"मोड'लेलं सावरणारी "ती'.... 

after father's death daughter struggle
after father's death daughter struggle

    परिस्थिती माणसाला घडवते. जगायला शिकवते. येईल त्या परिस्थितीशी दोन हात करत कोण स्वत:ला तारतो, कोण खचतो, तर कोण ओढवलेल्या परिस्थितीने पराभूत होतो. परिस्थितीला कसे तोंड द्यायचे, याची पायवाट अनेकांनी तयार केली आहे. या पायवाटेतून अनेकांनी जीवनाचा मार्ग यशस्वी केला. 
शहराशेजारच्या एका गावात मराठवाड्यातून पोट भरण्यासाठी आलेलं एक कुटुंब. रोज गावात कडधान्याचे मोड विक्री करून संसारगाडा चालवते. घरचा कर्ता पुरुष पहाटे सायकलवरून मोड विकायचा. सकाळी 10 नंतर शहरातील दुकानात नोकरीही करायचा. संध्याकाळी त्याची पत्नी बाजारात बसून मोड विकायची. यातून त्यांच्या दोन अपत्यांचं पालनपोषण आणि संसाराचं जीवनगाणं व्यवस्थित सुरू होतं. अचानक एक दिवस घरचा कर्ता पुरुष जग सोडून निघून गेला आणि या हातावरचे पोट असणाऱ्या कुटुंबावर दुखांचा डोंगर कोसळला. त्यात हे मराठवाड्यातून या नवख्या गावात भाड्याने राहत असलेलं कुटुंब, शेजारधर्म चांगला राखल्याने आणि काही नातेवाईक शहराच्या आजूबाजूला असल्याने. त्यांना या प्रसंगात अनेकांनी धीर दिला. धीर देणारे किती दिवस धीर देणार? आणि सांत्वन तरी करणार?. यांना यांची जगण्याची लढाई तर रोजच करायची होती. चौकोनी कुटुंबांपैकी कर्त्या पुरुषाची पत्नीच काय तो निर्णय घेणार होती. रोजीरोटीचा प्रश्‍न होता. पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा. 

मुलगी रोहिणी (नाव बदलले आहे) सातवीत शिकते, बाप गेल्याच्या चौथ्यादिवशी आईची परिस्थिती तिने जाणली आणि आईलाही 
ती म्हणाली, "मम्मे! मी उद्यापासून सकाळी मोड विकणार. हे ऐकताच आईही कोड्यात पडली. होकार द्यावा की नकार, हेच तिला समजेना. मुलीचा विचार ऐकून तिलाही समोर संसाराचा थांबणारा गाडा दिसला. मुलगी सातवी शिकते आणि या वयात तिला फिरून मोड विकायचं काम कसं सांगावं, हेच कळेना. मुलगीचा हट्ट थांबेना. समोरची परिस्थिती आणि मुलगीचा हट्ट यातून तिने काळजावर दगड ठेवून पहाटे मोड विकण्याची तिला संमती दिली. 
डिसेंबर-जानेवारीतली पहाटेची थंडी, कोवळी उन्हं पडली तरी जायचं नाव घेत नव्हती. कुडकुडणाऱ्या थंडीत रोहिणी पहाटे पाच वाजता उठायची स्वेटर, कानटोपी घालून. तिच्या लाडक्‍या पप्पाची सायकल काढायची आणि मोड घ्या मोड.. अशी हाळी देत गल्लोगल्ली फिरू लागली. 

सकाळ साडेआठ-नऊपर्यंत ती मोड विकून घरी परतायची आणि आवरून शाळेला जाण्याच्या तयारीला लागायची. आता सकाळची शाळा सुरू झाल्यामुळे रोहिणी संध्याकाळी बाजारात मोड विकते. दुपारी परीक्षेचा अभ्यास करते. दोन महिन्यांपूर्वी बाप गेल्याचं दु:ख पचवत ती हे काम करते आणि कुटुंबाला हातभार लावते. 
आज अनेक घरात मुलांचे हट्ट पुरविण्यासाठी आईबाबा पोरांसाठी नानातऱ्हा करतात. टीव्ही आणि मोबाईलच्या गेम्समध्ये तासन्‌तास मुलं डोकं घालून बसतात. रोहिणीसारखी परिस्थिती कोणावरही येऊ नये, पण मोबाईल काढून घेतला म्हणून चिडचिड करणाऱ्यांनी या रोहिणीवर आलेली परिस्थिती माणसाला कशी घडवत असते, यांचा वस्तुपाठ आदर्श म्हणून समोर ठेवावा इतकेच. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com