'उसने मेरा दिल जीत लिया...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Always help the needy so that they will feel very satisfied.jpg

आपण सगळेच दिवाळीच्या धुंदीत आहोत. समाजात काही लोकं अशीही आहेत, ज्यांचा एक वेळच्या जेवणासाठी संघर्षं सुरू आहे. वय झाले असतानाही, कष्ट करण्याची क्षमता नसूनही ही माणसे झगडत आहेत. कष्ट करत आहेत. कशासाठी तर फक्त दोन वेळच्या जेवणासाठी.

'उसने मेरा दिल जीत लिया...'

दिवाळी दोन दिवसांवर आल्यामुळे जरा जास्तच कामे होती. दुसरे म्हणजे कामे आवरून दुसऱ्या दिवशी घरीही म्हणजे श्रीगोंदयाला जायचे होते. यामुळे आजच सगळी कामे आवरून घ्यायची असे ठरवून सकाळी लवकर उठलो. मग लगेच सगळी आवराआवर करून बाहेर पडलो. पिंपरीमध्ये एक काम असल्यामुळे तिकडे जायचा बेत आखला. तिकडे गेलो, तिथले काम आवरून परत बाजीराव रोडला एका मित्राचे काम होते. आता ते आवरता आवरता दुपारचे चार वाजत आले होते. मग ते मित्राचे काम आवरून आता मोर्चा घराकडे म्हणजे नांदेड सिटीकडे वळविला.

सकाळी फक्त नाष्टा करून बाहेर पडलो होतो. दिवसभरामध्ये काहीही खाल्ले नव्हते. खायला वेळच भेटला नाही. फक्त दोन-तीन वेळेस नेहमीच्या सवयीप्रमाणे चहा झाला. आता गाडी नेहमीच्या स्पीडने राजाराम ब्रिजकडून मेन सिंहगड रोडकडे वळविली. दुपार असली तरी रोडने गर्दी होतीच. कारण दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली होती. भूक लागल्याने गाडी जरा वेगात चालवत होतो. आता मी वडगाव ब्रिजजवळ आलो आणि सिग्नल पडला. मी नेहमी येथे आलो की, सिग्नल पडलेलाच असतो. आज जरा जास्त भूक लागलेली असल्यामुळे आणि सिग्नल पडल्यामुळे दोनचार शिव्या मनामध्येच हासडल्या. 

माझ्या बाईक समोर दोन-तीन गाड्या उभ्या होत्या. माझी नजर अचानक समोर गेली, तर एक 55 ते 60 वर्षांची व्यक्ती माझ्यासमोर उभ्या असलेल्या बाईकवाल्या जोडप्याला पेन घेण्याची विनंती करत होती. समोर असलेल्या जोडप्याच्या राहणीमानावरुन ते अगदी इलाईट क्लासचे वाटत होते. त्या पेन विकणाऱ्या गरीब माणसाने दोनदा विनंती करताच मागे बसलेल्या त्या तिशीतल्या मॅडम चांगल्याच भडकल्या. त्या मॅडम त्या व्यक्तीस म्हणाल्या, तुला एकदा सांगितलेले कळत नाही का? नकोत आम्हाला तुझे पेन. 

आता मात्र त्या व्यक्तीने त्यांचा नाद सोडून देऊन ती व्यक्ती तशीच पुढे माझ्याकडे सरकली. मी लगेच आपले खिशातून 20 रुपये काढून त्यांना दिले. त्या व्यक्तीने मला लगेच दोन पेन द्यायला हात पुढे केला, तर मी म्हणालो, नको मला पेन, राहुद्या. असे म्हणताच ती व्यक्ती मला म्हणाली, 'नाही साहेब पेन घ्या, मला असे फुकट पैसे नकोत कोणाचे.' असे म्हणताच मला कोणी शहाण्या व्यक्तीने चपराग लगावल्याचा भास झाला. तेवढ्यात सिग्नल सुटला. 

सिग्नल सुटल्यामुळे मी त्या आजोबांना म्हणालो, या इकडे बाजूला पेन घेतो. आणि मी ब्रिजच्या बाजूला रिक्षा लागतात त्या ठिकाणी बाईक घेतली. ते आजोबाही लगोलग माझ्या मागे आले. त्यांनी मला दोन पेन देत म्हणाले, 'साहेब मी भीक मागणारा नाही, मला तुमचे असेच पैसे नकोत. हे दोन पेन तुम्ही ठेवून घ्या.' ते बोलणे ऐकून आता मात्र मला त्या व्यक्तीशी संवाद साधण्याची तीव्र इच्छा झाली. पोटात भुकेचे कावळे तर खूप ओरडत होते, पण आता माझ्यातला पत्रकार जागा झाला. आणि तो जागा झाला की, मी भूक-तहान सगळंच विसरतो.

मी त्या आजोबांना म्हणालो, तुम्ही असे पेन विकता पण तुमचे घर कुठे आहे? मुलंबाळं काय करतात तुमची? मी असा प्रश्न करताच त्या व्यक्तीचे डोळे पाणावले. ती व्यक्ती सांगू लागली, 'साहेब मी सांगलीचा आहे. माझे घर आहे पण, माझ्या बायकोचा मृत्यू 2012 ला झाला. त्यानंतर माझ्या दोन्ही मुलांनी त्यांच्या बायकांचे ऐकून मला घराबाहेर काढले. कारण माझ्या सुनांना मी मनोरुग्ण झाल्यासारखे वाटत होते. पण साहेब मी मनोरुग्ण अजिबात नाही. जिने 35 वर्षे साथ केली ती पत्नी अचानक सोडून गेल्यामुळे पार खचलो होतो. 

ती मला खूप जीव लावत होती, पण देवाला पाहवले नाही. म्हणून त्याने आमची ताटातूट केली. ती गेल्यामुळे मी खूप खचलो होतो. दोन-दोन दिवस जेवन करत नव्हतो. फक्त तिच्या वस्तूंकडे बघत बसायचो. यामुळे मला वेडे ठरवत सुनांनी घराबाहेर काढले. काय करू साहेब, म्हणून आता पोटासाठी पेन विकतो आहे. त्यांचे हे ऐकून माझी भूकच पळून गेली. मला आता त्या मघाशी माझ्या समोर बाईक असलेल्या इलाईट क्लास जोडप्याचा चांगलाच राग येऊ लागला. कारण तुम्ही एवढ्या मोठ्या घरातले असून, एवढे शिकलेले असून, जर तुम्हाला एखाद्या जेष्ठ व्यक्तीशी कसे बोलावे हे समजत नसेल तर जळले मेले ते तुमचे शिक्षण आणि तुमचा तो इलाईट क्लासही. 

ती व्यक्ती तुम्हाला काही भीक मागत नव्हती; तर त्याचा एक साधा पेन खरेदी करून 10 रुपये देण्याचीच माफक अपेक्षा करत होती. तुम्ही नाही त्या ठीकाणी  पिझ्झा, बर्गर, शॉपिंग मॉलमध्ये, थिएटरमध्ये हजारो रुपये वायफळ उडवता. मग अशा गरीब आणि गरजू व्यक्तीकडून एखादा पेन खरेदी केला तर बिघडले कुठे? पण काय करणार आमची मानसिकताच अशी झाली आहे. 

त्या व्यक्तीने पुढे सांगितलेल्या गोष्टीने मला धक्काच बसला. ती व्यक्ती म्हणत होती, साहेब तुम्हाला वाटतं मी अडाणी आहे, पण असे नाही, माझी बी.एस.सी. (B.sc) झाली आहे. आणि त्या व्यक्तीने मला चार-पाच वाक्ये स्पष्टपणे इंग्लिशमध्ये बोलून दाखवली. आता मात्र, माझी खात्री पटली की, या व्यक्तीने चांगले शिक्षण घेतलेले आहे. माझ्या खिशात अजून 50 रुपये होते, न राहवून ते काढून मी त्यांच्या हातावर टेकवत अजून पाच पेन घेतले आणि नांदेड सिटीकडे मार्गस्थ झालो.

संत मीराबाई एक ठिकाणी म्हणतात ना...

*मुरख को तुम राज दियत हो,
पंडित फिरे भिखारी
संतो, करम की गती न्यारी!!* 

देशाचे सध्याचे नेतृत्व आणि आसपासचे येणारे अनुभव पाहून असेच काही सुरू असल्याचा माझा आता ठाम समज होतो आहे. पण नांदेड सिटीत पोहचेपर्यंत एकच विचार सुरू होता. आपण आज दिवाळी खरेदी केली. सगळेच करत आहेत. दोन दिवसांवर दिवाळी आली आहे. सगळे शॉपिंग करत आहेत. आपण सगळेच दिवाळीच्या धुंदीत आहोत. समाजात काही लोकं अशीही आहेत, ज्यांचा एक वेळच्या जेवणासाठी संघर्षं सुरू आहे. वय झाले असतानाही, कष्ट करण्याची क्षमता नसूनही ही माणसे झगडत आहेत. कष्ट करत आहेत. कशासाठी तर फक्त दोन वेळच्या जेवणासाठी.

या लोकांची आपल्याकडून खूप काही अपेक्षा नसते. एक पेन घेऊन 10 रुपये द्यावेत एवढी माफक त्यांची अपेक्षा असते. आणि ती जर आपण पूर्ण करू शकत नसू तर आपण एवढे शिक्षण घेऊन देखील आपण अशिक्षित आहोत. आपल्या जाणिवा मेल्या आहेत. आणि जाणिवा मेलेला मनुष्य असू शकत नाही, असं मला दादा (माझे वडील) नेहमी सांगत असतात. हा अनुभव लिहिण्याचे एकच कारण आहे, हे वाचून तुम्ही एका तरी गरजूला मदत करावी. दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देऊन एवढी माफक अपेक्षा ठेवतो आणि रजा घेतो.!

- सागर डी. शेलार (8262049634)


संपादन - सुस्मिता वडतिले 

Web Title: Always Help Needy So They Will Feel Very Satisfied

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top