मी बुद्धप्रिय कबीर...

बुद्धप्रिय कबीर
बुधवार, 25 मार्च 2020

परिवर्तनवादी चळवळीतील पूर्णवेळ कार्यकर्ते आणि डावी आघाडी संचालित दलित अत्याचारविरोधी कृती संघर्ष समितीचे सचिव बुद्धप्रिय कबीर यांचे बुधवारी (ता. २५) निधन झाले. दैनिक 'सकाळ'च्या 'संवाद' या सदरात २३ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांनी स्वतःबद्दल लिहिले होते. आज त्यांच्या कार्याची ओळख नव्या कार्यकर्त्यांना व्हावी, म्हणून हा लेख eSakal.com च्या वाचकांसाठी खास... 

मी खडकेश्‍वरच्या बालज्ञान मंदिर शाळेत होतो. घाटी परिसरातील गौतमनगर येथे राहत असताना त्या वेळेस विद्यापीठ नामांतराची चळवळ सुरू होती. शाळा सुटल्यावर गौतमनगर येथे गेल्यावर नामांतराविषयी चर्चा व्हायची. घोषणाबाजी होत असे. लहान असल्याने त्या वेळेस मला नामांतर फारसे कळत नव्हते; मात्र मीही इतरांसोबत घोषणाबाजी करत होतो. येथील पुढाऱ्यांची भाषणे ऐकत होतो. ते १९८० चे वर्ष होते. वस्त्यांमधील आंबेडकर जयंती कार्यक्रमांत सहभागी होत होतो. यातून प्रेरणा मिळत होती. 

शाळेत असताना शिक्षिका मंदाताई कुलकर्णी, सिस्टर शांती यांची मदत मिळाली. यानंतर आठवी ते दहावीसाठी मराठी होलिक्रॉसमध्ये प्रवेश घेतला. समोरच "मिलिंद'चा परिसर. "मिलिंद'मध्ये आंदोलनं व्हायची. नागसेन वनात विद्यार्थी आंदोलनाच्या वेळी त्या वेळचे विद्यार्थी नेते ऍड. विष्णू ढोबळे, महेंद्र झाकडे यांना भाषण करताना बघितले. ऐकले. वेगवेगळे "इश्‍श्‍यू' घेऊन परिसरात सतत चळवळी चालत. दहावी पास झालो आणि मिलिंद कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथून पुढे विद्यार्थी चळवळीत ओढला गेलो. सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे आंदोलनात सहभाग घेत होतो. 

विद्यार्थी असताना क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हायचो. मी फुटबॉल, हॉकी स्पर्धेत सहभाग घेतला. आमचा संघ विजयी झाल्याने मला घराकडे जाताना मारहाण झाली. मारहाण होत असताना मला विद्यार्थ्यांनी सोडविले. कॉलेजमध्ये आणले. त्यानंतर माझी कॉलेजमध्ये चांगलीच ओळख निर्माण झाली. महाविद्यालयात असताना विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीत मी सहभागी झालो. आमचे त्या वेळेसचे मित्र व आजचे पोलिस उपअधीक्षक प्रवीण मोरे आमचे वर्गप्रतिनिधी झाले. त्यानंतर पुढे झालेल्या निवडणुकीत मी वर्गप्रतिनिधी आणि विद्यार्थी संसदेचा सहसचिव झालो. सहसचिव असताना मी शिष्यवृत्ती, पुस्तक वाटप याविषयी भूमिका घेत होतो.

नागसेनवन मोठा परिसर आहे. येथे अतिक्रमणासारख्या घटना घडत. त्यावेळेस "नागसेन वन भूमी बचाव आंदोलन' विद्यार्थ्यांनी सुरू केले होते. त्याचा मी अध्यक्ष होतो. दरम्यानच्या काळात बीपीएड करून तत्कालीन मराठवाडा विद्यापीठात एम.पीएड्‌.ला प्रवेश घेतला. त्या वेळेस विद्यापीठात अनेक वाद होते. मोठ्या चळवळी उभ्या राहत होत्या. विद्यापीठात त्यावेळेस "डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदव्युत्तर व संशोधन विद्यार्थी संघटना' कार्यरत होती. त्या संघटनेचा अध्यक्ष होतो. संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्‍न सोडविण्यासाठी आम्ही आंदोलन, धरणे, मोर्चे, निदर्शने केली. त्या वेळेस बी.एड्‌. शुल्क आंदोलनात सक्रिय सहभाग राहिला. 

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आंदोलने केली. त्या वेळेस केंद्रात जनता दलाचे सरकार होते. रामविलास पासवान व शरद यादव यांच्याशी संपर्क साधून "बी प्लस'ची मागणी रेटली होती. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ५५ टक्‍क्‍यांऐवजी ५० टक्‍क्‍यांची अट करण्याची मागणी केली. या आंदोलनातही सहभागी झालो. आमच्यासोबत डॉ. वैशाली प्रधान, प्रा. संभाजी वाघमारे, प्रा. देवेंद्र इंगळे, प्रा. राजेंद्र गोणारकर, प्रा. युवराज धसवाडीकर, वाल्मीक नरेश, प्रा. सुभाष महालिंगे, नंदाताई गायकवाड, अंकुश चव्हाण, प्रज्ञा वाघमारे, करुणा वाघमारे अशी सर्व मित्रमंडळी सोबत होती. 

आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी नामांतर आंदोलनात सहभाग घेतला. नामांतरासाठी विद्यार्थ्यांची कृती समिती तयार केलेली होती. त्याचा मी संयोजक होतो. त्यासाठी आम्ही विद्यापीठ गेटसमोर उपोषणही केले होते. दरम्यानच्या काळात गौतम वाघमारे शहीद झाले. राज्यात खळबळ उडाली. आंदोलनाने पेट घेतला. आंदोलनानंतर १४ जानेवारी १९९४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर झाले. 

महाविद्यालयीन जीवनापासून माझ्यावर ज्ञानपीठ पुरस्कार विजेती अमृता प्रीतम आणि इमरोज यांच्या विचारांचा मोठा प्रभाव राहिला आहे. त्याच विचाराने मी पुढे जात असून चळवळीत पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. 

आजच्या चळवळी विषयी सांगायचे तर चळवळ खूप विस्कळित झाली आहे. प्रत्येक व्यक्ती भविष्याच्या दृष्टीने खूप चिंतित आहे. जागतिकीकरणाचा परिणाम विद्यार्थी, महिला, कामगार, कष्टकरी, शेतकरी, शेतमजुरांच्या चळवळीवर झालेला आहे. चळवळ इतकी विस्कळित झालेली आहे, की ती छोट्या-छोट्या संघटनांमध्ये विभागली गेली. आपला स्वार्थ बाजूला ठेवून ध्येयासाठी लढणारे आज कमी झाले आहेत. कार्यकर्त्यांची परिपक्व फळी निर्माण व्हायला हवी होती. एक विचार, एक झेंडा, एक संघटन, एक नेता आणि एक कार्यक्रम यासाठी लढणारे आज कमी झाले आहेत. ही साखळीच आज खिळखिळी झालेली दिसते. 

काहींनी स्वार्थापोटी चळवळी मोडकळीस आणल्या, विस्कळित केल्या. असे असतानाही डाव्यांची चळवळ आजही सुरू आहे. सुरवातीपासून गरीब, दलित, वंचित, आदिवासी, कामगार, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर अशा सर्वच आघाड्यांवर डाव्यांनी सुरवातीपासून एक ध्येय घेऊन आंदोलन केले आहे. डाव्यांचा संघर्ष आजही सुरूच आहे. वंचितांच्या संघर्षात डावे आणि आंबेडकरवाद्यांचा मोठा वाटा आहे. 

चळवळी विस्कळित होत असल्या तरी त्या भविष्यात राहतील. आजची परिस्थिती अराजकता निर्माण करत आहे. जनतेच्या मनात असंतोष आहे. जीवन-मरणासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. तरुणांच्या हाताला काम नसल्याने तो हतबल झालेला दिसतो. त्याचा एक दिवस मोठा उद्रेक रस्त्यावर दिसेल. तेव्हा धर्म, जात, प्रांत, भाषेला सोडून चळवळी पुढे येतील. जागतिकीकरण, खासगीकरणाने जगण्याचे प्रश्‍न तीव्र केलेत. कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांच्या जमिनी लुटल्या जात आहेत. अन्न आणि पाण्यावरून संघर्ष पेटलेला दिसतो. 

संविधानाने कल्याणकारी राज्याची कल्पना मांडली; मात्र शासन कल्याणकारी संकल्पनेतून काढता पाय घेत आहे. सामान्य माणसांना जगणेही अवघड झाले आहे. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधांसाठी जनतेला संघर्ष करावा लागत आहे. आज त्यासाठी आंदोलने होत आहेत; मात्र मतांसाठी आंदोलने न करता ती जनतेच्या हितासाठी केली पाहिजेत. तरुणांची शक्ती खूप मोठी आहे. भविष्यात त्यांना न्याय्य हक्कांसाठी 

चळवळी कराव्या लागतील. त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. चळवळीशिवाय आता मागण्या मान्य केल्या जात नाहीत. शासनाने खासगीकरणाचा सपाटा लावला आहे; त्यातून गरीब जनता पिळली जात आहे. लूट थांबवून आपल्या न्याय्य हक्कांसाठी भविष्यात चळवळीशिवाय पर्याय नाही. 

शब्दांकन : शेखलाल शेख

Article Of Buddhapriya Kabir Aurangabad

इतर ब्लॉग्स