पोर घरभर नाचत होती. चिमुकल्या पायावर पैंजण आले. ग म भ न ने घर निनादु लागले.  

थोड्या वर्षांनी तिच्या आयुष्यात एक वेगळा अनुभव आला. निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार. ती वयात आली. समाजाचे बंधन आले. तिचे मन मात्र फुलपाखरू झाले होते.

किती कटकटी आहे हा समाज,  गंभीर तोंड चौकोनी करून म्हणतो कसा, "आता मोठी झालीस, हसणं कमी कर, पुरुषांशी बोलणं कमी कर, हा मित्र कोण? बास झाला अभ्यास, कुठं कलेक्टर होणार आहेस, कपडे असे का?  जास्त फ्रॅंक नको वागत जाऊ. अजुन बाई तुला माणसंच ओळखता नाही येत, लग्न झालं पाहिजे आता. 

अरे, यातली  एकही गोष्ट माहित नसताना. नुसता चिखल पेरत असतो हा समाज.. ती जाऊदे या चिखलातच कमळ म्हणून राहायचं आहे. या सगळ्या गोंधळात तिची आई तिच्याबरोबर होती. मनाप्रमाणेच कर. पण नीतिमत्ता सोडू नकोस. 

जे अयोग्य वाटत तिथं न कचरता बोल. तत्वाज्ञान वाटेल तुला. पण यावरच तू तगु शकशील.
आभाळाची छबी माझ्या मनी गं 
केवड्याचा सुगंध माझ्या तनी गं
रंगावे साऱ्या जगात गं पण 
अंतरंगीचा रंग निराळा ठेवावा जपून गं...

चारोळी सुचताना मन लक्ख चांदण्यानी भरून येई तिचे.

आता लग्नासाठी स्थळं येऊ लागली. पोहे, चहा, प्रश्न आणि उत्तरे (कधीच न मिळालेली) सगळं सुरु झालं. एक मुलगा सगळ्या घरच्यांना पसंद आला. तिला कोणी विचारलं नाही. आवडतो का म्हणून? मोठ्यांनी काही दिवसात लग्न उरकून टाकायचं ठरवलं. ती पण निमूटपणे गप्प बसली. घरचे आपलं चांगलंच बघणार. कशाला विनाकारण मध्ये बोला म्हणून.

रात्र झाली. गाव निद्रादेवीच्या अधीन झालं. रेडिओवर जुन्या गाण्याची मैफिल रंगली होती.
गोधडीत ती पडून होती. 

इतक्यात रेडिओ बंद झाला. तिने वर बघितलं. तिची आई तिथे उभी होती. हातात दुधाचा पेला घेऊन.
तिला एक प्रश्न सारखा पडत होता. सगळ्यांच करते आई. खूप दमते. तरीही तिचा चेहरा एवढा समाधानी कसा?? तिच्या चेहऱ्याकडे बघून मनामध्ये काहीतरी उजळल्यासारखं वाटंत. 
आई आली तिच्यापाशी. डोक्यावरून हात फिरवत विचारत होती.
"मला माहित आहे तुला दाढी असणारी मुलं नाही आवडत"
आणि हसू लागली.
तिला पहिलं समजेना ती काय बोलत आहे. पण नंतर कळलं की ती स्थळाविषयी बोलत आहे. ती पण मग हसू लागली. 
"खरंच कसं कळत असावं हिला आपल्या मनातलं?? 

आई बोलली "हे बघ आयुष्य हे या दूधाच्या पेल्यासारखं असतं बघ. त्यात मग क्लेश आले, दुःख आलं, त्यातून होणाऱ्या जखमा आल्या, अपेक्षाभंग आला तसंच सुख आलं, एखादा दृष्ट काढण्यासारखा क्षण आला, समाधान आलं. आता या सगळ्याची उकळी फुटून हे आयुष्य बनंत असतं. मग जशी उकळी फुटते दुधाला अगदी तसंच मनात अनेक विचारांचा गोंधळ माजतो. मग उतू जात आयुष्य. त्यावेळी विचलित होतो माणूस. योग्य अयोग्य, चांगलं वाईट एकाच तराजूत तोलतो. 

आणि खरी फरफट तिथून सुरु होते. गफलत होते आपली. आपण मुळ काय आहोत हेच विसरतो. दहा तोंडाचा विचार करता करता आपलं एक मन विसरतो. 

ती घाईघाईत बोलली मग "पण या सगळ्याला उत्तर काय"?? 

आईने स्मितहास्य दिले आणि बोलली "साय"... 

म्हणजे??  ती. 

जेव्हा दूध शांत होतं. तेव्हा त्यावर साय येते आणि सगळ्या उकळत्या दुधाला संरक्षण मिळते. 

अगदी तसंच सगळ्या उकळत्या घालमेलीची उत्तर शांत झाल्यावर मिळणाऱ्या अनुभूतीच्या सायीत आहे...

तिच ती अंधारी खोली होती. जिथं पहिला आईला प्रसवयातना होत होत्या. तिथंच मुलीला बुद्धीच्या, मनाच्या यातना होत होत्या. आणि त्यातूनच नवीन अधिक स्पष्ट विचार जन्माला येणार होते.

आणि पेल्यातील दुधावर गोड साय पसरली होती...

इतर ब्लॉग्स