आत्महत्या प्रतिबंध दिन : जीवनात अनेक अडथळे येतील, त्याला ठामपणे तोंड द्या!

पूजा कदम-कारंडे, सांगली
Thursday, 10 September 2020

नवीन पिढीची सहनशिलता कमी झालेली आहे. टी.व्ही. वरील आततायी खेळ, व्हिडिओ गेम यांच्या अनुकरणामुळे मुले आत्महत्या करतात. तर काहीजण प्रेमभंग झाला म्हणून आत्महत्या करतात. आत्महत्येमुळे समस्या सुटत नाहीत, पण आपणच आयुष्यातून कायमचे सुटतो. आयुष्य हे खूप सूंदर आहे. या जीवनात अनेक अडथळे येतील त्याला ठामपणे तोंड द्या. पण, आत्महत्येचा विचार नकोच रे बाबा..

ला खूप टेन्शन आलेय.. ती मला नाही म्हणाली, आज माझं लग्न मोडलं, माझी प्रकृती ठीक नसते, घरच्यांना माझे ओझे आहे, मला आयुष्य नकोसे झालेय... पैशाचे प्रॉब्लेम तर संपतच नाहीत.. या सर्व प्रश्नांवर काहीच उत्तर नसेल तर आत्महत्या हा एकच पर्याय उरतो, असे सर्वांचेच मत आहे. आजही समाजात किरकोळ कारणातून आत्महत्या केलेल्या घटना आपण रोज वाचतो. मन सुन्न होते या घटनांनी.. याच आत्महत्या रोखण्यासाठी आज (१० सप्टेंबर) हा आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो.

जीवन संपविण्याचा नकारात्मक विचार मनात सतत घोळत राहिल्यानंतर थेट आत्महत्या केली जाते, हा एक प्रकार आहे. तर काही जण इतरांचे केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी जीविताला हानी होणार नाही, हे लक्षात घेऊन आत्महत्येचा फक्त प्रयत्न करतात. 2019 मध्ये गुजरातमधील पालनपूरमध्ये एका तरुणाने लग्न मोडल्याच्या कारणातून आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्या काही विशिष्ट वयोगटासाठी मर्यादित नसून टेन्शनमधून जाणारा प्रत्येक व्यक्ती या अवस्थेला सामोरा जातो.

मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, आत्महत्येसाठी नैराश्य आणि स्क्रिझोफ्रेनिया हे आजार मुख्य कारण ठरत आहे. नैराश्य आले म्हणूनच बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आशुतोष भाकरे याने आत्महत्या केल्याची दोन ताजी उदाहरणे आपल्या समोर आहेत. स्क्रिझोफ्रेनियाने ग्रस्त ५० टक्के रुग्ण आत्महत्येचा हमखास प्रयत्न करतात. त्यातील १५ टक्के रुग्णांचा जीव जातो. यासोबत व्यसन हा देखील मानसिक आजार असून, नशेत आत्महत्येचा विचार करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

जागतिक अहवालानुसार, जगात प्रति ४० सेंकदाला एक व्यक्ती आत्महत्या करते. मानसिक तणाव, मानसिक विकृती या प्रमुख कारणांनी आत्महत्या केली जाते. आजकाल तर अगदी ७ वर्षांच्या लहान मुलांपासून अगदी ८० -९० वर्षाचे वृद्धही आत्महत्या करतात. जेव्हा वय लहान असते, तेव्हा कोणी समजून सांगणारे नसते आणि जेव्हा वय ८० च्या वर होते तेव्हा समजून घेणारे कोणी नसते. तारुण्यात आपल्या मनाचे आपण राजे असलो तरीही काही किरकोळ कारणे आपल्याला आत्महत्येस प्रवृत्त करू शकतात.

नवीन पिढीची सहनशिलता कमी झालेली आहे. टी.व्ही. वरील आततायी खेळ, व्हिडिओ गेम यांच्या अनुकरणामुळे मुले आत्महत्या करतात. तर काहीजण प्रेमभंग झाला म्हणून आत्महत्या करतात. आत्महत्येमुळे समस्या सुटत नाहीत, पण आपणच आयुष्यातून कायमचे सुटतो. आयुष्य हे खूप सूंदर आहे. या जीवनात अनेक अडथळे येतील त्याला ठामपणे तोंड द्या. पण, आत्महत्येचा विचार नकोच रे बाबा. आत्महत्येचे विचार जेव्हा तुमच्या मनात येतील, तेव्हा अगदी मन मोकळे जगायला सुरु करा. जे केले नाही ते करा. सकारात्मक विचारात रहा. सतत प्रेरणा मिळेल अशा व्यक्तीसोबत रहा. आवडत्या व्यक्तीसोबत बोला. कोणीही नसेल तर आई-वडील, बहीण, भाऊ, शिक्षक आणि मित्र यांच्याशी बोला. कोणतेही टोकाचे पाऊल उचलण्या आधी एकदा या गोष्टी नक्की मनात आणून बघा.

आत्महत्या करण्यात पुरुषांचं प्रमाण सर्वाधिक
भारतात पुरुषांमध्ये आत्महत्या करण्यामागचे प्रमाण अधिक आहे. नैराश्य आणि तणावामुळे पुरुष जास्त आत्महत्या करतात, असे म्हटले जाते. NCRB (नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरो) नुसार २०१५ मध्ये भारतात ९१ हजार ५२८ पुरुषांनी आत्महत्या केली होती. तर २००५ आणि २०१० मध्ये ६६ हजार ०३२ आणि ८७ हजार १८० पुरुषांनी आत्महत्या केली होती. तुम्हाला अमीर खानचा ३ इडियट चित्रपट आठवतोय का? त्यातील फरहान (आर. माधवन) याला फोटोग्राफर व्हायचे असते. पण, वडिलांच्या इच्छेखातर तो इंजिनिअर होतो. पण, जेव्हा तो आई-वडिलांना मनातलं सांगायला जातो. तेव्हा तो त्याच्या वडिलांना सांगतो की, बाबा.. मी नैराश्येत आत्महत्येचा विचार करेन. म्हणून त्याच माझ्या वेड्या मित्राने (आमीर खान) तुमचा व आईचा फोटो माझ्या पाकिटात ठेवला आणि मला ठणकावून सांगितले आहे की, जेव्हा माझ्या मनात आत्महत्येचा विचार येईल तेव्हा या दोघांच्या चेहऱ्यावरील हास्य बघ... खूप काही घेण्यासारखे होत्या त्या सीनमध्ये. 

एखाद्याच्या मनाला कधी आत्महत्येचा विचार आला तर अथवा तो नैराश्येचा सामना करीत असेल तर त्याच म्हणन अगदी शांतपणे ऐकून घ्या आणि त्याला समजवून सांगा. तुम्ही त्या व्यक्तीला थोडासा वेळ द्या आणि त्या निराशेच्या गर्तेतून बाहेर काढा. एक मित्र म्हणून ही तुमची जबाबदारी आहे. व्यक्ती निघून गेल्यावर त्यावत शोक करत बसण्यापेक्षा आहे तोवर त्याच्याशी बोलून बघा. आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्तीला इतर लोकांची उदाहरणे द्या. लोक कोणत्या खडतर परिस्थिती मार्ग काढतात त्यावर त्यांचे लक्ष वळवा...

मानसिक तणाव असेल तर काय करावे?
मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या
आवडत्या व्यक्तीशी कायम मोकळेपणाचा संवाद ठेवा
सोशल मीडियाच्या नव्हे तर रिअल आयुष्यात जगा
मानसिक आजारांवर सकारात्मक चर्चा घडवा 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

इतर ब्लॉग्स