कुठंतरी... काहीतरी चुकतंय...

अतुल सोळस्‍कर (नायगांव, ता. कोरेगाव)
शनिवार, 27 जून 2020

सध्याच्या घडीला नैराश्‍य आणि उदासीनता थांबणं आणि थांबवणं गरजेचं आहे असं वाटतं. कारण, उदासीनता आणि नैराश्‍येची कारणं वेगळी असतील, प्रश्न जटील असतील, मात्र ते अनुत्तरित नक्कीच नसतील. कुठंतरी चुकतंय... काहीतरी चुकतंय हे मात्र खरं आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येची बातमी आली आणि मन काहीसं सुन्न झालं. मुळात लोकप्रियता आणि पैसा या दोन्हींची कमतरता नसणारा हा उमदा कलाकार असं काही करेल याचा विचार देखील मनाला शिवला नाही. पुढे काही काळात तो डिप्रेशनमध्ये असल्याचं समोर आलं. अर्थातच त्याची कारणेही वेगळी होती, हा भाग वेगळा; पण एक प्रतिभावान व्यक्तीदेखील डिप्रेशन म्हणजेच उदासीनतेची शिकार होऊ शकतो, हीच खंत मनाला बोचणी लावणारी ठरली. 

सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने आपली जीवनयात्रा संपवली. प्रेमात आलेल्या अपयशाने एका प्रियकराची आत्महत्या, बेरोजगारीला कंटाळून तरुणाने केली आत्महत्या या ना अशा अनेक प्रकारच्या बातम्या तुम्ही आजवर सातत्याने वाचल्या पाहिल्या आणि ऐकल्या असतील. या सर्वच प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्यामागची कारणे कधी शोधण्याचा प्रयत्न केला का कुणी? त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केल्यास एक गोष्ट नक्कीच समोर येईल ती म्हणजे डिप्रेशन, उदासीनता. खरंच इतका मोठा नि गहन आहे का हो हा प्रश्न? मानलं तर खूप मोठा नाहीतर खूप छोटा असा हा प्रश्न. सगळेच आपापल्या परीने सोडवत असतात. काहींना तो सुटतो तर काही जण स्वतःची सुटका करून घेतात. बारकाईने या प्रश्नाकडे पाहिल्यास कुठंतरी आपण अपेक्षेजवळ येऊन थांबतो. अपेक्षा बाळगणं हे चुकीचं नाही, कारण अपेक्षा बाळगणं हे महत्त्वाकांक्षीपणाचं लक्षण आहे. ती अपेक्षा पूर्णत्वास नाही गेली, तर त्यापाठी येणारी उपेक्षा ही घातक ठरू शकते आणि त्याची अनेक मूर्तिमंत उदाहरणं आपल्या आसपास आढळून येतील. 

सासुरवासिनीने तिच्या सुखाची अपेक्षा धरणे गैर नाही, तसंच एका प्रियकराने प्रेयसीच्या साथीची अपेक्षा बाळगण्यात काहीच हरकत नाही. मूळ मुद्दा हा आहे, की जर त्या अपेक्षांचा भंग झालाच तर... याचा विचार आणि उत्तर मात्र ज्याच्याकडे तयार नसतं तेच शिकार ठरतात या डिप्रेशन अर्थात उदासीनतेची. सध्याच्या घडीला हेच नैराश्‍य आणि हीच उदासीनता थांबणं आणि थांबवणं गरजेचं आहे, असं वाटतं. कारण, उदासीनता आणि नैराश्‍येची कारणं वेगळी असतील, प्रश्न जटील असतील, मात्र ते अनुत्तरित नक्कीच नसतील. कुठंतरी चुकतंय... काहीतरी चुकतंय हे मात्र खरं आहे; पण काय चुकतंय? त्यावरचा उपाय काय? याचा शोध घेऊन त्याची उत्तरं शोधून त्या परिस्थितीला हाताळण गरजेचं आहे; पण दुर्दैवाने त्या प्रश्नापासून दूर पळणं आणि त्यात गुरफटून स्वतःला संपवणं यात हल्लीची तरुणाई वाहिलेली दिसते. अशा समस्यांना तोंड देण्यासाठी भीक नको; पण कुत्रं आवर म्हणण्याची वेळ कदाचित समोर आली आहे. 

शरीर असो वा मन, ते कणखर नि खंबीर असणं गरजेचं आहे. त्याला झेपेल पेलेल एवढाच भार त्यावर टाकावा. सुटत नसलेले प्रश्‍न अनेक प्रयत्नांनी तसेच उरत असतील तर काही प्रश्‍न हे सोडून द्यावे लागतात. कोणत्या प्रश्‍नाचं किती महत्त्व आहे हे ज्याचं त्यानं शोधावं. प्रत्येक न सुटलेल्या प्रश्नावर आत्महत्या हे उत्तर कधीच असू शकत नाही. 
 

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या