
मराठी साहित्य संमेलन... स्वमग्न साहित्यिकांकडून कशाची अपेक्षा ?
काल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. जेम्स लेनच्या निषेधाचा ठराव पारीत केला. आयोजक, अध्यक्षांचे आभार. पण, लेनचं ते पुस्तक आलं ते 17 वर्षांपूर्वी. या काळात 17 संमेलनं झाली. यात एकदाही हा ठराव का घेतला नाही? लेनचा निषेध करण्यासाठी सारस्वतांनी एवढा उशीर का लावला? की या संमेलनात हजेरी लावणार्या थोर साहित्यिकांसह स्वतःचेच 'कौतुक' करून घेत हे साहित्यिक इतरांचे पुस्तके वाचतच नाहीत, त्यांची माहिती ठेवतच नाहीत? उत्तर द्या पाटील. महामंडळाचे अध्यक्ष म्हणून तुमचे चारच दिवस बाकी आहेत. चार दिवसांनी आम्ही पत्रकार सोडाच 'सांग पाटला काय करू म्हणणारे' 'अत्यंत स्वाभिमानी' साहित्यिकही तुम्हाला 'विचारणार' नाहीत. दुसरीकडे मात्र विद्रोही साहित्य चळवळीच्या मागील प्रत्येक संमेलनात प्रा. प्रतिमा परदेशी, किशोर ढमाले जेम्स लेनचा निषेध करत आले. काल तर विद्रोहीमध्ये 'महामानवांची बदनामी' या विषयावर स्वतंत्र परिसंवाद झाला. त्यामुळे त्यांचे खरे आभार आणि कौतुक.
हेही वाचा: साहित्य संमेलन
आणखी एक सांगण्यासारखे म्हणजे काल अ. भा.च्या संमेलनात महात्मा बसवण्णा यांच्या विचारांवर परिसंवाद झाला. बसवण्णांचे समतेचे विचार रुजावे असा यातील सूर होता. महाचर्चा झाली. ती व्हायलाच हवी. पण, चर्चेनंतर चर्चेत सहभागी विचारवंत, मान्यवर वक्ते व्हीआयपी खानावळीत गेले अन् खुर्च्या मांडणारे हात दुसर्या मंडपात जाऊन रांगेत ताट घेऊन उभे राहिले. हीच का समानता, समता? काहीच वेळापूर्वी सांगितलेले बसवण्णांचे विचार कुठे गेले? याच वेळी विद्रोहीच्या मंडपात नंदुरबारच्या आदिवासींसोबत बसून संमेलनाध्यक्ष गणेश विसपुते उरली सुरली खिचडी खात होते. तिथे बसवण्णांची समानता कृतीत दिसली. अ. भा.ने कविकट्ट्यासाठी तब्बल ३१० नवोदित कवींना पत्र पाठवले. त्यात विशीतील पोरांपासून ते चार-पाच पुस्तकांचे लेखक अन् त्याचे स्वतःच वाचक असलेले ५० ते ६० ज्येष्ठ पण तुमच्या लेखी नवोदित कवीही होते. या संमेलनात कविता वाचली म्हणजे कवी म्हणून आतातरी मान्यता मिळेल अशी त्यांना भाबडी आशा होती. पण, त्यांच्यासाठीचा सभामंडप पार शेवटच्या टोकाला टाकलेला होता. जणू गाव कुसाबाहेरची वस्तीच. तिकडे ना मान्यवर साहित्यिक फिरकले ना रसिक. श्रोते म्हणून होते ते कवी अन् त्यांच्या सोबत आलेले. पण त्या ठिकाणी अनेकांनी दर्जेदार कविता सादर केल्या. तर पहिल्या दिवशी मुख्य सभामंडपात झालेल्या निमंत्रिताच्या कविसंमेलनात खुद्द अध्यक्ष विश्वास वसेकर यांनी 'प्रश्नोतर' ही अत्यंत सुमार दर्जाची कविता सादर करून इज्जत घालवली. नाही म्हणायला हबीब भंडारे आणि इतर काही कवींनी अत्यंत चांगल्या कविता सादर करून कविसंमेलनात रंगत आणली.
हेही वाचा: शुद्धलेखनाच्या आग्रहामुळे गावागावांतील मुलांच्या पिढ्या बरबाद झाल्या'; साहित्यिक राजन गवस
आणखी एक विद्रोहीच्या समारोपाच्या कार्यक्रमात सूत्रसंचालक निवेदन करताहेत की स्वतःच्या कवितांतांचे वाचन यांचे भान त्या महोदयांना नव्हते. एक वाक्य झाले की हे महोदय यांच्यावर माझी कविता आहे असं म्हणत कविता वाचत. कार्यक्रम अगोदरच लांबलाय, लोक आपल्या सूत्रसंचालनाला कंटाळले त्यांना आपल्या कविता नाही तर रविशकुमार, नागनाथ मंजुळे यांना ऐकायचे यांचे भानच त्या महोदयांना नव्हते. त्यांना नव्हते ते ठीक. पण, विद्रोही साहित्य चळवळीच्या प्रा. प्रतिमा परदेशी यांनाही असे भान नसावे हे अतीच झाले. उद्घाटनाच्या दिवशी भाषणात जे मुद्दे मांडले होते तेच थोड्याफार फरकाने पुन्हा त्यांनी समारोपात 'ओरडून' मांडले. एकाच विचारपीठावरून एकच भाषण दुसर्याच दिवशी रिपीट का? ऐकणारे सुज्ञ होते, विचारी होते तरीही हे का? ताई समारोपाला तुम्ही प्रास्ताविक केले नसते तरी चालले असते. किंवा इतरांना संधी दिली असली तर भाषण वेगळे झाले असते. 'सगळीच जबाबदारी तुम्ही घेण्याऐवजी वाटून द्या' हे तुम्हीच तर विचारफेरीचे बॅनर लावत असलेल्या किशोर ढमाले यांना परवा फेरीच्या सुरुवातीला सांगितले होते ताई. पण, तुम्हीच विसरला असो. दोन्ही संमेलन छान झाली. भव्य-दिव्य झाली.
Web Title: Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan And Writers
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..