शेवटी त्यासाठीही निमित्त लागतेच की....हॅपी व्हालेंटाईन.

प्रसाद इनामदार 
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

धापा टाकत तो ठरलेल्या रेस्टॉरंटच्या दारात पोचला. हातातला फुगा, टेडी, चॉकलेट, गुलाबाची फुले सावरत सावरत तिला शोधू लागला. पोचायला झालेल्या उशिराबद्दल काय कारण द्यायचे याचा विचार करत त्याची भिरभिरती नजर तिचा शोध घेत होती. कोठेच दिसत नाही म्हटल्यावर "बरे झाले तिलाच वेळ झाला. आता आपण तिलाच जाब विचारू...' या विचाराने त्याला जरा बरे वाटले; मात्र त्याचं हे बरं वाटणं अगदी क्षणिक होतं. ""किती उशीर?'' पाठीमागून तिचा आवाज आल्याबरोबर त्याचं अवसान गळालं..."ए थोडा वेळ होईल... म्हणून मी मेसेज टाकला होता. तू पाहिला नाहीस का?'' ""थोडा म्हणजे तासभर ...? तुझे हे नेहमीचं झालं आहे.

धापा टाकत तो ठरलेल्या रेस्टॉरंटच्या दारात पोचला. हातातला फुगा, टेडी, चॉकलेट, गुलाबाची फुले सावरत सावरत तिला शोधू लागला. पोचायला झालेल्या उशिराबद्दल काय कारण द्यायचे याचा विचार करत त्याची भिरभिरती नजर तिचा शोध घेत होती. कोठेच दिसत नाही म्हटल्यावर "बरे झाले तिलाच वेळ झाला. आता आपण तिलाच जाब विचारू...' या विचाराने त्याला जरा बरे वाटले; मात्र त्याचं हे बरं वाटणं अगदी क्षणिक होतं. ""किती उशीर?'' पाठीमागून तिचा आवाज आल्याबरोबर त्याचं अवसान गळालं..."ए थोडा वेळ होईल... म्हणून मी मेसेज टाकला होता. तू पाहिला नाहीस का?'' ""थोडा म्हणजे तासभर ...? तुझे हे नेहमीचं झालं आहे. तू कधीही वेळ पाळत नाहीस'' ती सपशेल चिडली. आता मात्र त्याने तातडीने माघार घेतली. विषय फार ताणला तर पुढचे काही तास फक्त वादच होत राहणार आणि संवाद दुरावला जाणार आणि आज त्याला ते मुळीच नको होतं. ""कान पकडून सॉरी...सगळं आवरून बाहेर पडायला वेळ झाला... बरं चल...'' म्हणत त्याने तिचा हात हातात घेतला आणि दोघेही त्यांच्या ठरलेल्या टेबलला जाऊन बसले. त्याने पुन्हा एकदा तिची माफी मागितल्यानंतर तिचा राग निवळला आणि गप्पांची मैफल रंगली. विषयांना बंधन नव्हतेच. आजच्या खास दिवशी दुसरा कोणता विषय असेलच कसा. आणलेल्या भेटींची एकमेकांना देवाण घेवाण झाली. त्याबद्दल एकमेकांचे कौतुकही झाले. ""इतका खर्च कशाला केलास'' असे लटकेच ती म्हणाली आणि ""तुझ्यासाठी कायपण'' असं सांगत त्यानं हा विषयच गप्पातून बाजूला केला. आजचा व्हॅलेंटाईन त्यांच्यासाठी खास होता. खरे तर प्रेम करायला व्हॅलेंटाईन डेच हवा अशा मताची ती दोघेही नव्हती; पण त्यानिमित्ताने दोघांनाही एकमेकांचा सहवास जास्तीत जास्त मिळणार म्हणून दोघेही आजचा दिवस एन्जॉय करत होते. गप्पा संपता संपत नव्हत्या. विषयांची कडी जोडली जात होती... एकाला दुसरा... दुसऱ्याला तिसरा...विषय गुंफला जात होता...संवाद अधिकच गहिरा होत राहिला...आणि आता निरोपाची वेळ जवळ आली...दोघांचेही डोळे भरले...तशाच भरलेल्या डोळ्यांनी दोघांनी सेल्फी घेतला...ते आनंददायी क्षण मनात साठले होतेच... आता ते सेल्फीतही बंदिस्त झाले...ती आठवणींची शिदोरी हवी तेव्हा खुली करून पुनःप्रत्ययाचा आनंद दोघांनाही घेता येणार होता.... 

त्याने तिचा हात हातात घेतला. पिशवीतून मोगऱ्याचा गजरा काढून तिच्या हाती दिला. निरोपाचा क्षणही सुगंधी व्हावा आणि तो सुगंध पुढील भेटीपर्यंत दरवळत राहावा...तिने भरभरून सुवास घेतला....गजरा तिच्या हातात आणि त्याच्या ओंजळीत सुटलेली काही फुले उरली. तिने गजरा माळला आणि तिच्या नखशिखांत सौंदर्याला जणू पूर्ण रुप आलं. आता दोघेही निःशब्द होते. मुक्‍या भावना शब्दरुप येण्याची प्रतीक्षा करत होत्या. ""दिवस छान गेला...'' तो बोलला. ""हूँ'' पुन्हा केव्हा असे क्षण....""पाहू की'' ""ए बाकी काही म्हण...हे डे साजरे करण्याचे फॅड तुला आणि मला दोघांनाही आवडत नाही...पण तरीही आजचा दिवस आपण साजरा केलाच की...'' तो मौनाचे भाषांतर करू पाहत होता. 

""कसे दिवस फुलपाखरासारखे उडून गेले. पन्नास वर्षांपूर्वी आपण एकमेकांचे झालो आणि माझ्या आयुष्याची नाव एका भक्कम बंदराला लागली. एकमेकांना साथ देत आपण इथपर्यंत आलो. एकमेकांसाठी जगत राहिलो...किती संकटे आली दोघे सोबत राहिलो. सहवासाचं अत्तर आयुष्य सुगंधी कसं करेल हे पाहिलं. कोणी काहीही म्हणो मला वाटतं आजच्या दिवशी एकमेकांप्रती कृतज्ञ होण्यासाठीचाच आहे. शेवटी त्यासाठीही निमित्त लागतेच की....हॅपी व्हालेंटाईन. 

इतर ब्लॉग्स