शहाणे सासरेबुवा

संजय पाठक
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

शेवटी कसंय, प्रेमानं मिळून-मिसळून राहाणं अन्‌ आपलं आपलं करत अलिप्त राहाणं यात अलिप्त राहाणाऱ्याचा तोटा असतो नां. तुम्ही जसे वर्तन कराल तसेच समोरचा तुमच्याबाबतीत वर्तन करेल. म्हणून आजपासून तुमचे जीवन नव्याने जगा, नव्याने काही शिका.

स्माईलचा पासवर्ड

सोलापूर-सातारा प्रवासात ज्येष्ठ व्यक्ती बसमध्ये माझ्या बाजूला बसली. काही वेळातच आमची छान गट्टी जमली. बोलणं सुरू झालं. रिटायरमेंट लाइफ एंजॉय करतोय, मस्त लिमिटेड खाणं-पिणं, मित्रांबरोबर वॉकिंग, न्यूज चॅनल पाहतो, यू-ट्यूबवर मराठी नाटकं पाहतो. कधी कधी मित्राकडे कॅरमची मैफल जमवतो असे सांगत अचानकच त्यांची गाडी त्यांच्या सुनेवर अडकली. सून चांगली न मिळाल्याची त्यांची खंत होती. 
त्याविषयी हळूहळू बोलते केल्यावर ते म्हणाले, नोकरी करते म्हणजे जणू उपकारच करते, माझं काही म्हणून काम करत नाही. घरातही फार काही करत नाही. सतत बेडवर पडून मोबाईल पाहाते वगैरे वगैरे... दीर्घकाळ त्यांचे हे विचार ऐकून मला लक्षात आलं की सूनबाई यांची कामं करत नसल्याचा राग आहे. 
हळूच मी म्हटलं, कसंय तुम्ही थोडं शहाणे सासरेबुबा व्हा नं...! 
माझ्या या वाक्‍यासरशी ते चमकून माझ्याकडे पाहायला लागले.... 
म्हणजे...? 
अहो, म्हणजे काय म्हणजे, तुम्ही नवनवीन गॅझेटस वापरताय, पोषाख नव्या स्टाइलचा करता पण तुमचे घरातील वर्तन अगदी सत्तरीच्या दशकातले आहे. तुम्ही निवांत बसणार अन्‌ तुमची सगळी कामं सुनेनं करावी अशी अपेक्षा करणार. जरा त्यांच्या भूमिकेत शिरून विचार करा नं. 
तुम्ही सकाळी लवकर उठताच आहात तर स्वतःसह त्यांचाही चहा बनवा, भाजी चिरणं, पोळी भाजणं, कुकर लावणं अशी कामं तुम्ही करा. त्या ऑफिसला गेल्यावर भाजी आणणं, ती निवडून फ्रीजमध्ये ठेवा. लाइट, फोनबिल, टीव्हीचा रिचार्ज त्यांनी जी पेवरून मारण्याची अपेक्षा करण्यापेक्षा तुम्ही पायी जाऊन ही कामं करा. तेवढाच तुमचा व्यायाम होईल. नव्या ओळखी होतील. क्वचितप्रसंगी बाहेरून येताना त्यांच्यासाठी काही खायला आणा. सून ऑफिसातून आल्यावर त्यांच्या हातात वाफाळता चहाचा कप ठेऊन तर पाहा, त्यापण तुमची किती काळजी घेतील ते. शेवटी कसंय, प्रेमानं मिळून-मिसळून राहाणं अन्‌ आपलं आपलं करत अलिप्त राहाणं यात अलिप्त राहाणाऱ्याचा तोटा असतो नां. तुम्ही जसे वर्तन कराल तसेच समोरचा तुमच्याबाबतीत वर्तन करेल. म्हणून आजपासून तुमचे जीवन नव्याने जगा, नव्याने काही शिका. त्यासरशी त्यांना "स्माईलचा पासवर्ड' गवसल्याचे मला जाणवले, अन्‌ ते मौनात गेले. बहुधा मनातल्या मनात ते नव्याने जगण्याचे प्लॅनिंग आखत असावेत. 
महाराष्ट्र

इतर ब्लॉग्स