मुलींनो, आता स्वसंरक्षण शिका नाहीतर...

अर्चना बनगे
Thursday, 13 February 2020

अनेक गोष्टी अनेक जणी मनात दाबून ठेवतात आणि अशाच गोष्टीचा काही वेळेस स्फोट होऊन आयुष्याला कलाटणी मिळून जाते. स्वसंरक्षण, संघटितपणे जाणे आणि आपले ध्येय निश्‍चित करण्यासाठी धडपडणे या त्रिसूत्रीचा युवतीने वापर केल्यास नक्कीच समाजातील काही प्रकारांना आळा बसेल... 

कधी दिल्लीत, कधी बिहारमध्ये तर कधी आपल्या महाराष्ट्रात युवती आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढतेच आहे. खरोखरच आज रस्त्यावरून सहजपणे जातानाही आपण सुरक्षित आहोत का, असाच प्रश्न पडतो. आज मुली प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेत असल्या तरी आपल्या संरक्षणार्थ त्यांनी नेहमीच सज्ज राहण्याची आता गरज निर्माण झाली आहे. त्यांच्यामध्ये आत्मनिर्भरता वाढून संघटितपणे प्रसंगाशी मुकाबला करण्यासाठी त्याची आवश्‍यकता आहे.

शहराबरोबरच ग्रामीण भागातील मुलीही आता शिक्षणाला विशेष महत्त्व देत आहेत. शिक्षण घ्यायचे आणि स्वतःच्या पायांवर उभे राहायचे हे मोठे स्वप्न घेऊन त्या महाविद्यालयात प्रवेश करतात. रोज बस स्थानकापासून महाविद्यालयापर्यंत जाताना अनेकदा युवतींना एकटीने प्रवास करावा लागतो. अशा वेळी त्यांच्यात असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. सध्याच्या बदलत्या काळात एकूणच आपण जे मनमोकळेपणाने वागतो त्या मनमोकळेपणाने वागण्याचा कोण कसा अर्थ घेईल याची शाश्वती नसते. अशातच या बाबी घरात सांगितल्या जात नाहीत. त्यातून वेगळा अर्थ निघतो. प्रसंगी शिक्षणही बंद होते. कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावामध्ये बारावीनंतर मुलींना शिक्षणासाठी पाठवण्यास पालक फारसे उत्सुक नसत.

सध्याच्या काळात मुलींनी प्रत्येक बाबीला सामोरे जाण्यासाठी स्वतःला सक्षम करणे आवश्‍यक आहे. मुलींनी शक्‍यतो एकटे राहण्यापेक्षा संघटितपणे प्रवास करावा. संरक्षण ही आता काळाची गरज बनली आहे. ज्याप्रमाणे आपण आहाराकडे लक्ष देतो, अभ्यासाकडे लक्ष देतो, व्यायामाकडे लक्ष देतो, त्याप्रमाणे आपले स्वरक्षण आपणच करण्यासाठी मुलींनी आता सज्ज राहण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये आता मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहेत. अशा प्रशिक्षणाला मुलींनी महत्त्व देण्याची गरज निर्माण झाली आहे. कधी प्रसंग आला तर दोन हात करण्याची तयारी ठेवावी.

जेव्हा मुली दोन हात करण्याचा प्रयत्न करतील तेव्हा समाजही धावून येईल. अनेक वेळा रस्त्यावरच मुला-मुलींचे वादावादीचे प्रसंग सुरू असतात; मात्र हे नेहमीचेच झाले, असे म्हणून अनेक जण कानाडोळा करतात. मुली जर सक्षम बनल्या तर त्या नक्कीच कोणत्याच गोष्टीला घाबरणार नाहीत. दुसऱ्या बाजूस आपल्या मैत्रिणीशी  संबंध चांगले ठेवून काही गोष्टी शेअर केल्या तर त्यातून नक्कीच दिलासा मिळू शकतो. अनेक गोष्टी अनेक जणी मनात दाबून ठेवतात आणि अशाच गोष्टीचा काही वेळेस स्फोट होऊन आयुष्याला कलाटणी मिळून जाते. स्वसंरक्षण, संघटितपणे जाणे आणि आपले ध्येय निश्‍चित करण्यासाठी धडपडणे या त्रिसूत्रीचा युवतीने वापर केल्यास नक्कीच समाजातील काही प्रकारांना आळा बसेल असे वाटते.

इतर ब्लॉग्स