पैलवान असाच घडत न्हाय..! 

सचिन सकुंडे 
Tuesday, 14 January 2020

...सलामी झडते...आणि गावच्या कोण्या यात्रेतल्या फडात कुस्ती सुरू होते...तांबड्या मातीत दोन तुल्यबळ मल्ल परस्परांच्या ताकदीचा अंदाज घेत एकमेकांना पार येरबटून काढतात. कुस्तीशौकिन टाचा उंच करत गर्दीतून कुस्ती बघायला लागतात. दात ओठात खोल रोवत ते "अचानक वस्तादं'ही होतात...

बाभळीचा काटा जीभेखाली दाबणारं हे धनगराचं पोर हाय...बघा कशी लखाखती बॉडी हाय...आर कशाला पायजेलय धन- दौलत, ईस्टेट..कशाला पायजेल बॅंकेत पैसा... ही ही खरी संपत्तीय... आन त्यासाठी रोज 500 सपाट्या आन हजारभर दंड-बैठका मारतोय ह्यो पठ्ठ्या...न्हायतर तुमच्या- आमच्या मांड्या म्हंजी निस्त्या कुळवाच्या दांड्या... समालोचक पुढे बोलत रहातात... 

".... आणि पटाला हात घातलेलाय...' 
ये शाब्बास...हालगीवाले वाजवा... उपमहाराष्ट्र केसरी चंद्रकांत सूळ यांचा लाडका पठ्ठ्या ... विकास सूळने' मैदान मारलेलं आहे..! "समालोचक निकाल जाहीर करतात...' 

श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या कुस्तीपश्‍चात एकच जल्लोष सुरू होतो. 
ढंगडांगटकडांग हालगी घुमते. पण, विकास मैदानात जास्त वेळ न थांबता थेट त्याच्या व्हॅनमध्ये जाऊन बसतो. काही लोक मग त्याला अक्कडबाज वगैरे समजू लागतात. पण, विकास असाच आहे. खेळ एके खेळ. त्याला खेळ सोडून दुसरे काहीच माहीत नाही. अर्जुनाला जस पक्ष्याच्या डोळ्याशिवाय काही दिसायचं नाही, तसच विकासला कुस्ती खेळाशिवाय आपल्या आसपास काही दिसत नाही. त्याचा ध्यास, श्वास आणि आस कुस्तीच आहे. व्यायाम, आहार, विश्रांती हीच त्याची दैनंदिनी आहे..! आणि तसही तो ज्या कुटुंबातून पुढे आलाय ते सूळ कुटुंब संपूर्ण राज्यभर पहिलवानांचं कुटुंब म्हणून ओळखलं जाते. 
कळत्या वयापासून या कुटुंबातल्या प्रत्येक पोराच्या रक्तात कुस्ती भिनवली जाते. कुस्तीचे बाळकडू या कुटुंबाच्या संस्काराचेच बीज आहे. त्यांच्या घरातील आयाबायांनाही कुस्तीबद्दल चोख ज्ञान आहे. कुस्तीतला डाव-प्रतिडावंही तोंडपाठ आहे. अगदी फलटणमधील त्यांच्या खडकी या गावात स्त्रियाही कुस्त्या बघायला मैदानात जाऊ शकतात. इतकं गावचं वातावरण पुढारलेलं आहे. 

पहिलवानकीचे बीज या सूळांच्या काळ्याकभिन्न तांबड्या मातीत पेरलेल्या आदिबीजाचं नाव म्हणजे मारुती सूळ आणि पुढे त्याच तांबड्या मातीचा भंडारा कपाळी लावत मारुती सूळ यांचा पुतण्या 
चंद्रकांत सूळ आणि त्यांच्या भावंडांनी कुस्तीला अंगाखांद्यावर खेळवलं. विकाससारखे पैलवान हे सूळ कुटुंबाचं शेंडेफळ. 

सागर सूळ, सचिन सूळ, प्रदीप सूळ, भिवा सूळ, विशाल सूळ, रवी सूळ ही विकासची भावंडंही तितकीच अफाट आहेत. प्रतिस्पर्ध्यांचा घामटा काढत तांबड्या मातीवर आणि प्रत्येक कुस्तीशौकिनाच्या मनामनावर राज्य करणारी ही धनगरांची रांगडी पोर. गजीनृत्य केल्यासारखं पुढच्याला अलगद अस्मानात फिरवतात..आणि काळजाची हलगी करत कुस्तीशौकिनांना जल्लोष करण्याची संधी देतात. 

विकास मुळातच लाजाळू स्वभावाचा. मितभाषी आणि त्यातच घराला पहिलवानांचा असा देदीप्यमान वारसा लाभलेला असल्यामुळे "महाराष्ट्र चॅंपियन' वगैरे शब्द कुटुंबासाठी अगदी सर्वसामान्य झालेले आहेत. 
कारण अशी कामगिरी करणारे घरात अनेकजण आहेत. 
मला पुरेसं माहिती नाही पण इतक्‍या मोठ्या प्रमाणावर पदकं मिळवणारं सूळ कुटुंबासारखं घर महाराष्ट्रात क्वचितच असावं. 
अर्थात विकास आणि अन्य नव्या पिढीकडून घरादाराला अजून मोठ्या अपेक्षा आहेत. 

खरतर अगदी सुरवातीच्या काळात विकासला मार्गदर्शनासाठी कुठे बाहेर जावं लागलं नाही. कारण घराबाहेरच्या अंगणातच पोरांना लढतीसाठी या कुटुंबाने एक छोटेखानी आखाडा तयार केलेला होता. 
तो अद्यापही आहे. काय कुणास ठाऊक ? त्या मातीची खासियत की 
काय. इथल्या मातीत खेळलेला पोरगा महाराष्ट्र चॅम्पियन वगैरे होतोच होतो. 

विकासचं कुटुंब इतकं का प्रसिद्ध आहे. ते विकासच्या कुटुंबातील लोकांचे यशाचे मनोरे बघितल्यानंतरच लक्षात येते. विकासच्या घरात त्याचे चुलते चंद्रकांत सूळ आणि आबा सूळ हे दोघेही उपमहाराष्ट्र केसरी आहेत. 
नवनाथ सूळ, उत्तम सूळ, तुकाराम सूळ, संजय सूळ हे महाराष्ट्र चॅम्पियन आहेत, तर संतोष सूळ, सोमनाथ सूळ यांचे कुस्तीत ऑल इंडिया मेडल आहे. सागर सूळ, सचिन सूळ, प्रदीप सूळ, भिवा सूळ, विशाल सूळ यांच्यातही कोणी ना कोणी महाराष्ट्र चॅम्पियन नाही तर नॅशनल मेडल मिळवणारा आहेच आहे. राजेंद्र सूळसारखा अफाट क्षमतेचा तेजतर्रार चुलताही विकासला लाभलेला आहे. ज्यांनी गेल्यावर्षीच कुस्ती दंगलमध्ये सातारा संघाकडून खेळताना डोळ्यांचं पारणं फेडणारी कामगिरी केली होती. तांबड्या वीटांमधल्या कुस्ती नावाच्या या कॉंक्रिटमुळेच सूळ कुटुंब अद्याप एकसंध राहिले आहे. 

दरम्यान, विकासला वडील ज्ञानदेव सूळ आणि आई सविता सूळ यांचा पहिल्यापासूनच पाठिंबा राहिलेला होता. पोराने मोठं होऊन पैलवान बनावे, नावलौकिक मिळवावा, याच त्यांच्या इच्छा- आकांक्षा होत्या. पोरानही आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यातल्या या पेटत्या स्वप्नाला कधी विझू दिलेले नाही. अगदी वयाच्या सातव्या वर्षांपासून तो कुस्तीत अविरत घाम गाळतोय. 

एकसळ केसरी, भिलार केसरी, भैरवनाथ केसरी, पाचगणी चषक आदी स्थानिक स्पर्धांतून विकासने आपली चमक दाखवायला सुरू केली होती. 
खंडाळा, पळशी आदी गावच्या यात्रांच्या फडांत ही त्याने प्रतिस्पर्ध्यांना अस्मान दाखवले होते. 

शालेय कुस्तीतून तर त्याने नॅशनलपर्यंत धडकदेखील मारली होती. अगदी ज्युदोसारख्या कुस्तीपूरक खेळातही तो राज्यस्तरापर्यंत चमकला होता. 
पण, त्याच अंतिम ध्येय फक्त कुस्तीच होत. महाराष्ट्र केसरीचे मैदान मारायचंच अशी त्याची जिद्द होती. यात दोन वेळेला तो अपयशीही झाला होता. पण, यंदा त्याने अफाट कामगिरी केली आणि मॅटप्रकारात 7- 15 गुणांच्या फरकाने 97 किलो वजनीगटात सोलापूरच्या सूरज मुलाणीचा एकहाती पराभव केला. 

दरम्यान, विकास महाराष्ट्र चॅम्पियन झाला असला तरीही त्याच्या बहरण्याच्या काळात त्याला सांधेवात आणि पोटाचे काही विकारही झाले होते. काही वर्षांसाठी कुस्ती सुटलीही होती. वडीलांनी मात्र अडचणीच्या काळात विकासच्या पाठीवर हात ठेवला."तु लढ काय होत नाही' असा विश्वासही दिला. 
विकास पुन्हा कुस्ती मैदानात उतरला. त्यानंतर मात्र त्याने परत कधी मागे वळून पाहिले नाही. पाचशे सपाट्या, 500 डिप्स, हजार बैठका, सलग 25 वेळा रस्सा चढणे-उतरणे हे व्यायाम प्रकार हा त्याचा दिनक्रम आहे. 
बरोबरीने जीम, लढत, धावणे, मॅटवरचा टेक्‍निकल सराव अशी दमछाक करणारी मेहनत रोजच सुरू असते. पहाटे चार वाजता न चुकता उठणे हा 
तर त्याचा शिरस्ताच आहे. जिंदगीत शिस्तीची वाघर असेल तरच स्वप्नांची घागर भरते... असं विकासच कुस्तीबाबतच एकूण तत्त्वज्ञान आहे. 

विकासने सातारा तालीम संघात वस्ताद रवी गायकवाड यांच्या मार्गदर्शनात दीर्घकाळ सराव केलेला आहे. आजच्या आपल्या यशात आपल्या वस्तादांच मोठ योगदान असल्याचेही विकास विनम्रपणे सांगतो. सध्या तो पंजाबमध्ये धुमछडी या आखाड्यात राष्ट्रीय ख्यातीचे वस्ताद परविंदर धुमछडी यांच्या मार्गदर्शनात सराव करत आहे. यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेपूर्वी मनावर खूप दडपण होत. वस्तादांशी मी माझी भीती बोलून दाखवल्यावर ते मला खूप रागावून बोलले. असं विकास सांगतो. पण त्या रागावण्याचा मला फायदा झाला. परिणामी मी महाराष्ट केसरी स्पर्धेत बिनधास्त आणि तितक्‍याच तडफेने खेळलो, असंही विकास सांगतो. 

कुस्ती हा मातीतला खेळ आहे. कालौघात तो मॅटवर सरकला. मॅटवरची ग्रीको-रोमन प्रकारची कुस्ती ही खरंतर पळवाट आहे. पण, त्याच्यावर आता खल करण्यापेक्षा 
पैलवानांनी कालौघात बदललेलं हे नवतंत्र आत्मसात करून त्यावर मात करायला हवीय. विकासने ती केली. अर्थात त्याला घरच्यांची तितकीच मोलाची साथ होती. 

अर्थात खुराकाशिवाय पैलवान नाही. विकासच्या नुसत्या खुराकावर महिन्याला 30-35 हजार खर्च होतात. त्याचे वडील पोरासाठी ही तजवीज कसे करत असावेत देव जाणे. कलेला बहुधा गरिबीचा शाप असतो आणि अनेक गरीब कुटुंबांतील पोरांना परिस्थितीच्या जाचक वळणावर आपल्या कलेवर पाणी फेरून पुढे जावे लागते. गावकुसातील अनेक कुस्तीच्या जुन्या कहाण्या जाणती माणस सांगतात. तमुक हरियाणाच्या मल्लाला आपल्या गावच्या अमुक पैलवानाने अनेकदा अस्मान दाखवलं होतं. तो हरयाणाचा मल्ल आज ख्यातनाम पैलवान आहे आणि आपला मल्ल परिस्थितीच्या ओझ्याखाली दबून 
हमाली करतोय. आज खुराक म्हणा, परिस्थिती म्हणा कुस्ती शर्टाच्या आत बंद करून हे मल्ल यंत्र-तंत्र जगण्याचा रेटा सांभाळताना दिसतात. 
हमाली करणे वाईट नाही पण सरकार, कुटुंब, समाज या सर्वच पातळीवर आपण कुचकामी ठरल्यामुळे गावोगावच्या आपल्या पैलवानांचे रूपांतर मोठ्या कुस्तीगीरांत होत नाही. हे तितकंच खरंय. त्यामुळे धुराळा उडवणाऱ्या "राजकीय' कुस्ती आखाड्यांचा खर्च टाळून प्रत्येक गावातले मल्ल आपल्याच माणसांच्या मदतीने आपण घडवायला हवेत. 

मध्यंतरी पैलवानांच्या एका खुराक योजनेबाबत ऐकलं होत ती अस्तित्वात आहे का माहिती नाही. नसेल तर ती सरकारी पातळीवर असायला हवीय. नव्या सरकारने यात लक्ष घालायला हवय. नाहीतर समाजातील दानशूरांनी एकत्र येऊन उदयोन्मुख कुस्तीगीरांसाठी सीएसआर सारखा काही पब्लिक फंड उभा करता येईल का याचा विचार करायला हवाय. कारण केंद्र सरकारची "खेलो इंडिया'ही योजना आहे पण रिकाम्या पोटी कोणताच खेळ मानवत नसतो हे ही तितकेच कटू सत्य आहे. 
शरद पवारांनी काही मल्लांना विद्याप्रतिष्ठानतर्फे प्रत्येकी 12 लाखांची मदत देऊ केली आहे. हे खूप आशादायक आहे तर तिकडे महाराष्ट्र केसरी स्पर्धा होऊनही विजेत्यांना बक्षीसाच्या रक्कमा मिळाल्या नसल्याचे निराशाजनक चित्रही आहे. 

एकूणातच काय तर कुस्तीबाबत हरियाणा, पंजाबची उमेद आणि त्यांच्या रक्तातली धग आपण घ्यायला हवीय आणि त्यांची ती धग आपल्या रगेत बेमालूम मिसळून गावोगावीचे हे कुस्तीगीर आपणच जगवायला हवेत. 
महाराष्ट्र केसरीच्या पुढेही अपार ऑलिम्पिकपर्यंत ते पोचायला हवेत. जगाच्या प्रतलात उभे रहायला हवेत, तरच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या कुस्तीचा "विकास'होईल. 

इतर ब्लॉग्स