अस्वस्थ वर्तमान, कसा असेल भविष्यकाळ?

अमोल कविटकर
बुधवार, 13 मे 2020

शिरूरच्या घोडनदी पुलावर एक कुटूंब नजरेस पडलं पांडुरंग मोहित्यांचं.आपल्या कुटूंबियांसह सात दिवसांपूर्वी पायी अलिबागहुन आपल्या घराकडे म्हणजे सिंदखेड राजाच्या दिशेने निघाले होते.

'कोरोना आणला पासपोर्ट वाल्यांनी भोगताहेत रेशन कार्डवाले' कोरोना प्रादुर्भावाला सुरुवात झाली त्यावेळी सहज फिरलेला हा सोशल मीडियावरील मॅसेज इतका खरा ठरेल असं कदाचित कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल. पण हे खरं आहे. नरकयातना हा शब्द लाजेल इतकी भयाण परिस्थिती मोल-मजुरी करणाऱ्या वर्गाची आहे. संघटीत नसल्याने 'आवाज' नाही आणि आवाज नसल्याने दखल नाही. येईल त्या परिस्थितीशी दोन हात करत हा वर्ग कमालीचा संघर्ष करतोय. कोरोनापेक्षा संपलेल्या पैशाच्या भीतीने हा वर्ग कशाचाही पर्वा न करता घराकडे निघालाय. आपल्याला कोणी विचारेल, याची तसूभरही अपेक्षा करता मजूर घरची वाट धरताहेत. पुणे-शिरूरसारख्या औद्योगिक पट्ट्यात तर लॉकडाऊनच्या दीड महिन्यानंतरही मजूर रस्त्याने दिसताहेत. ऊन, वारा आणि पाऊस या कशाचीही तमा न बाळगता 'देवाक काळजी रे' या भावनेतून मजल दरमजल करत पुढे जाताहेत. हा वर्तमान अस्वस्थ करणारा तर आहेच पण भविष्यात काय वाढवून ठेवलंय याचा विचार करताना सुन्नता आणणारी.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

साम टीव्हीसाठी रिपोर्टिंग करताना शिरूरच्या घोडनदी पुलावर एक कुटूंब नजरेस पडलं पांडुरंग मोहित्यांचं. पांडुरंग आपल्या कुटूंबियांसह सात दिवसांपूर्वी पायी अलिबागहुन आपल्या घराकडे म्हणजे सिंदखेड राजाच्या दिशेने निघाले होते. सोबत तीन महिला, चार वर्षांचं पोर आणि थोडं फार सामान. पांडुरंग अलिबागला बांधकाम मजूर आहेत. जवळचे पैसे संपत आल्याने त्यांनी घरची वाट धरली. तापलेला डांबरी रस्ता आणि डोक्यावर ४० डिग्रीत तळपणारा सूर्य, अंगावर उन्हाने तळपलेल्या खुणा, एकीच्या पायात तर चप्पलही नव्हती आणि दुसरीची चप्पल घासून घासून तुटण्याच्या मार्गावर, असं हे अस्वस्थ करणारं चित्रं. पांडुरंग यांना चालता चालता शिरूर बाहेरचं तात्पुरतं उभं केलेलं केंद्र लागलं. घरी जायची सविस्तर चौकशी केली. उत्तरं मिळाली नाहीत. कसेबसे २४ तास काढून त्यांनी पुढची वाट धरली होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाची या व्यवस्थेने आपल्याला दाखवली ही क्रूरता. पाहताच क्षणी कोणालाही अस्वस्थ करेल असं चित्र. शिरूरच्या पुलावर सकल जैन समाजच्या वतीनं काहीच वेळात दोघींना चपलेची व्यवस्था झाली. पुरेसे पाणी, बिस्कीट पुडे, व्हिटॅमिन गोळ्या आणि फूड्स पॅकेट दिली गेली. विनंती करूनही हे कुटूंब थांबायला तयार नव्हतं. त्यांना घराची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. कोरोनाबाधितापेक्षा कित्येक पटीने यातना अशी लाखो कुटूंब भोगताहेत. या यातना शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर आहेत. कोणतीही चूक नसताना. काही मिनिटातच मोहिते कुटूंब नगरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाट धरुन निघून गेलं आणि त्याचबरोबर मनात कित्येक प्रश्नांचं काहूर माजलं. चांगली स्टोरी मिळाल्याचं समाधान मात्र अगतिक करून गेलं.

काही वेळ शिरूर फाट्यावरच थांबून राहिल्यावर सायकलवर येताना एक ग्रुप दिसला. त्यांची वाट अडवून काही वेळ थांबायला लावलं. हातातला कॅमेरा आणि बुम पाहून कशासाठी थांबवलंय, हे त्यांच्या लक्षात आलं. दोन-पाच मिनिटे त्यांना स्थिरस्थावर झाल्यावर पाणी आणि चहा बिस्किटाची सोय झाली. उन्हाने तळपत असणारे हे जीव काहीसे शांत झाले. संवाद सुरु झाला. हा ग्रुप चाकणच्या एका कंपनीत काम करणारा होता. सगळे मजूर उत्तरप्रदेशचे. मोहिते कुटुंबासारखीच यांची अवस्था. जवळचे पैसे संपत आलेले आणि पुन्हा काम मिळेल का? याची शाश्वती नाही. यांच्याही डोळ्यासमोर अंधार. जे काही होईल आयुष्याचं ते आता घरीच, ही त्यांच्या मनातील भावना.

उत्तरप्रदेशच्या या मजुरांनी दीडपट पैसे देऊन सायकली खरेदी केल्या होत्या आणि घरची वाट धरली होती. सोबत गॅस अटॅच असलेली शेगडी आणि थोडेफार तांदूळ. कोणी जेवणाची सोय केली तर ठीक नाहीतर आहे तिथं भात शिजवून खायचा. आसपासच्या रहिवाशांनाही मदत करायची इच्छा होतीच, पण कोरोनाची दहशत त्यांना जवळ जाऊ देत नव्हती. तीस-पत्तीशीच्या या डोळ्यात निराशेचे ढग स्पष्ट दिसत होते. डोळ्यांना न दिसणारा एक विषाणू आणि 'अंध' व्यवस्था प्रत्येकाच्या पापण्या ओल्या करत होती. पण इलाज नव्हता, जे पदरात वाढवून ठेवलंय त्याला सामोरं जायचं ही मानसिकता करुन सर्वांनी पॅडल टांग मारली. पुढे त्यांचं काय होणारं या विचाराने माझ्याही मनात काळजीचा अंधार घट्ट केला.

काही वेळातच आणखी एक ग्रुप पश्चिम बंगालच्या दिशेने निघाला होता. तर दुसरा पायी वाशीमच्या दिशेने. सर्वांमध्ये एक समान धागा होता. शारीरिक यातना सहन करूही, पण व्यवस्थेने छळलेल्या मानसिकतेचं काय?

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या