पिकांसोबत पर्यावरणाचेही संवर्धन करूया !

डॉ. प्रमोद फरांदे
गुरुवार, 21 मे 2020

रासायनिक खताच्या अतिवापरामुळे सोन्यासारखे पीक होणाऱ्या जमिनींना क्षारपडीचा कर्करोग जडू लागला आहे. जिल्ह्यात 9 हजार 504 हेक्‍टर क्षेत्र क्षारपड बाधित झाले आहे. यामागचे मूळ कारण, रासायनिक खताच्या वापराचे दरवर्षी वाढते प्रमाण हे आहे. माती तयार होण्यास लाखो वर्षे लागतात.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अन्नधान्याची कमतरता भासू नये यासाठी राज्य सरकारतर्फे खरीप हंगामाची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. कृषी विभागाची राज्यपातळीपासून ते जिल्हा, तालुका पातळीपर्यंत तयारीची लगीनघाई सुरू आहे. राज्यातील कृषी विभाग कामाला लागला. जादा दराने बियाणे, खत विक्री, लिंकिंग करणाऱ्या दुकानांवर कृषी विभागाचे छापासत्र जोमात आहे. ही झाली प्रशासकीय तयारी. दुसरीकडे, शेतकरी राजानेही कोरोनामुळे बसलेला फटका विसरून खरिपासाठी कंबर कसली आहे. हा अन्नदाता शेतीच्या मशागतीसह बी-बियाणे, खते खरेदीच्या लगबगीत आहे; मात्र हे खरेदी करताना दुकानदार हाच त्याचा मोठ्या प्रमाणावर मार्गदाता असल्याने तो सांगले तेवढे बियाणे, विशेषत: खते, औषधे वापरली जातात. कोणत्या पिकाला किती खते, औषधे वापरावीत, अतिवापराचा दुष्परिणाम काय होतो, याची सविस्तर माहिती देणारी यंत्रणा तालुका व गावपातळीवर सक्षम नसल्याने विक्रेता सांगेल ती 'पूर्व दिशा' याप्रमाणे अनेकांची शेती सुरू असते. शिवाय जास्त खत टाकले तर जादा उत्पादन मिळते, हे अज्ञान त्याच्या आर्थिक पिळवणुकीला हातभार लावते.

रासायनिक खताच्या अतिवापरामुळे सोन्यासारखे पीक होणाऱ्या जमिनींना क्षारपडीचा कर्करोग जडू लागला आहे. जिल्ह्यात 9 हजार 504 हेक्‍टर क्षेत्र क्षारपड बाधित झाले आहे. यामागचे मूळ कारण, रासायनिक खताच्या वापराचे दरवर्षी वाढते प्रमाण हे आहे. माती तयार होण्यास लाखो वर्षे लागतात. ती एकदा क्षारपड झाली तर कर्करोगाप्रमाणे कितीही औषधोपचार केला तरी ती पूर्वीइतकीच चांगली होईल याची शाश्‍वती नसते. हे झाले मातीबाबत. पिकाचे उत्पन्न वाढविणाऱ्या मधमाशा, कीडरोगांना खाणाऱ्या मित्रकिडीचेही अस्तित्व संपत चालले आहे. जैवसाखळीच नष्ट होत चालली आहे. रासायनिक खत, औषधांचा मातीतील अंश पाणी, धान्यात उतरून तो प्राणी, मनुष्याच्याही शरीरात उतरत आहे. त्यामुळे साहजिकच त्याचे आरोग्यावर मोठे दुष्परिणाम होत आहेत. पर्यावरणासाठीही रासायनिक खत, औषधांचा अतिवापर घातक ठरत आहे. रासायनिक खताचा अतिवापर ग्लोबल वॉर्मिंगसारख्या जागतिक समस्येला हातभार लावत असल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबत ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅंड विद्यापीठात उसावर संशोधन करण्यात आले.

या संशोधनाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. वेजिंग वांग यांच्या म्हणण्यानुसार, उसाला जे नत्रयुक्त खत वापरतो त्यामधून वर्षाला हेक्‍टरी 5 ते 25 किलो नायट्रोजन नायट्रस ऑक्‍साईडच्या स्वरुपात हवेत उडून जातो. मातीचा प्रकार, हवामान, नत्रयुक्त खत यावर त्याचे प्रमाण अवलंबून असते. यातून हे सिद्ध होते, की पिकांना टाकलेल्या अतिरिक्त रासायनिक खताचा पिकांना काहीच फायदा होत नाही. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, नत्रयुक्त रासायनिक खतामधून हवेत उडून जाणारे नायट्रस ऑक्‍साईड हे कार्बन डायऑक्‍साईडपेक्षा 300 पट अधिक घातक आहे. शिवाय या अतिरिक्त रासायनिक खताचा पिकांच्या उत्पन्नवाढीसाठी काहीच उपयोग न होता उलट उत्पादनवाढीलाच फटका बसतो. त्यामुळे रासायनिक खतांचा बेसुमार वापर हा आर्थिक नुकसानीसह जमीन, पाणी, हवा, पशुपक्षी, सूक्ष्म जीवजंतूंसह मनुष्यास हानिकारकच ठरत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे पर्यावरणस्नेही शेतीची पद्धत अवलंबिणे ही पृथ्वीच्या हिताचे आहेच; शिवाय आपल्या पूर्वजांनी जमिनीचा पोत जपला त्यामुळे चांगली कसदार जमीन आपल्यापर्यंत आली. पुढच्या पिढीलाही कसदार जमीन देणे हे आपले कर्तव्य नाही काय?
 

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या