विश्‍वास (बोधकथा)

शब्दांकन : व्यंकटेश कल्याणकर
शनिवार, 8 एप्रिल 2017

काही महिन्यांनी तरुण पुन्हा मित्राला भेटायला आला. "धन्यवाद मित्रा. हा तुझा चेक', असे म्हणत त्याने मित्राकडे चेक दिला. चेक पाहून मित्राला आश्‍चर्य वाटले. "अरे, हा तर मी तुला दिलेलाच चेक आहे. जशाच तसा. तू काहीच पैसे काढले नाहीस का?', मित्राने विचारले. "नाही. मी तुझा चेक वापरला नाही. एक रुपयासुद्धा वापरला नाही. फक्त मला हवे तेवढे पैसे माझ्याकडे आहेत हा विचार मला मोठमोठे व्यवहार करण्यासाठी बळ देत होता. मी या चेकचा हवाला देत अनेकांकडून मदत मिळविली. ती मदत परतही करत आहे. आता मी पुन्हा उभा राहिलो आणि आता माझा व्यवसाय चांगला सुरू आहे', तरुणाने खुलासा केला.

व्यवसायात तोटा झाल्याने एके दिवशी एक तरुण प्रचंड अस्वस्थ झाला. त्यावेळी त्याला एका जवळच्या मित्राची आठवण आली. तो त्याच्याकडे गेला. तरुणाने मित्राला सगळे दु:ख सांगितले. मित्राने त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. तू प्रयत्न कर, पुन्हा उभा राहा, असे त्याने सांगितले. पण पैसे नसल्याने आता आपण काहीच करू शकत नाहीत, या विचारापर्यंत तरुण पोहोचला होता. शेवटी त्याला धीर देण्यासाठी मित्राने स्वाक्षरी केलेला स्वत:चा एक चेक तरुणाकडे सोपवला आणि म्हणाला, "हा माझा चेक आहे. आतापर्यंतची माझी कमाई माझ्या खात्यात आहेत. तुला हवा तो आकडा टाकून तू हवे तेवढे पैसे तू काढू शकतोस. तुझ्याकडे जेव्हा येतील तेव्हा परत दे.' चेक दिल्याने तरुणाचा उत्साह वाढला. त्याने मित्राचे मनापासून आभार मानले. व्याजासह पैसे परत देण्याचे आश्‍वासन देत, चेक घेऊन तरुण निघाला.

काही महिन्यांनी तरुण पुन्हा मित्राला भेटायला आला. "धन्यवाद मित्रा. हा तुझा चेक', असे म्हणत त्याने मित्राकडे चेक दिला. चेक पाहून मित्राला आश्‍चर्य वाटले. "अरे, हा तर मी तुला दिलेलाच चेक आहे. जशाच तसा. तू काहीच पैसे काढले नाहीस का?', मित्राने विचारले. "नाही. मी तुझा चेक वापरला नाही. एक रुपयासुद्धा वापरला नाही. फक्त मला हवे तेवढे पैसे माझ्याकडे आहेत हा विचार मला मोठमोठे व्यवहार करण्यासाठी बळ देत होता. मी या चेकचा हवाला देत अनेकांकडून मदत मिळविली. ती मदत परतही करत आहे. आता मी पुन्हा उभा राहिलो आणि आता माझा व्यवसाय चांगला सुरू आहे', तरुणाने खुलासा केला.

त्यावर मित्र म्हणाला, "खरं सांगू. माझ्या बॅंकेत फार काही पैसे नसतानाही मी तुला चेक दिला. मला माहिती होते माणसाला कठीण प्रसंगात पैशाची नव्हे तर विश्‍वासाची गरज असते. माझा तुझ्यावर विश्‍वास होता आणि तुझा या चेकवर. त्यामुळेच तर तू पुन्हा उभारी घेऊ शकलास आणि उभा राहिलास.'

हे ऐकून तरुणाला आश्‍चर्य वाटले आणि दोघांच्याही डोळ्याच्या कडा ओलावल्या.

(शब्दांकन : व्यंकटेश कल्याणकर)

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या