कला एक दृष्टिक्षेप...!

fine-art-wallpapers-21.jpg
fine-art-wallpapers-21.jpg

लोगो : आजचे विचारधन 
सदर : निर्मितीचा सोहळा 

कला या सदराखाली एक महत्त्वाचा व आजच्या काळाशी निगडित असलेला भाग म्हणजे फिल्म फोटोग्राफी आणि सिनेमाटोग्राफी. 
चित्रपटांचा एकूण कलात्मक दर्जा ज्या अनेक गोष्टींवर अवलंबून असतो त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे छायाचित्रण. (फोटोग्राफी) चित्रपटातील छायाचित्रणात कल्पकतेला अधिक वाव असल्याने कोणत्याही चित्रपटाचे यश प्रामुख्याने त्याच्या छायाचित्रणावर ठरते. 

चित्रपटातील छायाचित्रण हे एक सांघिक काम असते. संकल्पित अंदाजपत्रकाची मर्यादा चित्रपटाच्या छायाचित्रकाराला पाळावीच लागते. पटकथेतील प्रसंगाचा नीटपणे विचार करणे, त्यासंबंधी दिग्दर्शकाच्या कल्पना समजावून घेणे, नट-नट्यांच्या अभिनयांस पुरेसा वाव मिळेल किंवा त्यांच्या अभिनयास पुरेसा उठाव मिळेल याबद्दल दक्ष राहणे, कलादिग्दर्शकाने योजिलेल्या देखाव्यांचे प्रभावी चित्रीकरण करणे, त्यातील उणिवा झाकणे, तसेच चित्रपटातील नृत्य-गायनादी प्रसंगांना पुरेशी परिणामकारकता लाभेल या किंवा अशा सर्व गोष्टींचे भान चित्रपटाच्या छायाचित्रकाराला ठेवावे लागते. केवळ कलेसाठी कला, अशी भूमिका चित्रपटाच्या छायाचित्रणात संभवत नाही. उलट चित्रपटाची कथावस्तू उठावदार करणे, त्याचा प्रचार, प्रसार चांगला होईल पाहणे, हे चित्रपटीय छायाचित्रणाचे मुख्य उद्दिष्ट असते. चित्रपट छायाचित्रणात मांडणीचा विचार महत्त्वाचा असतो. प्रत्येक छायाचित्रीत फ्रेम परिपूर्ण असावी लागते. त्याचप्रमाणे त्याचा पुढच्या भागाच्या छायाचित्रणाशी योग्य प्रकारे मेळही असावा लागतो. हा मेळ साधण्यासाठी कॅमेऱ्याची हालचालही कौशल्याने करावी लागते. 

चित्रपटातील छायाचित्रणाला कलात्मक दर्जा येतो तो त्यातील योग्य प्रकाशयोजनेमुळे. बाह्य चित्रीकरणात प्रकाशयोजनेविषयी विशेष काळजी घ्यावी लागते. पात्रांच्या प्रभावी भावदर्शनासाठी किंवा मार्मिक अभिनयासाठी विशिष्ट प्रकारची प्रकाशयोजना करावी लागते. सूर्योदय, सूर्यास्त, धुके, पाऊस यांसारख्या निसर्गदृश्‍यांचा नेमका प्रत्यय येण्यासाठी योग्य ती प्रकाशयोजना करावी लागते. प्रकाशपरावर्तकांचाही उपयोग करून घेणे कौशल्याचे असते. पात्रांची रंगभूषा व वेशभूषा वेधक पद्धतीने चित्रित होईल, यासाठी मुद्दाम लक्ष द्यावे लागते. त्यातील दोष शक्‍यतो झाकण्याचा प्रयत्न करावा लागतो. 

छायाचित्रणाच्या सोयीसाठी अनेक यांत्रिक साधने वापरावी लागतात. विविध प्रकारची भिंगे, छानके, जाळ्या, ढकलगाड्या इत्यादींचा उपयोग करावा लागतो. बदलत्या केद्रांतराची भिंगेही वापरावी लागतात. चित्रपटात चमत्कृती दृश्‍येही असतात. उदाहरणार्थ उडता गालिचा, पौराणिक अस्त्रप्रयोग, अदृश्‍य माणूस यांसारख्या चमत्कृती साधण्यासाठी कॅमेऱ्याचाच चातुर्याने उपयोग करावा लागतो. व्यंगपटात ऍनिमेशनची प्रक्रिया वापरून चित्रीकरण करावे लागते. संपूर्ण रंगीत चित्रपटात तर योग्य ती रंगसंगती कायम राखणे अत्यंत आवश्‍यक असते. सुस्पष्टता, सुयोग्य केंद्रीकरण, छायाचित्रणातील सातत्य, स्थलकालांचा योग्य आभास, डोळ्यांस जाणवणारी सुसंगतता, चमत्कृती दृश्‍याची परिणामकारकता, चित्रपटातील नट-नट्यांच्या सूक्ष्म भावदर्शनास व अभिनयास दिलेला उठाव आणि समर्पक प्रकाशयोजना इत्यादी निकषांवर छायाचित्रणाचा कलात्मक दर्जा ठरविण्यात येतो. चित्रपटसृष्टीतील काही नामांकित सिनेमाटोग्राफर्स व फोटोग्राफार्सची नावे नमुद करायची झाली तर संतोष सिवान, गोविंद निहलानी, सुनी तारापोरवाला, अतुल कसबेकर हे व असे अनेक दिग्गज कलाकार या क्षेत्रात आपले कार्य करीत आहेत. छायाचित्रणासोबतच कॉनसेप्टच्युअल आर्ट हा देखील एक कलेचा अविभाज्य घटक आहे. 

कॉनसेप्टच्युअल आर्ट ही एक अशी कला आहे ज्यात कलेचे सौंदर्य वा त्यासाठी लागणाऱ्या साहित्यापेक्षा कल्पना व संकल्पना महत्त्वाची ठरते. 1960 मध्ये आलेल्या कल्पनेवर आधारित या शब्दाने दृश्‍यकलेतील लिखाण व सादरीकरणाच्या प्रमाणाला छेद दिला. या शब्दाच्या लोकप्रियतेच्या काळात यू.के. मधील तरुण ब्रिटिश आर्टिस्ट व टर्नर प्राइझशी असलेल्या या शब्दाच्या संबंधामुळे पारंपारिक पेंटिंग व शिल्पकलेसाठी लागणारे कौशल्य सोडून इतर सर्व आधुनिक कलाप्रकारांशी तो साधर्म्य दाखवू लागला. 

कॉनसेप्टच्युअल आर्टमध्ये कल्पना वा संकल्पना मध्यवर्ती असते. जेव्हा हा आर्ट फॉर्म वापरला जातो तेव्हा निर्णय व नियोजन आधी केले जाते व कलाकृती नंतर साकारते. कॉनसेप्टच्युअल आर्ट हे काहीही व कसेही असू शकते. त्याचे कारण असे, की पेंटर वा शिल्पकार त्यांच्या कल्पना कलाकृतीत उतरविण्यासाठी लागणारे रंग वा शिल्पाकृतीला लागणारे साहित्य व कौशल्य यांच्या वापराबद्दल आधीच विचार करतात. तर कॉनसेप्टच्युअल आर्टिस्ट त्यांच्या कल्पना वा विचारांच्या अभिव्यक्तीसाठी कुठलेही साहित्य व आकारांचा वापर करतात. यात वर्णन, निवेदनापासून सादरीकरणापर्यंत काहीही येऊ शकते. कॉनसेप्टच्युअल आर्टिस्ट जरी कुठलीही नेमकी शैली वापरत नसला तरी 1960 च्या उत्तरार्धात यात काही नवीन पाखंडे अस्तित्वात आले. जॉन बाल्देसरी व पिरो मॅनझोनी यांनी या कलाप्रकाराला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. नेपोलीयन बोनापार्टने म्हटल्यानुसार, "हजारो शब्दांपेक्षा एक चित्र खूप काही सांगून जाते', हेच खरे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com