संपत्तीच्या हव्यासापोटी सारेकाही

संजय शिंदे t@ssanjaysakaal
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

कष्टाविना धन मिळावे, यासाठी कोण कोणत्या थराला जाईल, हे सांगता येत नाही. संपत्तीच्या हव्यासापोटी वन्यजीवांनाही वेठीस धरले जात आहे. साताऱ्यातील कृष्णानगर येथे एकास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून मांडूळ व घुबड जप्त केले. त्यांची तो काळाबाजारात विक्री करणार होता. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात कायद्याचा उपयोग होईलच. मात्र, कायद्यापेक्षाही लोकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. या साऱ्या प्रकारामध्ये अंधश्रद्धा आहे, हे लोकांना सांगणार कोण? जवळ पैसे असतील तर वाट्टेल ते करता येते, ही मानसिकताही अशा प्रकारांना बळ देते, हे समजून घेण्याची गरज आहे. 

साताऱ्यात कृष्णानगर येथे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पळून जाताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका संशयिताला पकडले. पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून विक्रीसाठी नेण्यात येणारे मांडूळ व घुबड जप्त केले. त्याच्यावर आता वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. जिल्ह्यात, तसेच राज्यात मांडूळासह कासवाची तस्करी सर्रास होत आहे. मात्र, त्याच्या मुळाशी भिडण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. यापूर्वी उंब्रज, कऱ्हाड, पाटण परिसरात कासवांची तस्करी उघड झाली आहे. आता साताऱ्यात मांडूळ, घुबडाची तस्करी उघड झाली. त्यामुळे ही बाब सातत्याने घडत आहे. त्यामागे लोकांची अंधश्रद्धा आहे, हे लोकांना सांगणार कोण? मांडूळ, कासवामुळे धनाचा लाभ होतो, या भाबड्या आशेपोटी लोक ते बाळगणे व त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्यास तयार होत आहेत. मात्र, ही अंधश्रद्धा कशी फोल आहे, हे सांगण्यासाठी समाजातून व सरकारी पातळीवरून जाणीवपूर्वक प्रयत्न झाले, तरच मांडूळ व कासवांचा जीव वाचणार आहे; अन्यथा आज सातारा, उद्या आणखी कोठे अशी तस्करीची साखळी जिल्ह्याबरोबरच संपूर्ण राज्यात सुरूच राहणार आहे.
 
मांडूळ, कासवांसह घुबडांचे अनेक तस्कर अजूनही सुसाटच आहेत. मोठ्या प्रमाणावर असणारे हे रॅकेट आणि लोकांच्या घरी ठेवलेले मांडूळ, घुबड, कासव शोधण्याचे वन विभागासमोर आव्हान आहे. घरी मांडूळ, कासव पाळल्यामुळे धनसंपत्ती प्राप्त होते, अशा अंधश्रद्धेपोटी अनेक जण कासवांची खरेदी करत आहेत. मांत्रिकांकडून त्याची विधिवत पूजा-अर्चा केली जाते. मात्र, अशा प्रकारे लोकांच्या भावनांना फुंकर घालून त्यांना लुटण्याचे काम होत आहे. लाखोंचे आमिष दाखवून दुर्मीळ होत असलेल्या मांडूळ, ऊद, घुबड व कासव या वन्यजीवांची तस्करी होत असल्याबाबत "वाइल्ड लाइफ प्रोटेक्‍शन ऍण्ड सॅक्‍युअरी असोसिएशनने' अनेक वेळा संबंधितांना कळवले आहे. मात्र, त्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही.

वन्यजीवांची तस्करी होत असल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे. अधिकारी ती किती गांभीर्याने चौकशी करतात, हाती काय लागते व तस्करी थांबणार काय? असे प्रश्‍न उपस्थित होतात. काहीही श्रम न करता कोणत्या तरी अज्ञानाचा फायदा घेऊन जास्तीत-जास्त पैसा मिळवता येईल, या भ्रमापोटी अशा गोष्टी जन्माला येतात. यामध्ये युवकांची संख्या मोठी असल्याचे अनेकदा उघड झाले आहे, हे चिंतेचे आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा झाला आहे. त्यामुळे कायद्याचा उपयोग होईलच. मात्र, कायद्यापेक्षाही लोकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती यासाठी पुढाकार घेत आहे. मात्र, आता समाजाचाही पुढाकार गरजेचा आहे. पोलिसांनी कृष्णानगरला उभ्या असलेल्या संशयिताकडे चौकशी केल्यामुळे हा प्रकार उघड झाला. त्यामुळे पोलिस अभिनंदनास पात्र आहेत.

इतर ब्लॉग्स