भूमिकेचा कार्यकर्ता : संजय उबाळे ते बुध्दम् सांकृत्यायन्

समाधान इंगळे
गुरुवार, 26 मार्च 2020

अत्यंत क्लेशदायक घटना म्हणजे  'बुध्दप्रियचं जाणं'. एखाद्या व्यक्तीच्या असण्या-नसण्याला किती अर्थ असतो, ह्याची तीव्र जाणीव करून देणारी ही घटना आहे. संजय उबाळे ते बुध्दम सांकृत्यायन ही केवळ व्यक्ती नसून स्वतःमध्ये जाणीवपूर्वक परिवर्तन घडवणाऱ्या विलक्षण प्रवासाची गोष्ट आहे.

बुध्दप्रिय कबीर या नावाने सध्या ते सर्वत्र परिचित असले तरी, कॅन्सरसारख्या आजारातून एक महत्वाचा टप्पा यशस्वीपणे पार केल्यानंतर त्यांनी स्वतःचा पुनर्जन्म म्हणून 'बुध्दम सांकृत्यायन' हे नाव धारण केलं होतं. या पुनर्जन्माला, नव्या संकल्पाच्या नव्या नावाला अजून थोडे वय मिळाले असते, तर एक मोठी गोष्ट घडण्याची शक्यता होती. आणि ती म्हणजे समविचारींना सोबत घेण्याची.

तुमच्या - माझ्या लौकिक समजाच्या पलिकडे प्रत्यक्ष जगणारा, धिप्पाड शरीरयष्टीत एक निरागस, प्रेमळ व अवलिया कार्यकर्ता होते बुध्दम. (या संपूर्ण लेखात बुध्दप्रिय कबीर यांना बुध्दम सांकृत्यायन संबोधले आहे. हे त्यांचे आताचे आणि तिसरे नाव आहे.) २०१४ नंतर सोयीने सत्तेकडे कललेल्या कलाकारांना फेसबुकवर बुध्दम सांकृत्यायनविषयी लिहितांना गहिवरून येते आणि तेही अखेरचा जयभीम - लाल सलाम करतात. एकवेळ उजव्यांसोबत जुळवून घेणाऱ्या, पण डाव्यांशी फटकून वागणाऱ्या आणि स्वतःला आंबेडकरी बिरुद लावणाऱ्या मंडळी विषयी बुध्दम यांना चीड होती. भूमिकेविषयी आग्रही असणारा एक निष्ठावंत कार्यकर्ता (ज्याला सोईने वागणारे कट्टर म्हणायचे) त्यांच्यात होता.

चळवळीचं ध्येय आणि कृतीकार्यक्रम डाव्यांकडे स्पष्टपणे आहे, आणि ते कसलाही अभिनिवेष किंवा गाजावाजा न करता तो राबवतात, याविषयी बुध्दम यांना आदर आणि आकर्षण होतं. वंचितांच्या, उपेक्षितांच्या, सर्वहारांच्या भल्यासाठी लढणारांचे गट-तट का असावेत? ही त्यांची तळमळ होती. सोशक संघटित आहेत आणि सोशिक विखुरलेले आहेत, असे असताना आपण स्वतःला पुरोगामी, परिवर्तनवादी म्हणवून घेण्यात काहीही अर्थ नाही, ही साधी पण महत्वाची समज आवश्यक असते. ह्याच तळमळीने डावी आणि आंबेडकरी चळवळ एकत्रित उभी करण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केले. त्यातील अनेक उपक्रमांना यशही आले. या असाध्य गोष्टीत बुध्दम यांनी शक्यता निर्माण केली. डाव्या, आंबेडकरी, समाजवादी परिवारात समरसून वावरणाऱ्या या द्रष्ट्या कार्यकर्त्याला ध्येयाची पूर्णतः जाणीव होती. आपण कोण आहोत? आणि आपण काय केले पाहिजे? हे विचार आणि कृतीचे ज्ञान एका कार्यकर्त्याला असणे फार महत्त्वाची गोष्ट आहे. जी बुध्दम सांकृत्यायन यांना पूर्णपणे होती.

औरंगाबादला आपण प्रगतिशील लेखक संघ स्थापन करू, या माझ्या प्रस्तावावर बुध्दम फक्त खुशच झाले नाहीत, तर सातत्याने पाठपुरावा सुरू केला. सांस्कृतिक परिवर्तन याविषयी त्यांना पूर्ण जाणीव होती. नाशिक येथील प्रगतिशील लेखक संघाच्या अधिवेशनासाठी स्वतः उपस्थित राहून ही चळवळ आपण औरंगाबादला सुरू करण्याविषयीही त्यांचा कायम पाठपुरावा होता. त्यांच्यात एक हळवा कवी आणि मनस्वी प्रेमी दडलेला आहे ह्याची जाणीव व्हायची. आपण आज सोबत आहोत तर उद्याविषयी ठरवूया या, स्वभावामुळे आम्ही कधी एकमेकांचा भूतकाळ आणि खाजगी आयुष्य याविषयी कधी चर्चा केली नाही. मात्र अभय टाकसाळ त्यांना संजू का म्हणतात ह्याचा उलगडा झाला. त्यांचे विद्यार्थी आंदोलन, हॉकी, फुटबॉल खेळाडू, नामांतर चळवळ, दलित अत्याचार कृती समिती, अविवाहित, पूर्णवेळ कार्यकर्ता याविषयीची माहिती इतरांकडून होत राहिली. त्याची आवश्यकताही वाटली नाही. 'मला तुमची लव्हस्टोरी कधी सांगता मग?' या माझ्या नेहमीच्या प्रश्नावर खळखळून हसणं आणि टाळणं. ही गंमत काहीतरी गंभीर आहे असंही वाटायचं. 

मला विलक्षण वाटणारी गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतःचे नाव निवडले, स्वतःचे आयुष्य निवडले आणि स्वतःचे आईवडीलही निवडले. अमृता प्रीतम आणि इमरोज यांना ते आईवडील मानत. आपल्या या अलौकिक आईवडीलांकडे जाऊन राहणारा, त्यांना फोनवर तासनतास बोलणारा, त्यांच्या आठवणीत व्याकूळ होणारा आणि उजळणारा एक हळवा मुलगा बुध्दममध्ये दिसायचा. जन्मानेच सगळं ठरू नये. जात, धर्म, आडनाव, परिवार या अनुवंशाने येणाऱ्या गोष्टी बदलण्याचा आपण विचारही करू शकत नाही. म्हणून बुध्दम आपला आहे, पण आपल्यासारखा नाही. त्यांचं हे वेगळेपण प्रत्येकाने मान्य केले आणि जपलेही. अगदी दोनच महिन्यांपूर्वी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रगतिशील लेखक संघाच्या बहुभाषिक कविसंमेलनात खडी दाद देणारा रसरशीत श्रोता सहभागी कवींसमोर आज तरळत असणार.

अर्धा लाल व अर्धा निळा असा काहीसा विचित्र वाटणारा मात्र संदेशवाहक लक्षवेधी पेहराव बुध्दम यांचा असायचा. ओळखीच्यांना ते विचित्र नाही तर विवेकी वाटायचे. त्यांची ती एक शैली झाली होती. १४ एप्रिलच्या मिरवणुकीत पैठणगेट येथे माझ्या भीमगीतांच्या कार्यक्रमात जोरदार घोषणा देणारा आणि नंतर कार्यकर्त्यांसोबत फेर धरून मनसोक्त नाचणारा यारों का यार मी विसरू शकत नाही. शेकडो जणांच्या फेसबुकवरील हळव्या पोस्ट वाचताना विभिन्न पैलूंच्या व्यापक परीघाचा आपण अर्थ लाऊ शकतो.

भूमिका नसणारे किंवा ती बदलणारे, भाषा आणि मार्ग बदलणारे अशा सर्वांना खडसावणारा ते एक अधिकार आवाज होते. एका प्रामाणिक, निष्ठावंत आणि त्यामुळेच निर्भय झालेल्या माणसाजवळ भल्याभल्यांना घाम फोडणारी ताकद कशी असते, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बुध्दम. 'जयभीम - लाल सलाम' हा नारा बुलंद करणारा आंबेडकरी कॉम्रेड बुध्दम सांकृत्यायन औरंगाबाद शहराच्या पुरोगामी चळवळीचा आश्वासक चेहरा होते. अनेकांचे अनेक संकल्प बुध्दम यांच्या जाण्याने अपूर्ण राहिले आहेत. साहित्य चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून मला नेहमी ही उणीव खटकत राहील.

इतर ब्लॉग्स