नवरा, बायको आणि सासू

व्यंकटेश कल्याणकर
गुरुवार, 13 जुलै 2017

"प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं परिस्थिती हाताळायची असते. त्यासाठी कोणतेही आदर्श नसतात. चला. लंच टाईम झाला', वरिष्ठाने समारोप केला.

ऑफिसचा लंच टाईम झाला. सगळे जण जेवणासाठी एकत्र आले. नव्याने लग्न झालेला एक जण थोडासा अस्वस्थ दिसत होता. एका सहकार्याने त्याला विचारले, "का, रे भावा आधी लग्न होत नव्हतं म्हणून चेहरा पडलेला असायचा. आता लग्न झालं तरी...' तेवढ्यात "काही नाही रे. लग्नापूर्वी विचारणारं कोणीच नव्हतं. एकटा जीव सदाशिव. आता विचारणारं कोणीतरी आहे त्याचा त्रास होत असेल', दुसऱ्या एका सहकार्याने मध्येच मत मांडलं. त्यावर पुन्हा तिसरा बोलला, "हे असचं असतं राव. लग्नापूर्वी आनंदात असतो माणूस. लग्नानंतर..'

वरिष्ठ सहकारी सर्वांना थांबवत म्हणाला, "अरे, त्याला बोलू तरी द्या. काय झालयं ते?' त्यानंतर काही काळ शांतता झाली. "बोल रे. मोकळं हो', एका सहकार्याने त्याला प्रोत्साहन दिलं. पुन्हा काही काळ शांतता पसरली. त्यानंतर अस्वस्थ सहकारी बोलू लागला, "अरे काही नाही राव. रोज बायको आणि आईला सांभाळून त्रास होतोय.' त्याने व्यथा मांडली. "छोड दो यार. सगळ्यांच्या घरी तेच आहे', एकाने उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली. "आमच्या घरी तर सगळं चांगलं आहे राव. असलं काही नाही', एकाने अभिमानाने सांगितले. "तुझी आई गावाकडं. बायको आणि तू इथं. मग सगळं चांगलचं असणार', अन्य एकाने त्याची परिस्थिती सांगितली. त्यावर अन्य एक जण म्हणाला, "तुझं बरं आहे. नाही तर आम्हाला रोज एकमेकींबद्दलच्या तक्रारी ऐकाव्या लागतात राव' त्यावर वरिष्ठ सहकारी बोलू लागला, "अरे एकमेकींना विश्‍वासात घेऊन समजून सांगायला हवं. त्याचा त्रास करून घेण्यात काय अर्थ?' "बोलायला सोप्पयं राव. घरी गेलं की बघा अक्षरश: बैल होतो', एकाने व्यथा मांडली.

वरिष्ठ सहकाऱ्याने दीर्घ श्‍वास घेतला. तो म्हणाला, "हे बघा माझ्या लग्नाला बारा वर्षे पूर्ण झाली आहेत. तुमच्यासारखी परिस्थिती माझ्याही घरी निर्माण झाली असती. मात्र मी वेळीच सावरलो. लग्नाआधीच बायकोला आणि आईला एकमेकींबद्दल सांगितलं. प्रत्येकीचा स्वभाव बारकाईने समजून घेतला. दोघींमध्ये वाद होण्याच्या जागा शोधून काढल्या. त्यावर उपाय शोधला.' पुन्हा एकाने सांगितले, "अहो फक्त बोलायला सोप्पं आहे. पण प्रत्यक्ष..', त्याला थांबवत वरिष्ठ म्हणाला, "मी बघ ना मी करून दाखवलं ना' आणखी काही जणांनी वरिष्ठाच्या म्हणण्यावर आक्षेप नोंदवला.

"थांबा मी सविस्तर सांगतो' असे म्हणत वरिष्ठ बोलू लागला, "हे बघा. लग्न म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघांच्या आयुष्यातील मोठा बदल असतो. मुलगी जन्मल्यापासून ज्या घरात असते ते सोडून येते. तर मुलावर बायकोची मोठी जबाबदारी येऊन पडते. तसचं मुलीच्या घरातील लोकांनाही मुलीची काळजी वाटू लागते. म्हणजे मुलगा कसा असेल? नीट सांभाळेल का? तर मुलाच्या घरातील आई-वडिल यांना insecure वाटू लागतं. त्यातूनच मुलाच्या आईमधील "सासू' जन्म घेते. त्यामुळे सासू सुनेवर वर्चस्व गाजवायचा डायरेक्‍ट-इनडायरेक्‍ट प्रयत्न करते. नेमकी हीच गोष्ट सूनेला खटकते.' त्याला थांबवत एक जण म्हणाला, "होय, होय. सासू म्हणजे सारख्या सूचना. तर सून म्हणजे सूचना नको' त्यावर सगळेजण हसले. "जोक बाजूला ठेवा राव. सिरीअस विषय आहे. अरे भावा, ही थिएरी सांगितली. प्रॅक्‍टिकली सांगा ना', एका अविवाहित सहकार्याने वरिष्ठाला आणखी बोलायला प्रवृत्त केलं.

"हे बघा. सासू जन्म घेते म्हणजे ती सूनेला घरातील परंपरा सांगू लागते. त्याचे पालन करावे, अशा ती अपेक्षा करते. सूनेशी जराशा वेगळ्या पद्धतीने तुटक वाटावे असे बोलते. तर मुलींशी बोलताना अतिशय आनंदात प्रेमाने बोलते. या सगळ्या प्रकारात नवऱ्याने बायकोचं काही ऐकलं की गेला बायकोच्या अधीन हे ठरलेलं वाक्‍य', वरिष्ठाने स्पष्ट केले. त्यावर "होय, होय आमच्या घरात असेच होते' अस्वस्थ सहकार्याने दिलखुलासपणे वरिष्ठाच्या मताला दाद दिली. "हे प्रॅक्‍टिकल झालं. आता अशा परिस्थितीत आपण नवऱ्यांनी काय करावं ते सांगा जरा', अविवाहित सहकारी पुन्हा मार्गदर्शन मागू लागला. "पहिली गोष्ट दोघींना विश्‍वासात घेऊन एकमेकींबद्दल आपुलकी निर्माण होईल असं बोलायचं. दुसरं दोघीही कायम घरकामात किंवा नोकरीमध्ये बिझी राहतील असं बघायचं. तिसरं दोघींसमोरही दोघींपैकी कोणाचीही कौतुक किंवा टीका करायची नाही', वरिष्ठाने अनुभवकथन केले.

"काही म्हणा राव पण दोघींना सांभाळनं अवघड आहे. त्यापेक्षा वेगळं राहिलेलं परवडत. कटकट नाही', वेगळं राहणाऱ्या एकाने मत मांडलं. "ज्या आईनं आपल्यासाठी कष्टाचे दिवस काढलेत तिला घराच्या बाहेर काढायचं?', एकाने प्रश्‍न उपस्थित केला. "आईला घराबाहेर काढणं कोणत्याही परिस्थितीत वाईटच. पण दोघींनीही एकमेकींना समजून घ्यायला हवं. सूनेला मुलीएवढे नाही; पण तिच्या मनात परकेपणाची भावना निर्माण होऊ नये एवढे प्रेम द्यायला हवे. नव्या नवरीची मोठी जबाबदारी नवऱ्या मुलावर असते. त्याच्या भरवशावर ती मुलगी नव्या घरात आलेली असते. त्यामुळे तिचं काही चुकलं तरीही तिला प्रेमाने समजून सांगण्याचं कौशल्य त्यानं डेव्हलप करायला हवं', वरिष्ठानं पुन्हा मार्गदर्शन केलं. त्यानंतर काही काळ शांततेत गेला. "प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं परिस्थिती हाताळायची असते. त्यासाठी कोणतेही आदर्श नसतात. चला. लंच टाईम झाला', वरिष्ठाने समारोप केला.

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या