आप्पासाहेब पाटील सृजनशील व्यक्तिमत्त्व

- डॉ. अरविंद बुरुंगले, माजी सचिव, रयत शिक्षण संस्था, सातारा.
बुधवार, 20 मे 2020

आप्पासाहेब पाटील यांनी 1960 ते 2005 अशी 45 वर्षे रयत शिक्षण संस्थेच्या नवउभारणीत व विकासात खर्च केली. संस्थेशी ते एवढे एकरूप झाले की संस्था हेच माझे घर, हेच माझे विश्व..! अशी त्यांची भावना होती. संघटक हे पद त्यांनी कधी अधिकार म्हणून मानले नाही तर तो एक उच्च सन्मान मानला आणि प्रशासनात कधीही हस्तक्षेप केला नाही. 

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी हाडाची पुडं व रक्ताचे पाणी करून रयत वाढविली व फुलविली. रयत शिक्षण संस्थेची निर्मिती ही त्याग व सेवेतून झाली. आण्णांचा मृत्यूनंतर रयत पोरकी झाली. त्यावेळी कर्मवीरांचे सुपुत्र आप्पासाहेब भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या संघटकपदी निवड करण्यात आली. आप्पासाहेब म्हणजे सृजनशील, नितीमान असे व्यक्तिमत्त्व..! 

आप्पासाहेबांचा स्वभाव सहिष्णू आणि सहनशील होता. कर्मवीरांप्रमाणेच त्यांनीही रयत शिक्षण संस्थेसाठी लहानपणापासूनच प्रचंड त्याग केला. रयत माऊली लक्ष्मीबाईंचे निधन 1930 मध्ये झाले. अण्णांनी आपले चिरंजीव आप्पासाहेबांना बोर्डिंगमध्ये घातले. त्यावेळी इतर मुलांप्रमाणे त्यांना साधसुधं जेवण घ्यावं लागे. सफाई, गोठ्यातले शेण काढणे, भाकरी करणे ही सर्व कामे आप्पासाहेबांना करावी लागत. आप्पासाहेबांना राजाराम महाराजांनी त्यांच्या शिक्षणासाठी दर महिना दहा रुपयांची स्कॉलरशिप मंजूर केली. त्यावेळी 10 रुपयांचे मुल्य प्रचंड होते. आप्पासाहेब खूष होते. त्या 10 रुपयांची त्यांनी खूप स्वप्ने पाहिली होती. आप्पासाहेबांना 10 रुपयांची स्कॉलरशिप जाहीर झाली ही बातमी अण्णांना समजली. अण्णांनी आप्पासाहेबांना कोल्हापूरला भेटून विचारलं, की तुला महिन्याला किती खर्च येतो..! आप्पासाहेबांनी तीन रुपये खर्च येत असल्याचे सांगितले. त्यावेळी भाऊरावांनी आप्पासाहेबांना सांगितले कि तू तीन रुपयातच तुझा खर्च भागवत जा. उरलेले सात रुपये संस्थेत जमा कर. यानंतर स्कॉलरशिप चालू होती, तोपर्यंत आप्पासाहेब सात रुपये संस्थेत जमा करीत होते. हा आप्पासाहेबांचा संस्थेसाठीचा त्याग विसरून चालणार नाही. 
वालचंद हिराचंद यांनी बंगळूरला एका विमानाचा कारखाना काढला होता. त्यावेळी अण्णांचे व त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. आप्पासाहेबांनी अण्णांकडे त्या ठिकाणी नोकरी मिळावी म्हणुन शिफारसवजा चिठ्ठी मागितली. पण अण्णांनी अप्पासाहेबांना शिफारसपर चिठ्ठी दिली नाही. कर्मवीरांनी स्वतःची तत्वे आयुष्यभर जपली. 

आप्पासाहेब रयत शिक्षण संस्थेच्या स्टोअर्समध्ये मॅनेजर म्हणून काम पाहत होते. स्टोअर्सला नफा मिळत नसल्याने तिथून काही जणांना कमी करायचे ठरू लागले. त्यात अण्णांनी इतरांना कोणालाही कमी केले नाही तर आप्पासाहेबांना राजीनामा द्यायला लावला. आप्पासाहेबांना आता नोकरीची गरज होती म्हणुन ते धडपड करीत होते. तदनंतर ते विमा व्यवसायात उतरले. त्यांचा विमा व्यवसाय थोडासा सुस्थितीत सुरु होता, हे कर्मवीरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विमा अधिकाऱ्यांना आप्पासाहेबांच्या नफ्यातील काही रक्कम रयत शिक्षण संस्थेकरिता देण्यासाठी पत्र व्यवहार केला. तरीही आप्पासाहेबांनी कधीही तक्रार किंवा कुरकुर केली नाही. 

आणखी एक असाच प्रसंग घडला. आप्पासाहेबांनी पैसे रोख देऊन रुकडी येथून आणलेले शेंगांचे पोते भाऊरावांनी परत करायला लावले. आप्पासाहेबांनी त्यांना सांगितले की मी पोत्याचे पैसे दिलेत. पण अण्णांनी उत्तर दिले की, पण तू विकत आणलंय हे किती जणांना माहितेय? सगळ्यांना ते फुकटंच आणलंय असंच वाटणार..! आप्पासाहेबांनी ते पोते परत केले. पोते घ्यायला 16 रुपये लागले व परत करायला 24 रुपये गेले. 

कर्मवीर अण्णांच्या मृत्यूनंतर संघटकपदी निवड झाल्यानंतरही आप्पासाहेबांनी संघटक पदाचा अतिशय नम्रतेने पदभार सांभाळला. 
आप्पासाहेबांच्या आयुष्यात एक अत्यंत मोहाचा क्षण आला होता. सातारा मतदार संघात कॉंग्रेसकडून उमेदवारीची चाचपणी सुरु झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आप्पासाहेब यांना सर्कीट हाउसवर बोलावून उमेदवारी घेण्याचा आग्रह केला. एवढेच नव्हे तर निवडून आल्यानंतर उपमंत्री करण्याचे आश्‍वासनही दिले. यशवंतराव चव्हाण त्यावेळी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. नामदार झालो तर सत्ता संपत्ती पायाशी लोळण घालेल. आयुष्यभराची गरीबी व अवहेलना संपेल असे चित्र आप्पासाहेबांच्या डोळ्यासमोर आले. परंतु आपल्या वडिलांनी आयुष्य जाळून उभी केलेली संस्था सोडावी लागेल, या दु:खद भावनेने व अण्णांच्या संस्कारातून तयार झालेल्या घडणीतून आप्पासाहेबांनी आमदारकी नाकारली. त्यांनी दादासाहेब जगताप यांचे नाव सुचविले. हे दादासाहेब जगताप निवडून आले. आमदार झाले. नामदार झाले पण आप्पासाहेबांनी कधीही या गोष्टीचा पश्‍चाताप केला नाही. हा अण्णांचा संस्कार होता. 

यशवंतरावांच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या निवडणूक अर्जावर आप्पासाहेबांची सुचक म्हणून स्वाक्षरी असायची. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी देखील एक प्रसंग सांगताना म्हटले की, मी विदर्भाच्या दौऱ्यावर असताना एक मित्र भेटला. त्याला मी विचारले की, कसं काय चाललय? तो म्हटला एकदम झकास..! गाडी घेतलीय. बॅंक बॅलन्स भरपूर आहे. पवार साहेबांनी आश्‍चर्याने विचारले कसं काय? करतोस तरी काय? तो म्हटला काही नाही. बी.एड कॉलेज काढलंय..! पवार साहेब पहातच राहिले. आज एक शाखा असलेला माणूस कोट्यधीश होतो आणि आप्पासाहेबांसारख्या पाचशेच्यावर शाळा व पन्नासवर कॉलेज असणाऱ्या बापाचा मुलगा महिना पंधराशे रुपयांवर आनंद मानतो..! ही अवघ्या जगाने सॅल्युट करण्यासारखी गोष्ट आहे. कर्मवीरांच्या संस्कार, विचारातून आप्पासाहेबांची झालेली घडण होती, म्हणुनच हे शक्‍य झाले. 
आप्पासाहेबांनी चलेजाव चळवळीत सहभाग घेतला त्यांना गारगोटीला तीन महिने तुरुंगवास भोगावा लागला. रयत शिक्षण संस्थेत लॉ कॉलेज, कोणतेही डोनेशन न घेता गुणवत्तेनुसार प्रवेश देणारे इंजिनिअरिंग कॉलेज काढण्यात त्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरली. त्यांच्या कार्यकाळात रयत शिक्षण संस्थेचे झालेले अध्यक्ष, चेअरमन, सचिव व सर्वच पदाधिकाऱ्यांशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते. म्हणूनच कर्मवीरांच्या निधनानंतर 15 वर्षात महाविद्यालये, माध्यमिक विद्यालये,वसतिगृहे अशा संस्थेच्या 436 शाखा नव्याने अस्तित्वात आल्या. 

संस्थेचा एखादा धोरणात्मक निर्णय घेताना काही वेळेला लाईफ मेंबर, मॅनेजिंग कौंसिलमध्ये वैचारीक मतभेद होत असत. यावेळी आप्पासाहेबांची भूमिका निर्णायक ठरत असे. ते कधीही एकांगी निर्णय घेत नसत. त्यांनी घेतलेल्या निर्णयाला शक्‍यतो, कोणीही आव्हान किंवा प्रतिउत्तर देत नसत. 

अनेक रयतसेवकांनी, आजीव सदस्यांनी तुटपुंज्या मानधनावर संस्थेची सेवा केली. ते सेवक भाड्याच्या खोलीत राहत होते. आप्पासाहेबांनी दादासाहेब जगताप यांना सांगून शासकीय जागेत शिवाजी हौसिंग सोसायटी काढली व तेथील प्लॉट रयतसेवकांना मिळवून दिले. संस्थेत चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी ते सदैव उभे राहत. आयुष्यभर त्यांनी संस्थेचा विकास व भरभराटीच्या ध्यासाने संपूर्ण जीवन संस्थेस समर्पित केले. आज आण्णांचा व आप्पासाहेबांचा तोच आदर्श घेउन त्यांचे सर्व कुटुंबीय वाटचाल करीत आहेत. डॉ अनिल आप्पासाहेब पाटील हे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन म्हणून कार्यभार पाहत आहेत. पारदर्शक कारभार, झीरो पेंडन्सी, गुणवत्तापूर्ण शिक्षण ही त्यांच्या कार्याची त्रिसूत्री बनली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्याचे संस्थेचे सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे यांनी संस्थेच्या शताब्दी वर्षात अनेक उपक्रम व प्रकल्पांची परिपुर्ती केल्याचे दिसते. 

आप्पासाहेबांनी व त्यांच्या सत्वशील पत्नी सुशीलाबाईंनी जीवनभर एकमेकांना साथ दिली. आप्पासाहेबांच्या जाण्यानंतर अवघ्या 23 व्या दिवशी सुशिलाबाईंची प्राणज्योत मालवली. विशेष म्हणजे या दोघांनी मरणोत्तर नेत्रदान केले होते व त्यांनी ज्यांना नेत्रदान केले, त्या चौघांनाही स्वच्छ दिसायला लागलं. त्या चौघांच्या नेत्रातून आप्पासाहेबांना व सुशीलाबाईंना पुन्हा जग न्याहाळण्याची संधी मिळाली. आप्पासाहेबांचा हा त्याग व सेवा समाज कधीही विसरणार नाही. 

आयुष्यभर नितीमुल्यांची जपणूक करत सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणाऱ्या या निर्मल व्यक्तिमत्वास त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपल्या सर्वांच्यावतीने विनम्र अभिवादन. 
 

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या