गोष्ट संदीप आणि अश्‍विनी यांच्या लग्नापूर्वीची... 

सुस्मिता वडतीले 
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

"व्हॅलेंटाइन वीक'ला शुक्रवारपासून सुरवात झाली आहे. याची "रोज डे'ने सुरवात होत आहे. या दिवशी प्रेमाचं प्रतीक असलेलं गुलाबाचं फूल देऊन आपल्या भावना व्यक्त करतात. त्या पार्श्‍वभूमीवर ही लव्ह स्टोरी आहे, संदीप धर्मे आणि अश्‍विनी कोळेकर यांच्या लग्नापूर्वीची... 

"व्हॅलेंटाइन वीक'ला शुक्रवारपासून सुरवात झाली आहे. याची "रोज डे'ने सुरवात होत आहे. या दिवशी प्रेमाचं प्रतीक असलेलं गुलाबाचं फूल देऊन आपल्या भावना व्यक्त करतात. त्या पार्श्‍वभूमीवर ही लव्ह स्टोरी आहे, संदीप धर्मे आणि अश्‍विनी कोळेकर यांच्या लग्नापूर्वीची... 
अश्‍विनी अरविंद धाम पोलिस वसाहतीत राहात होती. संदीपने तिला एका लग्नात पाहिले, अन्‌ त्याक्षणी तो तिच्या प्रेमात पडला. पण तिच्याशी संदीपची तोंडओळखही नव्हती. तरीही तो बोलला आणि तिच्याशी ओळख करून घेतली. पुढे त्याने तिच्या मैत्रिणींशी ओळख वाढवली व तिच्याशी कॉन्टॅक्‍ट करण्याचा प्रयत्न केला. आता संदीपला अश्‍विनीला प्रपोज करायचे होते, पण कसे करणार? यावेळी संदीपने मैत्रीण क्षमाचे सहकार्य घेण्याचे ठरविले. 
संदीप आणि क्षमाने विचारविनिमय करून अश्‍विनीला संदीपने कसे प्रपोज करावयाचे याचे नियोजन केले. त्यानुसार अश्‍विनीच्या कॉलेजवर जाऊन संदीपने तिची भेट घेतली व थेट तिला प्रपोज केलं. तेव्हा अश्‍विनीचा संदीपला नकार मिळाला. सुरवातीलाच प्रेमाचा भंग तर झाला होता, पण मैत्री टिकवायची होती म्हणून संदीप अश्‍विनीला म्हणाला, प्रेम नाही पण निदान मैत्री तरी असू दे. अन्‌ तिने त्याचा स्वीकार केला. यानंतर स्वतःला सिद्ध करण्यासाठी संदीपने तयारी सुरू केली. मग पोलिस भरतीची तयारी सुरू केली. कसल्याही परिस्थितीत पोलिस भरती व्हायचंच आणि आपली ओळख काय हे अश्‍विनीला दाखवून द्यायचं होतं. प्रयत्नांती तो पोलिस भरतीला उभा राहिला. त्याला सोलापूर सोडून जाणे जमणार नव्हते, कारण अश्‍विनी सोलापुरात होती. संदीपने सोलापूर शहर व ग्रामीण दोन्ही ठिकाणी भरतीसाठी प्रयत्न सुरू केले. खरंतर कुठेतरी एकाच ठिकाणी भरतीला उभा राहता येत होतं, पण संदीपला स्वतःला सिद्ध करण्यासाठी कुठलीही रिस्क घ्यायची नव्हती. म्हणून दोन्ही ठिकाणच्या भरती प्रक्रिया पूर्ण केल्या व दोन्ही ठिकाणी भरती झाला. त्यानंतर सोलापूर ग्रामीणचा राजीनामा दिला आणि सोलापूर शहर पोलिसांत तो रुजू झाला. कारण एकच त्याला अरविंद धामला, तिच्या घराशेजारी रूम घ्यायची होती. 
यादरम्यान, अश्‍विनी लातूरला एमएस्सीचे शिक्षण घेत होती. तिथे देखील संदीपने तिच्या मैत्रिणींशी ओळख करून घेतली. तिच्या मैत्रिणीने एके दिवशी फोन करून संदीपला सांगितले, की अश्‍विनीची कॉलेजमध्ये एका मुलाने छेड काढली. दुसऱ्या दिवशी संदीप तडक तिच्या कॉलेजमध्ये पोचला व त्या मुलाला समज दिली. तेव्हा कुठेतरी अश्‍विनीच्या मनात त्याच्याविषयी प्रेमाची भावना असल्याची लकेर दिसली. नंतर तिच्या मैत्रिणीने तिला संदीप तुझ्यासाठी योग्य आहे, हे पटवून दिले. 
पुढे जाऊन अश्‍विनीने स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन कृषी सहायक ही पोस्ट मिळवली. आता तिच्या घरात तिच्या लग्नाची बोलणी चालू झाली. आता मात्र संदीपला काहीतरी हालचाल करणे गरजेचे होते. कारण आता नाहीतर कधीच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. नंतर मनाची तयारी करून एकेदिवशी तिला दुसऱ्यांदा प्रपोज करण्याचं ठरवलं व केलंही. तेव्हा अश्‍विनीने संदीपला होकार दिला...! 
त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे घरी काय सांगायचे? एके दिवशी तो तिच्या गावी गेल्यावर तिच्या भावाने त्याला बघितले. त्याने घरच्यांना सांगितले, तेव्हा घरच्यांनी फोन करून त्याला परत बोलावून घेतलं. का आला आहेस म्हणून विचारले. त्यावेळी संदीपने खरे ते सांगितले. परिणाम अर्थातच तिच्या घरच्यांनी संदीपला खूप मारले. त्यानंतर त्याच्या मित्राने फक्त त्यांना एकच सांगितले, की आम्ही तुमच्या घरापर्यंत आलो कारण तुमची मुलगीसुद्धा याच्यावर प्रेम करत आहे. एकदा तिला विचारून तरी बघा असं म्हणून ते दोघे निघाले. तेव्हा तिच्या घरच्यांनी तिला विचारले आणि तिनेदेखील खरे ते सांगितले. तरीदेखील घरचे लग्नाला तयार नव्हते. कारण, ती कृषी सहायक आणि संदीप पोलिस कॉन्स्टेबल. मग, अश्‍विनीने केले तर लग्न फक्त संदीपशीच करणार असे सांगितल्यामुळे तिच्या घरच्यांचा नाइलाज झाला व त्यांनी त्याच्या घरी येऊन लग्नाची बोलणी केली आणि नंतर 20 जून 2014 ला दोघांचं लग्न झालं. आज दोघेही सरकारी नोकरदार असून त्यांचा सुखी संसार सुरू आहे.

इतर ब्लॉग्स