एक सुगंधी माणूस!

सुनील माळी
गुरुवार, 30 जानेवारी 2020

तो एक सुगंधी माणूस होता. तो आपल्या जसजसा जवळ येई तसतसा हा सुगंध दरवळू लागे...हा सुगंध वेगवेगळ्या गंधांचा होता...पहिला सुंगध असायचा तो त्यानं लावलेल्या अत्तराचा. तो आपल्या जवळ आला की खिशातनं अत्तराची छोटी कुपी काढून आपल्या मनगटावर घासे अन आपणही प्रफुल्लित होत असू... त्याचा दुसरा सुगंध त्याच्या चेहऱ्यावरच्या प्रसन्नतेचा अन ओठावर असलेल्या कायमच्या हास्याचा असे. त्याला कधीही दुर्मुखलेला असं कुणीच पाहिलेलं नव्हतं. समाधानाचं तळंच ओसंडून वाहातंय का काय, असा भास त्याच्याकडं पाहिलं की होई...

तो एक सुगंधी माणूस होता. तो आपल्या जसजसा जवळ येई तसतसा हा सुगंध दरवळू लागे...हा सुगंध वेगवेगळ्या गंधांचा होता...पहिला सुंगध असायचा तो त्यानं लावलेल्या अत्तराचा. तो आपल्या जवळ आला की खिशातनं अत्तराची छोटी कुपी काढून आपल्या मनगटावर घासे अन आपणही प्रफुल्लित होत असू... त्याचा दुसरा सुगंध त्याच्या चेहऱ्यावरच्या प्रसन्नतेचा अन ओठावर असलेल्या कायमच्या हास्याचा असे. त्याला कधीही दुर्मुखलेला असं कुणीच पाहिलेलं नव्हतं. समाधानाचं तळंच ओसंडून वाहातंय का काय, असा भास त्याच्याकडं पाहिलं की होई...

त्याचा तिसरा सुगंध होता तो त्याच्या दातृत्वाचा. आपल्याला जे काही मिळालयं ते समाजाला परत देण्यासाठी त्याचे दोन्ही हात उघडे असायचे... 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्याचा चौथा सुगंध होता तो त्याच्या आध्यात्मिकतेनं मिळालेल्या तृप्ततेचा. स्वामी चिन्मयानंदांसारख्या अधिकारी पुरूषांकडंन मिळालेल्या आशीर्वचनांमुळं तसंच भागवत पंथाच्या भक्तिरसात चिंब भिजल्यानं आयुष्याचं सार्थक झाल्याची भावना आणि तिच्यामुळं आलेल्या तृप्ततेचा ओलावा त्याला भेटणाऱ्याच्याही अंगावर उडत असे. 

त्याचा पाचवा सुगंध सहजी आपल्याला येई तो त्याच्यातील कलाकाराचा होता. त्यानं काढलेल्या रांगोळ्यांत महाराष्ट्रातील अनेक लहानमोठी गावं रंगून गेली होती... 

लांबून मोठ्या दिसणाऱ्या माणसांच्या जवळ गेलो की त्यातली अनेक जण प्रत्यक्षात छोटी असल्याचं जाणवतं आणि लांबून लहान, सामान्य वाटणाऱ्या माणसांपैकी अनेक जण प्रत्यक्षात खूपच मोठी असल्याचं दिसतं. अशाच लांबून छोट्या भासणाऱ्या अन प्रत्यक्षात सकस, समृद्ध आयुष्य भरभरून जगलेल्यांपैकी ते एक होते. तसं बघायला लौकिकार्थानं चरितार्थासाठी ते काम काय करत होते ? असं विचारलं तर त्यावेळच्या पीएमटी आणि आताच्या पीएमपी या पुण्यातील सार्वजनिक बससेवेत ते साधे कर्मचारी होते. आधी पीएमटीच्या महाव्यवस्थापकांचे सचिव म्हणून आणि नंतर बस स्थानकाचे स्टार्टर म्हणून त्यांनी काम केलं. पीएमटीच्या डेक्कन बसस्थानकावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या बसगाड्यांचं नियंत्रण करण्याचं काम त्यांच्याकडं होतं. पीएमटीमधून ते निवृत्त झाले अन निवृत्त आयुष्य जगू लागले.

... लौकिकार्थानं असं आयुष्य जगलेला हा कर्मचारी प्रत्यक्षात एक समृद्ध आयुष्य जगला होता. असं आयुष्य लौकिकार्थानं मोठ्या मानल्या गेलेल्या अनेकांच्या भाळी लिहिलं गेलं नव्हतं. पीएमटीच्या या "स्टार्टर'ला पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर यांसारख्या कलाकारांपासनं विविध क्षेत्रांतल्या नामवंतांचा सहवास मिळाला. अनेक ज्येष्ठ मंडळींचं त्यांच्या पाषाणच्या घरी येणं-जाणं असे. त्यांनी अनेक सामाजिक संस्थांना मुक्त हस्तानं लाखो रूपयांच्या देणग्या दिल्या. अनाथालयातील मुलांना खाऊ वाटप, वृद्धाश्रमातील मंडळींचं मन रिझवणं, आपल्या पंचाहत्तरीनिमित्त पंचाहत्तर नामवंतांचा सत्कार, आळंदीच्या देवस्थानाला देणगी देऊन त्यातून दहावीतील गुणवंतांचा सन्मान... असे एक ना दोन उपक्रम या साध्या माणसानं केले.

पुण्याजवळच्या खेडजवळच्या गावी आईकडनं रांगोळीचे धडे छोट्या वसंताला मिळाले. त्यानं ही कला वाढवली, फुलवली. अनेक मोठ्या कार्यक्रमांत त्यांच्या रांगोळीनं सर्वांचं स्वागत होई. कोणत्याही मानधनाच्या अपेक्षेनं नव्हे तर "कलेसाठी कला' ही उक्ती जगण्यासाठी ते हौसेनं अनेक ठिकाणी रांगोळी काढत. मोठी रांगोळी असेल तर ती बघायला बोलावत. मोदी गणपतीच्या समोर पाण्यावर काढलेली रांगोळी पाहण्यासाठी तर त्यांचा हटकून फोन येई. त्यांच्या रांगोळीशेजारी एक दानपेटी असे आणि कुणी स्वेच्छेनं दिलेली रक्कम त्यात जमा होई. महाराष्ट्रभर काढलेल्या अशा रांगोळ्यांच्या शेजारच्या दानपेटीत जमा झालेल्या रकमेतून ते अनेकविध सामाजिक कामं करीत. आषाढी वारी तर वसंतरावांच्या अत्यंत आवडीची, हरिभक्तीत बुडून जाण्याची. या वारीसाठी त्यांची कायनेटिक होंडा सजे. त्यावर भागवत धर्माच्या पताका आणि मोठा फलक लावलेला असे. वारी निघाल्यावर आपल्या गाडीवरून ते पुढच्या गावी जात आणि तिथं पोहोचलेल्या वारीचं स्वागत त्यांच्या रांगोळ्यांनी होई. त्या गावातील मंदिरही त्यांच्या रांगोळ्यांनी सजत. अनेक दशकं त्यांनी हा उपक्रम केला, पण नंतर प्रकृतीनं साथ देणं बंद केल्यावर त्यांना नाईलाजानं वारी थांबवावी लागली. चिन्मयानंदांच्या चिन्मय मिशनच्या कामातही ते उत्साहानं भाग घेत. त्यातनं चिन्मयानंदांचा भरभरून सहवास त्यांना लाभला. 

पाषाण हे पुण्याचं उपनगर. तिथं ते बंगल्यात राहात आणि कधी गावात आले की आवर्जून घरी येत. येताना बिस्किटांचे पुडे, अत्तराची बाटली अन प्रसन्न हास्य घेऊन येत. त्यांची मुलंही कर्तबगार निपजल्याचा सार्थ अभिमान आणि समाधान त्यांना असे. आताशा त्यांच्या फिरण्यावर खूप मर्यादा आल्या तरी ते आठवण ठेवून फोन करत. "हरि ओम' असं म्हणत ते सुरूवात करीत आणि त्यांच्या बोलण्यानं नवा उत्साह येई. त्यांनी गेल्या वर्षी घरी बोलावलं तेव्हा वाटलं की आता हातातली कामं बाजूला सारून जायला हवं... असं जाणं राहून गेलं की नंतर चुटपूट लागून राहाते, असा अनुभव असल्यानं त्या दिवशी त्यांच्या घरी गेलो. नेहमीप्रमाणं वसंतराव आणि वहिनींनी हसतमुखानं स्वागत केलं, सामोसे, चहा, बिस्किटं असं खाणं झालं. त्यांच्या प्रथेप्रमाणं त्यांनी शाल दिली. त्यांना वाकून नमस्कार केला. "पुलं'चं एक वाक्‍य आठवलं, "वाकून नमस्कार करावेत, असे तीर्थरूप पाय आता कमी होत आहेत,' पितृछत्रापाठोपाठ मातृछत्रही हरपलं असल्यानं आसुसून त्यांच्या पाया पडलो...त्यानंतर त्यांचे फोन येत राहिले... फोनवर बोलत राहिलो... आणि आज सकाळी त्यांच्या चिरंजीवांचा मेसेज आला... "आज सकाळी आमचे वडील वसंतराव थिटे यांना देवाज्ञा झाली...' एक क्षण हात थरथरला...

दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत वसंतरावांचं पार्थिव रुग्णवाहिकेतून उतरवून ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या पायावर पुन्हा वाकून नमस्कार करत असताना नजर त्यांच्या चेहऱ्याकडं गेली. तीच प्रसन्नता, तेच समाधान चेहऱ्यावर होतं... एकदम "हरि ओम...' असा आवाज आल्याचा भास झाला... अन एका सुगंधानं सारा आसमंत भरून गेल्याचं जाणवलं... समोरच्या भिंतीवरच्या तुकोब्बारायाच्या अभंगाच्या ओळी होत्या... 

"दिली तिळांजुळी कुलनामरूपासी 
शरीर ज्याचे त्यासी समर्पिले 
तुका म्हणे रक्षा झाली आपोआप 
उजळीला दीप गुरूकृपा...'

इतर ब्लॉग्स