
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची २८ मे २०२३ रोजी १४० वी जयंती. जगातल्या अनेक साहित्यिकांनी त्यांच्या त्यांच्या भाषेसाठी भाषाशुद्धीची चळवळ
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची २८ मे २०२३ रोजी १४० वी जयंती. जगातल्या अनेक साहित्यिकांनी त्यांच्या त्यांच्या भाषेसाठी भाषाशुद्धीची चळवळ केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या मराठी भाषेसाठी केलेली चळवळ अतुलनीय आहे.
- प्रा. डॉ. शैलेश विश्वनाथ त्रिभुवन
विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी २८ मे १८८३ रोजी झाला. समाजसुधारक, कवी व लेखक म्हणून ते सर्वश्रुत आहेत, तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषा शुद्धी व लिपीशुद्धी या चळवळींचे प्रणेते होते.
तसेच ते मुंबई येथे झालेल्या १९३८ च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी १०,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत.
त्यांच्या ‘सागरा प्राण तळमळला’, ‘हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा’,‘जयोस्तुते’, ‘तानाजीचा पोवाडा’ या कविता लोकप्रिय आहेत. अखंड सावधान असावे,१८५७ चे स्वातंत्र्यसमर, अंदमानच्या अंधेरीतून , अंधश्रद्धा भाग १, अंधश्रद्धा भाग २, संगीत उत्तरक्रिया , संगीत उःशाप, ऐतिहासिक निवेदने, काळे पाणी, क्रांतिघोष ,
गरमा गरम चिवडा,गांधी आणि गोंधळ ,जात्युच्छेदक निबंध,जोसेफ मॅझिनी ,तेजस्वी तारे, नागरी लिपीशुद्धीचे आंदोलन, प्राचीन अर्वाचिन महिला, भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने, भाषा शुद्धी, महाकाव्य कमला , महाकाव्य गोमांतक,माझी जन्मठेप, माझ्या आठवणी – नाशिक, माझ्या आठवणी– पूर्वपीठिका,
माझ्या आठवणी– भगूर ,मोपल्यांचे बंड, रणशिंग,लंडनची बातमीपत्रे, विविध भाषणे, विविध लेख, विज्ञाननिष्ठ निबंध, शत्रूच्या शिबिरात, संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष, सावरकरांची पत्रे, सावरकरांच्या कविता, स्फुट लेख, हिंदुत्व,हिंदुत्वाचे पंचप्राण, हिंदुपदपादशाही, हिंदुराष्ट्र दर्शन, क्ष-किरणे आदी त्यांची पुस्तके आज उपलब्ध आहेत.
बंद कोठडीतील काळ्या पाण्याची शिक्षा, पशुतुल्य शारीरिक श्रम, हातापायात साखळदंड अशा प्रतिकूल परिस्थितीत सावरकरांना स्फुरलेले म्हणजे ‘कमला’. सावरकरांचे कमला हे महाकाव्य वाचताना चंद्रासारखे शीतल वाटते.
सावरकरांनी ब्रिटनमध्ये राहून ‘सागरा प्राण तळमळला’ लिहिले. वेदनेतून निर्माण झालेल्या या अप्रतिम काव्यातून महापुरुषाचं मातृभूमीवरचं प्रेम आणि तिच्या भेटीआड येणा-या सागरावरचा रोष प्रकट झाला आहे. ‘कमला’ या खंड काव्यासाठी सावरकरांनी पानिपत ही मध्यवर्ती कल्पना मनाशी बाळगली होती.
नाट्यसृष्टीतील साडेतीन शक्तिपीठ
सावरकर यांनी लिहिलेली साडेतीन नाटके मनोरंजनापलीकडील असून त्यातील मतितार्थ नव्या पिढीसाठी प्रेरणादायक आहे. ही नाटके म्हणजे नाट्यसृष्टीतील साडेतीन शक्तिपीठ आहेत, असे प्रतिपादन अभिनेते प्रमोद पवार यांनी केले होते. १९२७ मध्ये संगीत ‘उःशाप’ हे पहिले नाटक सावरकर यांनी लिहिले. त्याचा मुख्य विषय ‘अस्पृश्यता निवारण झाले पाहिजे’, हा आहे.
१९३१ मध्ये सावरकर यांचे ‘संन्यस्त खड्ग’ हे नाटक आले. याचे प्रयोग ‘बलवंत नाटक मंडळ’ यांनी सादर केले. या नाटकात ‘शब्द शक्तीचे महत्त्व पटवून देणे’, हा उद्देश दिसून येतो, असे नाटकात सुचवले आहे. १९३३ मध्ये सावरकर यांनी ‘उत्तरक्रिया’ हे नाटक लिहिले. ज्याचा प्रयोग ‘भारत भूषण संगीत मंडळ’ यांनी केला आहे.
हे नाटक ऐतिहासिक आहे. यात सावरकर यांनी ‘रोटीबंदी आणि समुद्रबंदी यांनी जखडलेले हिंदूराष्ट्र या बेड्या तोडून एक प्रबळ राष्ट्र होईल’, असा आशावाद खुलवला आहे. सावरकरांच्या तीनही नाटकांची कथा बीजे ही ध्येयवादी दृष्टीची असल्याचे जाणवते. ते स्वतः ‘नाटकाकडे केवळ आनंद निर्मिती म्हणून न पाहता संसार कसा असावा ? हे ही नाटकात दाखवले पाहिजे’, असे म्हणतात.
सावरकरांचे भाषाशुद्धीचे कार्य म्हणजे त्यांनी महाराष्ट्राला दिलेली एक अमूल्य अशी भेट आहे.भाषाशुद्धीचे महत्त्व फार पूर्वी सावरकरांच्या लक्षात आले होते. त्यांनी एप्रिल ,मे १९२५ मध्ये भाषाशुद्धीचा आग्रह धरत व केसरी या वृत्तपत्रातून लेखन केले.त्या काळी त्यांना मराठी साहित्यिकांचा विरोध पत्करावा लागला.
महाराष्ट्र साहित्य परिषदेने जळगाव येथे माधव पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनात त्यांचे भाषाशुद्धीचे तत्त्व मान्य करण्यात आले. सुरवातीच्या काळात प्रत्यक्ष पटवर्धन त्याचे कट्टर विरोधक होते ,पण नंतर ते उपासक बनले.त्यांनी त्यांच्या अनेक कविता पुन्हा शुद्ध स्वरूपात लिहिल्या आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मराठीत अनेक प्रतिशब्द निर्माण केले, ते शब्द नुसतेच शब्द नव्हते तर, त्या परकीय भाषेतील शब्दाला अगदी तंतोतंत बसणारे मार्मिक व दर्जेदार होते. उदा.तारीख या शब्दाला दिलेला दिनांक हा प्रतिशब्द बघितला तर दिन आणि अंक म्हणजे तारीख या शब्दाला इतका योग्य कुठल्याही भाषेत असणार नाही.
नवीन लिपी विकसित
आपल्या मराठी चित्रपटसृष्टीवर सावरकरांचे प्रचंड ऋण आहेत. सावरकरांच्या मते, परदेशी भाषेतील शब्द जरी आपल्याला घ्यावे लागले, तरी त्यातील उदात्तता कल्पना अगाध ज्ञान सुरेख वाक्यप्रचार त्याज्य नाहीत. जे उत्तम लोकहितवर्धक अनुकरणीय असेल ते कोणाकडूनही घ्यावे, इथे मानपानाचा प्रश्न नाही.
भारतवर्षाचे तात्त्विक ज्ञान आणि कला यांचे परकीयांवर इतके ऋण आहे की त्यांच्या आजच्या दुकानातून आम्ही त्यांच्या सामानाची कितीही उचल केली तरी, ते ऋण न फिटणारे आहेत. त्यामुळे काही शब्द जसेच्या तसे वापरले तरी चालतील. उदा. टेबल ,कोर्ट ,टाय यासाठी उगाचच अतिरेकी मराठी वापर टाळावेत.
मराठी शब्द रूढ करण्यासाठी समाजातील केवळ काही लोकांनी निश्चय केला पाहिजे. त्यासाठी शिक्षक ,लेखक ,राज्यकर्ते ,समाजातील अनेक उच्चपदस्थ व्यक्ती यांनी याचा वापर करणे नेटाने चालू ठेवले पाहिजे. पुस्तके छापण्यासाठी मुद्रकांना दोनशे टंक लागत होते. सावरकर त्यासाठी फक्त प्रतिशब्द देवून थांबले नाहीत.
तर त्यासाठी त्यांनी नवी लिपी तयार केली उदा.जसे स्वीकार केला, स्वीकारला, प्रतिकार केला-प्रतीकारले असे स्वतंत्र शब्द दिले. या सर्वांचे जनकत्व सावरकरांकडे जाते. गणपतराव नलावडे जेव्हा पुणे शहराचे मेयर झाले. त्याचवेळी सावरकरांनी त्यांना लिहिलेल्या पत्रात मेयर या शब्दाला महापौर हा शब्द प्रथम वापरला आहे.
सावरकर यांनी दिलेले शब्द
१) तारीख /दिनांक
२) टॉकी/बोलपट
३) डायरेक्टर /दिग्दर्शक
४) इन्टरर्व्हल /मध्यंतर
५) रिपोर्ट /प्रतिवृत्त
६) कॉर्पोरेशन /महापालिका
७) सुपरवायझर /पर्यवेक्षक
८) अर्जंट /त्वरित
९) कॉलम /स्तंभ
१०) फी /शुल्क
११) कायदा /निर्बंध
१२) नंबर /क्रमांक
१३) कॉश्चूम /वेशभूषा
१४) सिनेमा /चित्रपट
१५) म्युन्सिपाल्टी /नगरपालिका
१६) मेयर / महापौर
१७) किंमत/मूल्य
१८) ट्रस्टी /विश्वस्त
१९) कोरम / गणसंख्या
२०) शहीद /हुतात्मा
२१) खानेसुमारी /शिरगणती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.