'खिलोना नही है वोटिंग मशिन'

अनिश सुतार
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

मतदान राबविणारा अधिकारी Free and Fair Election होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो पण शेवटी त्याला देखील हातात बंदूक घ्यावीच लागते. त्याला लष्करी सुरक्षा पुरवणाऱ्या अधिकाऱ्याच्या वाक्याची, 'यह बंदूक देश का भार हैं. और वो भार हमारे कँधोपर हैं' अशी प्रचिती येते. किंवा कदाचित नक्षलवादी आपल्या हक्कांसाठी बंदूक का उचलतात याचं उत्तर त्याला स्वतःच्याच कृतीतून मिळतं.

'दंडकारण्य'....छत्तीसगडमधील नक्षलवादी कारवायांनी त्रस्त असलेलं एक गाव. रामायणातले पौराणिक संदर्भ असलेल हे गाव आज मात्र अनेक बाबतीत पिछाडीवर. त्यातच गावात मतदान होऊ घातलेलं. आदिवासी भागात होणाऱ्या या मतदानाबद्दल साहजिकच सर्वांचीच उदासीनता. अशातच एक सच्चा आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी मतदान राबवण्यासाठी त्या गावात येतो. नक्षलवाद्यांची रिस्क असतानादेखील पोलिंग बुथवरच मतदान घेण्याचा अट्टाहास धरतो आणि त्यात तो यशस्वीही होतो. पण मतदानाच्या या सर्व प्रक्रियेत त्याला जे अनुभवायला मिळतं, ज्या गोष्टींमुळे तो अस्वस्थ होतो, असहाय्य होतो या सर्वाचा परिपाक म्हणजेच 'न्यूटन'...

चित्रपटात भारतातील सामाजिक विषमतेवर नेमके बोट ठेवले आहे. स्वातंत्र्योत्तर भारताने प्रगती केली खरी पण ती किती वरवरची आहे याची जाणीव चित्रपट पाहताना वारंवार होत राहते. 
चित्रपटात एक संवाद आहे. 

अधिकारी आदिवासी महिलेला विचारतो,

'क्या तुम भी निराशावादी हो?' 

ती पटकन उत्तरते,

'नही ,में आदिवासी हूँ...' 

तिचं हे वाक्य आपल्याला जिव्हारी लागतं. आदिवासी हे खरं तर आशा-निराशा या सर्वांच्यापलीकडे असतात. त्यांना फक्त जगायचं असतं...शांतपणे...निसर्गाच्या सान्निध्यात...आणि निसर्गाशी equillibrium राखत...

चित्रपटात एके ठिकाणी अधिकारी आदिवासींना मतदानाचं महत्व सांगताना दाखवलाय. पण त्यांच्यातील संवाद पाहताना जाणवतं की, आपण आदिवासींशी धड संवादही साधू शकत नाही. त्यांना काय कळणार आहे मतदान? हक्क? लोकशाही? सामाजिक न्याय? GDP-विकासदर यांच्यातच आपण इतके अडकलो की आदिवासींना आपण पिछाडीवरच सोडलं. त्यांना आपल्यासोबत घेऊन नाही येऊ शकलो. त्यांना भारताच्या विकासात भागीदार नाही बनवू शकलो. ही खंत सिनेमा पाहताना सारखी बोचत राहते.

आजच्या काळात कुणी कर्तव्यनिष्ठ असेल तर त्याला वेडं ठरवलं जातं. मतदान राबविणारा अधिकारी Free and Fair Election होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो पण शेवटी त्याला देखील हातात बंदूक घ्यावीच लागते. त्याला लष्करी सुरक्षा पुरवणाऱ्या अधिकाऱ्याच्या वाक्याची, 'यह बंदूक देश का भार हैं. और वो भार हमारे कँधोपर हैं' अशी प्रचिती येते. किंवा कदाचित नक्षलवादी आपल्या हक्कांसाठी बंदूक का उचलतात याचं उत्तर त्याला स्वतःच्याच कृतीतून मिळतं. कारण Free and Fair Election राबवण्याच्या नादात स्वतःच हातात बंदूक उचलल्यामुळे त्याच्याही नकळत तो सुद्धा एक नक्षलवादी झालेला असतो. इथे एक वर्तूळ पूर्ण होतं आणि चित्रपट संपतो...पण आपल्या डोक्यात उठलेलं विचारांचं काहूर काही संपत नाही...

(तरूण लेखक अनिष सुतार संगीतकार, गीतकार आणि ब्लॉगरही आहेत. http://osathire.blogspot.in हा त्यांचा ब्लॉग.)

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या