"जणू देह ही पंढरी..!' 

प्रसाद इनामदार 
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

आठवणी अनेक... कडू-गोड. एखादी कधीही न विसरता येणारी... एखादी व्यक्ती जाते तेव्हा त्या व्यक्तीच्या सर्वांत जवळच्यांसाठी तो धक्काच असतो. असा धक्का जवळजवळ प्रत्येकालाच कधी ना कधी सहन करावा लागतो. माणूस त्यातून सावरतो आणि पुढे जात राहतो.

दिवसभर तेजाळून श्रांत झालेला सूर्य मावळतीकडे कललेला... कुंदावलेल्या वातावरणाच्या सोबतीने गडद गहिऱ्या निशेत उद्याचे अस्तित्व शोधायला निघालेला. एका आप्तास शेवटचा निरोप देण्यासाठी मी स्मशानभूमीत पोचलो. जवळचीच व्यक्ती असल्याने मनात आठवणी दाटलेल्या. एकमेकांना देण्यात येणाऱ्या किरकोळ सूचना वगळता शांतता भरून राहिलेली. अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. चिता रचली जात होती. आवश्‍यक ती सर्व तयारी झाली. पुन्हा ती व्यक्ती कधीही दिसणार नव्हती. या भूतलावरील तिचं अस्तित्व संपलं होतं. आता फक्त देह मागे उरला होता. त्या अचेतन देहावर अंत्यसंस्कार झाले की उरलेसुरले अस्तित्वही नाहीसे होणार होते. आता ती व्यक्ती केवळ आठवणींत उरणार होती. आठवणी अनेक... कडू-गोड. एखादी कधीही न विसरता येणारी... एखादी व्यक्ती जाते तेव्हा त्या व्यक्तीच्या सर्वांत जवळच्यांसाठी तो धक्काच असतो. असा धक्का जवळजवळ प्रत्येकालाच कधी ना कधी सहन करावा लागतो. माणूस त्यातून सावरतो आणि पुढे जात राहतो. दिवस जात राहतात आणि दुःखाची तीव्रता कमी होत जाते. काळ त्यावर मलमपट्टी करतो... हळुवार फुंकर घालत राहतो आणि जगण्याचं सूत्र समजावत राहतो. कितीही दुःख झालं तरी ते उराशी ठेवून पुढे जायचं असतं, हे शिकवत राहतो. यालाच तर आयुष्य म्हणतात. 

""चला, सर्वांनी नमस्कार करून घ्या!'' या हाकेसरशी माझी विचारांची तंद्री भंग पावली. सर्वांनी नमस्कार केला. कलेवर उचलून चितेवर ठेवलं. अग्निसंस्कार करण्यात आले. हळूहळू ज्वाळांनी ते कलेवर कवेत घेतलं... ज्वाळांनी वेढलेले ते कलेवर पाहताना डोळ्यांच्या कडा ओलावल्या. आता पुन्हा दर्शन नाही, या विचाराने सर्वांत जवळच्या व्यक्तींच्या तोंडून हुंदका बाहेर पडला. ज्वाळांचा आणि त्यांच्या मुसमुसण्याचाच काय तो आवाज येत होता. काही वेळ गेला. आलेले पै-पाहुणे, आप्तस्वकीय धीर देत बाहेर पडू लागले. स्मशानशांतता अनुभवताना जगण्याचं दाहक सत्य समोर उलगडत होतं. आयुष्यभर खस्ता खाल्ल्यावर जेव्हा एखादी व्यक्ती जाते, तेव्हा तिचे जवळचे हा धक्का पचवितात कसा? त्यांच्या आयुष्यात निर्माण होणारी पोकळी भरणार तरी कशी? प्रत्येक गोष्टीला काळ हे औषध आहे असे आपण म्हणतो... पण सर्वच बाबतीत हे औषध लागू पडते का? निस्सीम प्रेम... माया... जिव्हाळा... लळा... असे काही बंध असतातच की. त्यांचं काय? अशा अनेक अनुत्तरित करणाऱ्या प्रश्‍नांनी मनात काहूर माजलेलं. मात्र, लवलवणाऱ्या ज्वाळांना कोठे त्याची फिकीर होती..? डोळ्यांत आसवं आणून जिच्यासाठी सगळे जमले आहेत, त्या व्यक्तीला त्या ज्वाळा कणाकणाने मुक्त करीत होत्या. त्या जणू त्यांचं कर्तव्यच बजावत होत्या. सृष्टीच्या नियमाचं तंतोतंत पालन करीत होत्या. 

 संधिप्रकाशामुळे वातावरण अधिकच गहिरं बनलं. काही वेळात तेथून बाहेर पडायचं. मग फक्त तो देह आणि त्या ज्वाळा. विचारांचं काहूर सुरूच... एवढ्यात लांबवर कोठे तरी सुरू असलेल्या गाण्याचे बोल कानावर पडले... "जणू देह ही पंढरी... आत्मा पांडुरंग...' त्याच वेळी वाऱ्याच्या झोताबरोबर तेथे असलेल्या झाडांची काही पाने गळून पडू लागली. वाजणारं गाणं... गळून पडणारी पानं... धडाडत असलेली चिता... गळणाऱ्या पानांकडे पाहत असतानाच माझी नजर कोपऱ्यात असलेल्या हापशाजवळ स्थिर झाली. डोळे पुन्हा भरले... हे डोळे भरणं वेगळं होतं... आश्‍वस्त करणारं होतं... वाहून जाणाऱ्या पाण्यावर बाजूला एक छोटंसं रोप तरारलं होतं... दहा-पंधरा पोपटी पानांची श्रीमंती मिरवत... सभोवताल निरखत... जगणं अनुभवण्यासाठी आसुसून आकाशाच्या दिशेने झेपावू पाहत होतं... त्याचं वाऱ्यावर डोलणं... जगण्याचं सार सांगत होतं! 

इतर ब्लॉग्स