... आणि अचानक अंगावर रिकामेपण कोसळले

.. and suddenly emptiness collapsed on him
.. and suddenly emptiness collapsed on him

तुफान तो आना है 
आकर चले जाना है, 
बादल है ये कुछ पल का 
छाकर ढल जाना है..... 

गीतकार संतोष आनंद यांच्या या गीतपंक्ती खरंच किती आश्‍वासक आहेत. कवीला द्रष्टा का म्हणतात ते अशा वेळी कळते. खरंच का कवीला भविष्याची चाहूल लागते? आज जवळपास काही महिन्यांपासून जगात कोरोनारुपी तुफानाने थैमान घातले आहे. जे संकट सुरवातीला आपल्याला लांब वाटत होते, त्याने बघता बघता कधी आपल्या गावागावांत आणि घराघरांत प्रवेश केला, कळलंच नाही. अशावेळी या साथीच्या रोगाला कसे हाताळावे, याचे कोणत्याही देशाकडे उत्तर नव्हते, अजूनही नाही. सर्व काही trial and error पद्धतीने चालू आहे. 


जीवितहानी किंवा वित्तहानी या दोन पर्यायांपैकी भारताने वित्तहानीचा धोका पत्करून संपूर्ण देश लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आणि मार्चपासून आपण आपल्या घरांत बंदिस्त झालो. देशातील सर्व activities काही दिवसांसाठी थांबविल्या गेल्या. अत्यंत वेगाने फिरणाऱ्या आपल्या जीवनचक्राला अचानक ब्रेक लागला, आयुष्याची गतीच थांबली. जणू काही विधात्याने रिमोट कंट्रोलने पॉज बटण दाबले आणि अचानक अंगावर रिकामेपण कोसळले. येणारे काही दिवस आता आपल्याला सगळ्यांना घरातच बसून काढायचे आहेत, हे कळेपर्यंतच बरेच दिवस गेले. पहिल्या-पहिल्यांदा काय करावे हेच कळत नव्हते. बाहेर पण सर्वत्र भीतीचे वातावरण होते. माझ्यासाठी त्यातल्या त्यात एक गोष्ट दिलासादायक होती. चार दिशांना पांगलेले माझे कुटुंबीय आज घरात एकत्र होते. हळूहळू एक रूटीन सेट झाले. कोणालाच बाहेर जायचे नसल्याने सगळ्यांच्या मदतीने रोजची दैनंदिन कामे झाल्यावर भरपूर मोकळा वेळ मिळू लागला. 


अचानकपणे हाती आलेल्या या मोकळ्या वेळेचा मी सदुपयोग करायचे ठरवले. मला प्रवासवर्णने वाचायला खूप आवडते. या काळात मी मीना प्रभूंची सगळी प्रवासवर्णने वाचून काढली आणि मनाने त्या त्या देशांत फिरून आले. काही गोष्टी शिकायच्या होत्या, काही शिकले होते पण त्याचा सराव करायचा होता. रोजच्या धावपळीत वेळ नाही म्हणून बऱ्याच गोष्टी बाजूला सारल्या होत्या. लॉकडाउनमुळे मिळालेल्या वेळात मी अशा अनेक गोष्टींना उजाळा दिला. मी अजिबात इंटरनेट सॅव्ही नाही. पण आता मोकळा वेळ मिळाला आणि मुख्य म्हणजे मुलंही हाताशी होती, त्यामुळे internet संबंधित बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या. त्यांचा वापर करून मुलांकडून शाबासकी पण मिळवली !! स्वतःचाच अभिमान वाटला. 


बऱ्याच वर्षांपासून मी शास्त्रीय संगीत शिकत आहे. पण सरावासाठी हवा तसा वेळ मिळत नव्हता. त्यामुळे त्याची गोडी अनुभवता येत नव्हती. गेल्या काही दिवसांपासून मी you tube वर खूप शास्त्रीय संगीत ऐकते आहे. या छंदामुळे कठीण काळात पण मन प्रसन्न रहायला मदत झाली. न्यूज चॅनेल्समधून सतत कानावर आदळणाऱ्या भयावह बातम्या, कोरोनाबाधित रुग्णांची वाढती आकडेवारी, वर्तमानाची चिंता, भविष्याची अनिश्‍चितता अशा परिस्थितीत अजिबात निराश व्हायचं नाही, असे मी सतत स्वतःलाच बजावत होते. 


"रात ये भी गुजर जाएगी' असे म्हणत रोज उजाडणाऱ्या दिवसाला नव्याने सामोरे जायचे. सतत नकारात्मक बोलून आणि निराशाजनक विचार करून स्वतःचे आणि कुटुंबीयांचे मनःस्वास्थ्य बिघडवायचे नाही, त्याऐवजी किती वर्षांनी आपण सगळेजण एकत्र आलो आहोत हे दिवस एन्जॉय करायचे असे मी ठरवले होते. रोज नियमितपणे योगासने आणि मेडिटेशन करून मनावरचा ताण हलका करीत होते. बघता बघता लॉकडाउनचा तिसरा टप्पा संपत आलाय. हल्ली आपले आयुष्य इतके वेगवान झाले होते की कधी कधी असे वाटायचे की खरंच इतक्‍या वेगाची गरज आहे का? काळाची गती बदलली नाही, निसर्ग पण त्याच्या लयीत कार्यरत आहे. बदललो आहोत आपण. पूर्वीची शांत, निरामय जीवनशैली सोडून वेगाने पळता पळता कपाळमोक्ष करून घेण्यापेक्षा हळूहळू चालत राहून, वेळप्रसंगी थांबून एका जागी अथकपणे, अचलपणे उभे राहणे पण महत्त्वाचे आहे. 


संकटे येतच राहणार. आज जरी कोरोनावर लस उपलब्ध झाली तरी उद्या काहीतरी वेगळी समस्या निर्माण होऊ शकते. अशावेळी सकारात्मक विचार करून त्यातून मार्ग काढत राहणे आणि मनाची शक्ती योग्य दिशेने वळवून संकटावर मात करणे हीच आजच्या काळाची गरज आहे आणि आपल्यासाठी आव्हानही ! यामुळेच मानवतेचा विजय होणार आहे..!! 

महाराष्ट्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com