गोधन सांभाळण्यासाठी जागरूकता व्हावी !

अमरसिंह घोरपडे
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

मुलाबाळांना घरात दूधदुभते असावे, या उद्देशाने जनावरे पाळली जात होती; परंतु आज दूध पिशव्या खेड्यापाड्यातही सहज उपलब्ध होत आहेत. मग जनावरे कशाला पाळायची? त्याचबरोबर जनावरांचे पालनपोषण कोणी करायचे? आज अनेकांना जनावरांचे शेण काढायला नको वाटते.

     बैल जगवणे शेतकऱ्यांच्या हाताबाहेर, ही बातमी वाचनात आली आणि विचार आला, की एके काळी शेतीसाठी उपयुक्त ठरणारा आणि शेतकऱ्यांचा जिवाभावाचा मैतर असणाऱ्या बैलांना पोसणेच शेतकऱ्यांना का जड जात असेल? परंतु हे फक्त बैलांबाबतच होत आहे असे नाही, तर एकंदरीतच शेतकऱ्यांकडील पशुधन कमी होत असल्याचे जाणवत आहे. पशुधन कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. यातील काही कारणांचा विचार केला असता असे लक्षात येते की, सध्या जमिनीचे तुकडे झालेले आहेत. तसेच शेतकरी नगदी पिकांकडे वळलेला आहे. त्यामुळे जनावरांना चाऱ्यासाठी आता शेतात तजवीज केली जात नाही.

मुलाबाळांना घरात दूधदुभते असावे, या उद्देशाने जनावरे पाळली जात होती; परंतु आज दूध पिशव्या खेड्यापाड्यातही सहज उपलब्ध होत आहेत. मग जनावरे कशाला पाळायची? त्याचबरोबर जनावरांचे पालनपोषण कोणी करायचे? आज अनेकांना जनावरांचे शेण काढायला नको वाटते. जनावरांचे काम करायला माणसेही मिळत नाहीत. तसेच ज्या घरात जनावरे आहेत, त्या घरात मुली देतानाही अनेक जण विचार करू लागले आहेत. कारण आपल्या मुलीला ते काम करावे लागेल, असे त्यांना वाटते. पूर्वी घराच्या रचनेत गोठ्याचे स्थान होते; परंतु आज लोकसंख्या वाढल्यामुळे गुरांच्या गोठ्याची जागा माणसांनी घेतली आहे. अनेकजण नोकरी, मुलांचे शिक्षण यानिमित्ताने शहराकडे स्थलांतरित होऊ लागले आहेत. एकेकाळी शेती, जनावरे असणे हे मोठेपणाचे, श्रीमंतीचे लक्षण होते.

स्थळ पाहायला आलेले त्याच्या गोठ्यात असणारी दावण मोजायचा. आज शेती, जनावरे पाळणे लोकांना फायदेशीर नाही. तसेच ते कमीपणाचेही आहे, असे वाटू लागले आहे. त्यामुळे जनावरे पाळण्याकडील त्यांचा कल कमी होताना दिसत आहे. पूर्वी परिवारातील सदस्याइतकाच हक्क जनावरांना होता. त्याची तितकीच देखभाल केली जायची. त्यामुळे गोठा हा घरात प्रवेश करताना असायचा, कारण जनावरांवर लक्ष राहावे, हा त्यामागील उद्देश होता. पूर्वी घरात पिकत असल्याने बिनहिशेबी बनवले जायचे. आज विकतचे आणले जात असल्याने हिशेबात बनवले जाते. या हिशेबात पशुपक्षी, प्राणी बसणार कसे? त्यामुळे पशुधन घटू लागलेले आहे. याचे दुष्परिणामही जाणवण्यास सुरवात झाली आहे. सर्वच चित्र निराशाजनक आहे, असेही नाही.

अजूनही काहीजण पशुपक्षी, पाण्यांवर प्रेम करणारे आहेत. याची प्रचिती नुकत्याच आलेल्या महापुरात आली. अनेकांनी जनावरांसाठी घरे सोडली नाहीत. कणेरी मठाने गोधन वाढवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी कणेरीमठाचे मठाधिपती अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर स्वामी यांनी मठावर गोशाळेची निर्मिती केली आहे. येथे विविध प्रकारच्या गायी पाहण्यास मिळतात. आज कणेरी मठावर येणाऱ्यांपैकी अनेकजण गोशाळेस भेट देतात. कणेरी मठामार्फत दरवर्षी गो परिक्रमा आयोजित केली जाते. या माध्यमातून लोकांमध्ये गोधनाविषयी जागरूकता केली जात आहे. शेतकऱ्याने आपल्या शेतासाठी लागणाऱ्या खताची निर्मिती आपण करावी, यादृष्टीने विचार करणे आवश्‍यक आहे. किमान एक तरी देशी गाय पाळणे आवश्‍यक आहे.

इतर ब्लॉग्स