शेतकऱ्यांसाठी ‘गवा’रूपी संकट...

रंगराव हिर्डेकर
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

वर्षभर काबाडकष्ट करून, रक्ताचं पाणी करून भरघोस आणलेलं पीक शेतातून खळ्यात आणि खळ्यातून घरात येईपर्यंत काय होईल, सांगता येत नाही. त्याला कारण आहे गवा आणि वन्यप्राणी.

      संकटे कधी एकटी येत नाहीत. शेतकऱ्यांच्या पाचवीला तर ती पूजलेलीच असतात. पाऊस जास्त झाला तरी संकट, कमी झाला तरी संकट आणि नाही झाला तरी संकट; मात्र निसर्गानं साथ दिली, पाऊसकाळ चांगला झाला आणि मनासारखं पीक आले तरी घरात येईल की नाही, याचीही शाश्‍वती नाही. गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या डोंगराळ तालुक्‍यातील शेतकऱ्यांसमोर एक वेगळंच नाईट लाईफ सुरू झालं आहे. त्याच्या आधी ते नाईट लाईफ विजेच्या रूपानं येत होतं आणि आता येत आहे राखणदारीच्या रूपानं.

वर्षभर काबाडकष्ट करून, रक्ताचं पाणी करून भरघोस आणलेलं पीक शेतातून खळ्यात आणि खळ्यातून घरात येईपर्यंत काय होईल, सांगता येत नाही. त्याला कारण आहे गवा आणि वन्यप्राणी. ठराविक गावांत ठराविक प्राण्यांची मक्तेदारी आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. उदा. मोर-लांडोर यांचा कळप, गवे, टस्कर हे एकदा ठाण मांडले की त्या परिसराला ते सरावून जातात आणि तेथेच तळ ठोकतात. तसेच गव्यांबाबत झाले आहे. त्यांनी पन्हाळा, शाहूवाडी तालुक्‍यांतच तळ ठोकल्याने शेतशिवारात जाण्यास शेतकरी धजावत नाहीत.

काही वर्षांपासून जिल्ह्यातील डोंगराळ तालुक्‍यातील शेतकरी धास्तावलेला आहे. त्यांच्यासमोर टस्कर आणि गवारूपी संकट येऊन उभं ठाकलं आहे. त्यांच्याशी दोन हात करण्यात शेतकरी समर्थ आहे; पण त्याचे हात कायद्याने बांधले आहेत. त्यामुळे उभ्या पिकातील त्यांचा धुडगूस हवालदिल होऊन पाहत राहण्याशिवाय पर्याय नाही. दिवसभर जंगलात विश्रांती घेऊन सांजवेळेला शेतकऱ्याचा काळरूपी गवा डोंगर उतरू लागतो. तो कधी एकटा असतो तर कधी कळपाने. मग काय मका, ऊस, भात त्याच्या वाटेत जे येईल त्याचा फडशा पाडून गवा आडोशाला विसावतो किंवा आल्या वाटेने जंगलात परत फिरतो. डोंगराळ तालुक्‍यात हत्ती आणि गव्यांच्या कळपांकडून पिकांचे नुकसान होत आहे. शिवाय, बेसावध शेतकऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. जीव मुठीत घेऊनच पीक रक्षणाच्या मोहिमेवर जावे लागत आहे. डोंगररानातील पाण्याचे स्रोत आटल्याने हिरवा चारा व पाण्याच्या दिशेने कळप शेतशिवारात घुसत आहे.

प्रामुख्याने पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा आदी तालुक्‍यांत गव्यांची बेसुमार उत्पत्ती झाली असून, त्यांचे कळपच्या कळप शेतात घुसून पिके उद्‌ध्वस्त करीत आहेत. दहा वर्षांत जिल्ह्यातील गावागावांत, शिवारात गव्यांचे कळप अक्षरशः धुमाकूळ घालत उसासह मका, भुईमूग व अन्य पिके फस्त करीत आहेत. गव्याने नुकसान केलेल्या पिकांना उसासाठी वन विभागाकडून प्रतिगुंठा ७८४ रुपये भरपाई मिळते. मिळणारी भरपाई आणि होणारा खर्च याचा ताळमेळ शासनाच्या अधिकाऱ्यालाच कळू जाणे. पण, शेतकऱ्याच्या हिशेबाचा ताळमेळ मात्र बसत नाही. गेल्या पाच ते सहा वर्षांत गव्यांच्या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू ओढवला आहे. अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहेत.
दाजीपूर (ता. राधानगरी) गव्यांसाठी आरक्षित अभयारण्य असले तरीही पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, भुदरगड, आजरा व चंदगड आदी तालुक्‍यांतही गव्यांची बेसुमार उत्पत्ती झाली आहे.

इतर ब्लॉग्स