जे. कृष्णमूर्ती : एक चैतन्यवादी तत्वचिंतक (जयंती विशेष)

डॉ. भगवान तुकाराम दिरंगे, परतूर जि. जालना
मंगळवार, 12 मे 2020

जे. कृष्णामूर्तींचे विचार मानव जातीला तारक ठरू शकतील. भौतिक सुखाचा अतिरेकी हव्यास, त्यातून निर्माण झालेली जीवघेणी स्पर्धा, चंगळवाद, भोगलोलुप्ता, निसर्ग विरोधी जीवनशैली या गोष्टी मानव
जातीला विनाशाकडे घेऊन जात आहे असे जे. कृष्णमूर्ती नेहमी म्हणत असत, आज त्यांची भविष्यवाणी खरी ठरत आहे.

जे. कृष्णमूर्ती यांचा १२ मे हा जन्मदिवस आहे. १२ मे १८९५ रोजी जे. कृष्णमुर्ती यांचा जन्म झाला. जे. कृष्णमूर्ती या थोर भारतीय तत्वज्ञाचा आपणास आता विसर पडलेला आहे. कृष्णमूर्तींचे विचार त्यांचे तत्वज्ञान हे नेहमीच समकालीन राहणार आहे. आज कोरोना संकटामुळे जग चिंताक्रांत झालेले आहे, कोरोना विषाणू हा चीनने बनवलेला कृत्रिम विषाणू आहे या विषाणूचा हल्ला जगावर करून चीनने एक प्रकारच्या अदृश्य युद्धाला सुरवात केलेली आहे असे काही जाणकारांचे मत आहे. चीनला जगाची बाजारपेठ ताब्यात घ्यायची आहे आणि महासत्ता म्हणून जगात बस्तान बसवायचे आहे, हा चीनचा हव्यास या जागतिक महामारीस कारणीभूत ठरतोय अशा प्रकारची चर्चा जगभर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जे. कृष्णामूर्तींचे विचार मानव जातीला तारक ठरू शकतील. भौतिक सुखाचा अतिरेकी हव्यास, त्यातून निर्माण झालेली जीवघेणी स्पर्धा, चंगळवाद, भोगलोलुप्ता, निसर्ग विरोधी जीवनशैली या गोष्टी मानव जातीला विनाशाकडे घेऊन जात आहे असे जे. कृष्णमूर्ती नेहमी म्हणत असत, आज त्यांची भविष्यवाणी खरी ठरत आहे.

११ मे च्या रात्री मदनपल्ली या गावी रात्री १२.३० वाजता त्यांचा जन्म झाला म्हणजेच १२ मे हा त्यांचा जन्मदिन आहे. आई संजीवाम्मा व वडील जिद्दु नारायणाय्या हे तेलगु भाषकब्राह्मण कुटुंब होते. त्यांना १० अपत्ये झाली, कृष्णमूर्ती हे आठवे अपत्य म्हणून त्यांचे नाव कृष्णा ठेवण्यात आले. संजीवाम्माच्या मनात अगोदरच अशी पूर्वसूचना मिळत होती कि येणारे आठवे अपत्य हे अलौकिक असणार आहे म्हणून त्यांनी देवघरात बाळंत होण्याचा आग्रह धरला आणि देवघरातच त्यांनी कृष्णामूर्तीना जन्म दिला. जे. कृष्णामूर्तींचा जीवन प्रवास अतिशय खडतर होता. थिओसोफिकल  सोसायटीच्या माध्यमातून डॉ.अॅनि बेझंट आणि लेडबिटर यांनी त्यांच्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न केला. कृष्णामूर्तींच्या माध्यमातून भगवान मैत्रय अवतरणार आहेत असा या मंडळींचा विश्वास होता, त्या दृष्टीने त्यांची जडणघडण करण्याचा प्रयत्न केला. पुढे कृष्णामूर्तींनी सर्व बंधने झुगारून आपले स्वतंत्र आणि स्वयंभू तत्वज्ञानजगाला दिले आणि एक सत्यदर्शी तत्वज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण केली. 

जे. कृष्णमूर्ती यांनी कोणतेही धार्मिक ग्रंथ वाचले नव्हते भगवद्गीता, वेद उपनिषदे, बायबल, कुराण या धार्मिक ग्रंथात कोणता उपदेश सांगितला आहे हे त्यांना माहित नव्हते आणि त्यात त्यांना रसही नव्हता. परंतु भारतीय वेदांतशास्त्रातील अद्वैत  दर्शनात प्रकट झालेले चिंतन आणि कृष्णामूर्तींचे चिंतन यात विलक्षण साम्य आढळते असा तत्वाज्ञानाच्या अभ्यासकांचा अभिप्राय आहे. कुठल्याही महावाक्याचा किंवा एखाद्या धार्मिक सूत्राचा आधार न घेता जीवनाकडे सरळपणे पाहण्याची दृष्टी त्यांच्या चिंतनात दिसते. जे आहे, जसे आहे तसे कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह मनात न ठेवता स्वतः कडे आणि जगाकडे पाहण्याची कला ते शिकवत असत. त्यासाठी संवेदनशील मनाची आवश्यकता आहे, तेव्हाच मानवी मनाला सृजनशील सौख्याचा साक्षात्कार होऊ शकतो असे ते म्हणत. हे सृजनशील सौख्य कुणाची मक्तेदारी नाही, प्रत्येक मानवप्राणी यासाठी पात्र आहे या गोष्टीला कोणतेही भौतिक मूल्य नाही. ती बाजारातल्या वस्तू सारखी क्रय वस्तू नाही, हे सौख्य सर्वाना सहजच प्राप्त आहे फक्त संवेदनशीलपणे निरीक्षण करण्याची गरज आहे. असे कृष्णमूर्ती नेहमी आपल्या प्रवचनातून सांगत असत.

जे. कृष्णमूर्ती यांना अपेक्षित असणारा माणूस घडवण्याची प्रक्रिया शिक्षण व्यवस्थेवर अवलंबून आहे, त्यासाठी शिक्षण व्यवस्थेकडून त्यांना फार अपेक्षा होत्या. आजच्या शिक्षणामुळे आपले संबोध मन वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीने आणि ज्ञानाने भरून टाकण्याची प्रक्रिया चाललेली आहे. जीवघेण्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना ढकलण्याचे काम पालक आणि शिक्षक करतआहेत. अभ्यासाच्या प्रचंड ओझ्यामुळे मुलाची संवेदनशीलता नष्ट होत चालली आहे. मुलांच्या मनात असणारी उपजत सर्जकता मारून टाकण्याचे काम शिक्षणाद्वारे सुरु आहे. कृष्णमूर्ती म्हणत, शिक्षण व्यवसाय हा सौंदर्याचा आणि आनंदाचा अविष्कार आहे त्यातून मिळणाऱ्या प्राप्तव्याने किंवा यशस्वितेच्या मापाने मोजता येण्यासारखी ही वस्तू नव्हे.  कृष्णमूर्ती ज्याला सर्जनशील सौख्य म्हणतात त्या सर्जनशील सौख्याचा संस्पर्श प्रत्येकाच्या मनाला होऊ शकतो ही सदाविमुक्त संवेदनशीलता कायम राहण्यासाठी शिक्षकांना व पालकांनाही या सौख्याचा अनुभव असला पाहिजे. मानवी जीवनात परम सौख्याचे महत्व आणि त्याची अत्यंतिक आवश्यकता इतर सगळ्या गोष्टींपेक्षा अधिक आहे याची जाणीव जोवर होणार नाही तो पर्यंत शिक्षण हे एक दुष्ट चक्र आहे असे त्यांचे मत होते. आज कोरोनामुळे लॉकडाऊन आहे शाळा, क्लासेस, परीक्षा या सर्व गोष्टी बंद आहेत आता परीक्षेशिवाय काही विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे स्कॉलर विद्यार्थी आणि त्यांचे स्कॉलर पालक धास्तावलेले आहेत त्यांच्या दृष्टीने हा निर्णय अयोग्य आहे. सब घोडे बारा टक्के असा हा निर्णय आहे असे पालकांचे मत आहे. खर पाहिलं तर लॉकडाऊन मुळे मुलांना निवांतपणा मिळतोय त्याचा उपयोग मुलांनी ऑनलाईन राहण्यापेक्षा शांतपणे ध्यान धारणेसाठी करायला पाहिजे.

कृष्णमूर्तींनी विद्यार्थ्यांसोबत केलेल्या एका संवादात म्हटले आहे कि, “कोणतीही हलचाल न करता तुम्ही कधी स्वस्थ बसला आहात का ? तुम्ही असा प्रयत्न कराच. स्थिर बसा तुमचेमन काय करते ते पाहा त्याच्यावर नियंत्रण ठेवायला जाऊ नका नदीच्या काठावरून नदीतील पाणी वाहतांना बघावे तसे फक्त पाहा वाहत्या नदीत कितीतरी वस्तू असतात, मासे , झाडांचे पाने, प्राण्यांची प्रेते, लाकडे इत्यादी वस्तू वाहतांना दिसतात पण ती नदी सतत प्रवाही आणि चैतन्यमय असते. तसेच तुमचे मनही असते परंतु ते सतत चुळबुळ करत असते, फुलपाखरासारखे एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उडत असते परंतु तुम्ही अगदी स्थिर आणि शांत असाल तर तुम्हाला आनंदी असणे म्हणजे काय ते कळेल, आनंदीपणा म्हणजे सहज हसावे, निर्हेतुकपणे आनंदी व्हावे, सुखी असावे, जीवनानंद समजून घ्यावा, स्मित करावे, अजिबात न भिता दुसऱ्या व्यक्तीकडे नजरेला नजर देऊन पाहावे हे सारे आनंदीपणात येते. सुखी, आनंदी असण्यातूनच हास्य फुलते आपल्या हृदयात जर गाणे नसेल तर जीवन कंटाळवाणे होऊन जाते. ” 

वर्तमान काळात सर्वांचीच मानसिकता बिघडत चालली आहे विशेषतः तरुण मुले मानसिक दृष्टया अस्वस्थ झालेली आहेत. संपूर्ण समाजातच मनोरुग्णता वाढत आहे म्हणून अश्या काळात कृष्णामूर्तींच्या विचारांची उपयुक्तता अधिक आहे. माणसाच्या सर्व दुखाचे मूळ मनात आहे त्यासाठी आत्मावलोकन केल्यास मार्ग सापडतो दुखाच्या मुळापर्यंत गेल्यास त्याच्या निराकरणासाठी वाट दिसू लागते. आत्मदर्शन ही एक अभिनव अशी अनुभूती आहे. कोणत्याही प्रकारची इच्छा मनात  उद्भवू न देता आत्मावलोकन झाले तर आपल्या सर्व व्यवहाराच्या मुळाशी कोणत्या प्रेरणा कारणीभूत आहेत हे कळते. तटस्थपणे मनात चालेल्या विचारांच्या खेळाकडे पाहावे त्यात आवड निवड करू नये विचारप्रवाह जसा येईल तसा येऊ द्यावा नुसते साक्षीभावाने निरीक्षण करावे असे आत्मावलोकन सर्वथा नवीन अश्या अनुभूतीचा प्रत्यय देणारे असते ती एक आनंददायी प्रक्रिया आहे, गीतेमध्ये सुद्धा क्षेत्र-क्षेत्रज्ञ न्याय याच अर्थाने सांगितलेला आहे. 

जे. कृष्णमूर्ती यांनी आत्मवलोकनाच्या संदर्भात जसे चिंतन सांगितलेले आहे तसेच चिंतन आदी शंकराचार्य यांनी ‘योगतारावलि’ या ग्रंथात सांगितले आहे, 
प्रत्यग्विमर्शातिशयेन पुंसां प्राचीन गंधेषु पलायितेषु |
प्रदुर्भावेत्काचिदजाड्यनिद्रा प्रपंचचिंता परिवर्जयंति ||२४||
विच्छिन्नसंकल्पविकल्पमूले निःशेष निर्मुलित कर्मजाले |
निरंतराभ्यास नितांतभद्रा सा जृम्भते योगिनि योगनिद्रा ||२५|| 

 

याचा अर्थ असा आत्मवलोकनाच्या उत्कट अवस्थेत पुरातन वासना आणि संस्कार पळून गेल्याने एक सलग अशी निद्रेची स्थिती येते, प्रपंचाच्या चिंतेपासून मुक्त असते त्या स्थितीत संकल्प विकल्प सुटतात, कर्म बंधने निर्मूल होतात ती स्थिती नेहमी उपलब्ध असते परम कल्याणकारी अशी योगनिद्रा योग्याच्या ठिकाणी शोभून दिसते अशा प्रकारचे विवेचन कृष्णामूर्तींच्या तत्वज्ञानाचे सुप्रसिद्ध भाष्यकार डॉ.कालिदास जोशी यांनी एके ठिकाणी केले आहे. कोरोनामुळे जगाच्या धावपळीला अचानक ब्रेक लागला आहे त्यामुळे शांतपणे आपण आपल्या नेहमी करत असलेल्या व्यवहाराकडे पहिले तर त्यातला बहुसंख्य भाग निरर्थक आहे असे लक्षात येईल जे.कृष्णमूर्तींच्या जयंती दिना निमित्त आपण स्वतः कडे शांत होऊन पाहावे खरा जीवनानंद शोधावा. या प्रसंगी एवढी अपेक्षा ठेवणे अनुचित होणार नाही.  

 

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या