करत कबीर सुनो भाई साधो 

जयदेव डोळे 
बुधवार, 25 मार्च 2020

बुद्धप्रिय कबीर... परिवर्तनाच्या चळवळीतील एका सच्च्या पूर्णवेळ कार्यकर्त्याचं बुधवारी (ता. २५) निधन झालं. उच्च विद्याविभूषित असूनही हे सारे कार्य तो एक वेळ, अर्धवेळ जेवून काटकसरीत अथवा अल्पखर्चात करीत राहिला. तो इतका सामाजिक होऊन बसला, की त्याला स्वतःचा संसार, उत्पन्न अथवा वाहनही नव्हते. म्हणून त्याच्या मित्रांनी, त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांनी त्याला एक मोटारसायकल भेट दिली होती. त्याच्याबद्दल थोडेसे... 

कार्यकर्ता हा शब्द सध्या बदनाम झाला आहे. बोटांत खूप अंगठ्या, गळ्यात सोन्याची साखळी, अंगात खादीचा कडक शर्ट, पायात पांढऱ्या रंगाचे जोडे आणि फिरायला, हिंडायला भले मोठे धूड असणारे एखादे चारचाकी वाहन... असा सरंजाम ज्याच्यापाशी आहे, तो कार्यकर्ता. या रूढ देखाव्याला छेद देणारा कार्यकर्ता म्हणजे बुद्धप्रिय कबीर. त्याचे सारे उलट होते. त्याच्या अंगावर खादीचेच; पण मळके, चुरगळलेले कपडे, गळ्यात गमछा, खांद्यावर शबनम पिशवी, पायात काय घातलेय ते बदलण्याची संधी न देणारी सहा फुटांएवढी उंची आणि हिंडाय फिरायला बस, पाय आणि क्वचित कोणाची तरी दुचाकी दिमतीला. 

डोक्‍यात कोणती तरी सामाजिक समस्या आणि दिशा एखाद्या बैठकीसाठी संघटनेच्या कार्यालयाची पत्रके द्यायला दैनिकाच्या कचेरीची किंवा कोठे काय छापून आले ते बघण्यासाठी गुलमंडीवरच्या बुक डेपोची. वाटेत जयभीम घालत, राम राम करीत, नमस्कार म्हणत, सलाम वालेकूम बोलत ही स्वारी आपल्याला औरंगाबादेत रस्त्यावर अथवा सभा, भाषणे आदी कार्यक्रमांमध्ये कायम दिसे. त्याचे बाह्यरूप जेवढे धिप्पाड अन्‌ आक्रमक होते, तेवढे त्याचे अंतरंग कोमल आणि लाघवी. किंबहुना त्याचे सारे जीवन परंपरा व ठरावीक साचे यांच्या विरुद्ध होते. 

औरंगाबाद शहर कार्यकर्त्यांचे फार मोठे जन्मस्थळ आहे; परंतु या जागी जन्म घेणाऱ्यांना जात चिकटून येते आणि ती सोडता सोडवत नाही. बुद्धप्रिय कबीर ज्या जातीत जन्मला, तिचा तो एक अपघाती सदस्य बनून राहिला; एवढेच त्याच्या बाबतीत म्हणता येते. कारण त्याचे अवघे राजकीय व सामाजिक कार्य दलितेतर जातींच्या व समाजवादी, समतावादी विचारांच्या संघटनांशी जोडले गेले. 

सर्वपक्षीय दलित अत्याचारविरोधी कृती समितीचा तो पूर्णवेळ कार्यकर्ता होता. त्या अर्थाने तो स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेई. संसदीय राजकारणावर विश्‍वास असल्यामुळे निवडणुकांमध्ये तो तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करीत असे. कॉंग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांचा तो राजकीय विरोधकच होता. 

आपल्या देशाचे स्वातंत्र्य आणि असंख्य सामाजिक कुप्रथांपासून मुक्ती, केवळ बुद्धप्रियसारख्या कार्यकर्त्यांमुळे मिळालेली आहे. हे सारे कार्यकर्ते निःस्वार्थ, निष्कांचन व निर्मोही आयुष्य जगले. त्यांचा त्याग आणि त्यांची तळमळ हेच स्वातंत्र्याचे व मुक्तीचे आधार आहेत हे आपण विसरू नये. जो समाज अशा कार्यकर्त्यांची काळजी घेतो, त्यांना सांभाळतो तो समाज फार लवकर प्रगत होतो. अन्याय, अत्याचार कमी व्हावेत अशी कळकळ असणाऱ्यांपैकी बुद्धप्रिय होता. त्याच्या अशा कार्याला विविध पोलिस ठाणी, अधिकारी आणि विचारी नागरिक समजून घेत. त्याला मदत करत. 

समाजातील चांगुलपणा, निःस्वार्थ सेवाभाव आणि जुलमांविरुद्ध लढणारी तरुण मंडळी कमी झालेली नाही, याचे सळसळते व प्रामाणिक प्रतीक होता बुद्धप्रिय कबीर. आज तो आपल्यातून गेला. पण त्याच्यासारखे असंख्य तरुण कार्यकर्ते घडोत. लोकहितवादी, फुले, शाहू, आंबेडकर, मार्क्‍स, लोहिया, जेपी आदी थोरांच्या कार्याची परंपरा भक्कम होत जावो. या कबीराला अभिवादन! 

(बुद्धप्रिय कबीर यांच्या मित्रांनी त्यांना एक मोटारसायकल भेट दिली होती. तो कार्यक्रम ५ जून २०१३ रोजी झाला. त्या दिवशी दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख काळानुरूप बदल करून...) 

इतर ब्लॉग्स