Dr Anil Awachat Mitesh Ghatte
Dr Anil Awachat Mitesh Ghatte

... अन्‌ डॉ. अवचट सर अवचट काका झाले

व्यसनाच्या अंधारात चाचपडणाऱ्या व्यक्तीला व्यसनमुक्त होण्यासाठी प्रकाशाचा ठिपका दाखवणारा दीपस्तंभ म्हणजे पुण्यातील नावाजलेले मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र! डॉ. अनिल अवचट यांची आम्हांस झालेली पहिली ओळख मुक्तांगणचे शिल्पकार म्हणून बालपणी वर्तमानपत्रांतून झालेली. 

अर्थात व्यसन म्हणजे काय? हेच ठाऊक नसलेल्या त्या वयात व्यसनमुक्ती व डॉ. अवचट सरांच्या कार्याची महती उमजली नाही. पण हळूहळू छंदाविषयी, मजेदार ओरिगामी, माझी चित्तरकथा आदी वाचनाच्या वाढत्या पसाऱ्यातून सरांची ओळख होत गेली. व्यसनमुक्तीच्या परिघाबाहेर पण सरांचे विश्व खूप विस्तारलेले आहे... त्यांत सरांचे कौटुंबिक भावबंध, छंद, व्यक्तीरेखाटन व प्रवासवर्णन आदी अनेक पैलूंचा समावेश आहे याची नव्याने ओळख होत गेली. त्यामुळे सरांच्या प्रत्यक्ष भेटीची आस वाढली होती. आमचे जेष्ठ मित्र कल्याण तावरे यांच्या आर्य बाग परिवाराच्या माध्यमातुन सरांची कन्या सौ. मुक्ता पुणतांबेकर यांचेशी संवाद झाला, आणि त्यांनी आज सरांच्या भेटीचा योग घडवून आणला.

माझी पत्नी मानसी सरांच्या लेखनाची मोठी फॅन! त्यामुळे तिला सरांच्या भेटीची खूप उत्सुकता होती. सरांना आमची ओळख करुन दिल्यानंतर सारी औपचारिकता बाजूला पडली. सरांनी त्यांच्या बालपणापासूनचा सारा प्रवास आम्हांस उलगडून सांगितला. सरांचे वडील पण डॉक्टर होते, मात्र त्यांनी आपल्या मुलाला जे मनापासून आवडेल तेच क्षेत्र व्यवसायासाठी निवडण्याचा मंत्र दिला. त्यामुळे जे मनाला पटेल, तेच काम हाती घेऊन तडीस नेण्याचा नेहमी प्रयत्न केल्याचा सरांनी आवर्जुन माझ्या मुली शरयू व शर्वरीला सांगितले. शरयू व शर्वरीची चित्रकला व क्राफ्टची आवड लक्षात घेऊन त्यांनी आपली पेंटिंग, स्केचेस व ओरिगामीचे धडे त्यांना दिले. आम्ही आमच्या आईला आक्का म्हणतो हे समजल्यावर त्यांनी आम्ही पण आमच्या आईला इंदूताई म्हणायचो, अशी आठवण सांगितली. 

लहानपणी वर्गात शेजारच्या मुलाने त्यांना चिमटा काढून तोंडातून आई शब्द बाहेर पडतो की, इंदूताई याची पडताळणी केल्याचे पण त्यांनी मिश्किलपणे सांगितले. आयुष्यात महात्‍मा गांधी आणि अहिंसेची भक्ती करणाऱ्या सरांना चित्रपटांत बंदूकीची धामधुड नसली, तर चित्रपट पाहण्यात रस वाटत नाही, हे समजल्यावर मोठी गंमत वाटली. पण हल्ली चित्रपटगृहांत जाऊन सिनेमा पाहणे कंटाळवाणे वाटते, त्यामुळे ते घरीच चित्रपट पाहतात. आमचे मूळ गाव असलेल्या इस्लामपूर व मानसीचे माहेर असलेल्या वाई येथील परिसर व व्यक्तींच्या आठवणीतून सरांसोबत जवळीक आणखी वाढली. त्यामुळे मानसी शासकीय सेवेत मला दोन वर्ष जेष्ठ असल्याचे समजल्यावर काही चुकले, तर लगेच मला मेमो काढण्यास विसरू नको, असे त्यांनी मिश्किलपणे मानसीला सांगितले.

मुंबई मॅरोथॉन आटोपून परतलेले श्री. आशिष, चि. इशान, चि. कावेरी, सौ. मुक्ताताई यांचे सोबत गप्पां मारत असताना सर्वांचे परस्परांशी स्नेहाचे बंध न कळत आणखी घट्ट झाले. मुक्तांगणला भेट देण्याचे मनोमन ठरले, मात्र डॉ. अवचट सर या साऱ्या संवादातून कधी अवचट काका झाले हे समजलेच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com