रुग्णालयातून घरी जाताच फोन खणखणला अन् काळजात झाले धस्स!

डॉ. रूपाली श्याम सरकटे, मंठा (जि. जालना)
शुक्रवार, 22 मे 2020

कॉल रिसिव्ह केला. हॉस्पिटल स्टाफमधील पुढची व्यक्ती बोलली, ‘‘मॅडम, रात्रीच्या त्या महिलेच्या कोविड-१९ चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.’’ ते ऐकताच आपण पाहताक्षणी केलेलं निदान बरोबर होतं म्हणून माझाच मला अभिमान वाटला. पण, दुसऱ्याच क्षणी बाजूला झोपलेल्या माझ्या चिमुकल्या मुला-मुलीकडे लक्ष गेलं नि काळजात चर्र झालं. मेंदू सुन्न झाला. डॉक्टर म्हणून नव्हे, तर एक आई म्हणून याची मला भीती वाटली. 

सलग ड्युटी करून थकले होते. अंथरुणात पडल्या पडल्या कधी झोप लागली कळलंच नाही. अचानक रात्री साडेबारा वाजता फोन खणखणला. रात्रीच्या अंधारात डोळे किलकिले करून नंबर पाहिला. फोन हॉस्पिटलमधून होता. डॉक्टरी पेशात हा प्रकार तसा काही नवीन नव्हता. चार-दोन दिवसाला रात्री-बेरात्री कधी कधी तर पहाटे-पहाटेच असे फोन येतात. पण, डॉक्टरीधर्म पाळायचा असल्याने सुखाची झोप सोडून ते रिसिव्ह करावेच लागतात. जर आपण फोन रिसिव्ह केला नाही तर कधी कुणाला कायमचीच चिरनिद्रा घ्यावी लागेल, याची जाण  असल्याने सर्वच डॉक्टरांना झोपेतसुद्धा सतर्क राहावं लागतं. स्वाभाविकच मीही राहते. कॉल रिसिव्ह केला. हॉस्पिटल स्टाफमधील पुढची व्यक्ती बोलली, ‘‘मॅडम, रात्रीच्या त्या महिलेच्या कोविड-१९ चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.’’ ते ऐकताच आपण पाहताक्षणी केलेलं निदान बरोबर होतं म्हणून माझाच मला अभिमान वाटला. पण, दुसऱ्याच क्षणी बाजूला झोपलेल्या माझ्या चिमुकल्या मुला-मुलीकडे लक्ष गेलं नि काळजात चर्र झालं. मेंदू सुन्न झाला. डॉक्टर म्हणून नव्हे, तर एक आई म्हणून याची मला भीती वाटली. 

हॉस्पिटलमध्ये आल्यापासूनच ती महिला कोविड-१९ पॉझिटिव्ह आहे असा केवळ अंदाज नव्हे, तर मला खात्री होती. तरीही डॉक्टरीधर्म निभावण्यासाठी मी स्वतःहून योग्य ती काळजी घेत तिच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये आले. त्याशिवाय तिच्यावर उपचार करणे शक्यच नव्हते. कोरोना विषाणू कधीही कसाही गाठू शकतो, हे ठाऊक होतं. या रुग्णापासून नाही, पण उद्या, परवा येणाऱ्या कुण्याही रुग्णापासून आपणही पॉझिटिव्ह होऊ शकतो, हा विचार बाजूला झोपलेल्या लेकरांकडे पाहून सारखा सारखा मनात घोळत होता. आता हे सगळं कुणाला सांगू?  माझा पेशा माझे पॅशन असल्यानं तो मी कधीच सोडणार नाही. परंतु मुलांचं काय, ती तर काळजाचा तुकडाच आहेत. आता आता कुठं मोठी होताहेत ती. आपल्यामुळं त्यांना काही झालं तर? अशा अनेक प्रश्नांचं मनात काहूर माजलं होतं. नेहमीप्रमाणं नवरा धावून आला. त्यानं मनातील घालमेल ओळखली. थोड्या धास्तीनं विचारपूस करीत तत्काळ होमिओपॅथी गोळ्या दिल्या. धीर दिला. 

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे हॉस्पिटलला गेले. पायऱ्या चढताच क्षणी दिसला तो क्वारंटाइन कक्षात चिंताक्रांत बसलेला त्या महिलेचा नवरा. मुंबई ते मंठा पायी चालून चालून थकलेल्या, रापलेल्या त्या कष्टकऱ्याचा चेहरा पाहून मीही हताश झाले. संवेदनशील मन अधिकच संवेदनशील झालं. मला पाहताच तो उभा राहिला अन् म्हणाला, ‘‘आतालोक समधं जिणं संग जगत आलो आन् रातीतून तिलाच दूर केलं मॅडम. पोटासाठी खेड्यातून मुंबईला गेल्तो. कोण त्यो करूना आला आन् पोटावरच मारून गेला. हाताला काम नाई तर खायचं काय, राह्यचं कुठं? म्हून निघलो पायी पायी. गावात आलो तं गावानंबी पाठ फिरिवली. आता डाक्टर, सरकारी दवाखान्यातले कर्मचारी यायनं साथ देली. मातर जिची साथ होती तिच्यासंग या टायमाला राह्यता येत नाई....’’ तो बोलत होता. मी ऐकत होते.  आतापर्यंत अनेक रुग्णांच्या नातेवाइकांना मी समाजावून सांगितले होते. अगदी मृत्यू झालेल्यांच्याही. मात्र, हा केवळ रुग्णाचा नातलग नव्हता. व्यवस्थेनं, सामाजिक विषमतेनं लाथाडलेला बिच्चारा कामगार होता. ज्या हातानं त्यानं गुळगुळीत रस्ता बनवला त्याच रस्त्यावरून तब्बल सहाशे किलोमीटर भरउन्हात पायी चालण्याची वेळ त्याच्यावर आली. चालता चालता त्याचा रस्ता संपलाही. तो गावी पोचलाही. परंतु, लॉकडाउनमुळे उघडे पाडलेल्या आपल्या देशाच्या दोन टोकांमधील अंतराचा रस्ता कधी संपेल, असे एक ना अनेक प्रश्न रात्रीपासून मनात होतेच. त्यामुळं इतर रुग्णांच्या नातलगांप्रमाणं त्याला धीर नाही देऊ शकले. उसनं अवसान आणून तुमची बायको लवकरच बरी होईल म्हणून त्याला सांगितलं. शिवाय काहीही झालं तरी अशांसाठी मला रुग्णसेवा करावीच लागेल, हा निश्चय पुन्हा केला. पण छे! दोन मनं असतात ना. मग आई नावाचं मन जाग झालं नि अवघ्या एका तासातच सर्व परवानग्या काढून मुलांना त्यांच्या आजोळी रवाना केलं. कालच मुलाचा सातवा वाढदिवस साजरा झाला. तोही माझ्याशिवाय.

सात वर्षांत पहिल्यांदाच असं झालं. आई म्हणून मन सारखं त्याच्याच भोवती फिरत होतं. पण, कोरोना वॉर्डात असणारं माझं कुटुंब माझी वाट पाहत होतं. त्यांच्या मुलांत मी माझी मुलं बघत होती. या मुलांसोबतच दूर असलेल्या माझ्या चिमुकल्याचा वाढदिवस त्या दिवशी मी साजरा केला. इथं माझ्याप्रमाणं कुणी आई आपल्या मुलांपासून दूर होऊन एकटीच आली होती, तर कुणी मूल आपल्या आईपासून. या सगळ्यांना एकत्र करण्यासाठी, पुन्हा माझ्या चिल्यापिल्यांना माझ्याजवळ आणण्यासाठी कोरोनाविरुद्ध लढाई आपल्याला जिंकावीच लागणार आहे. ही लढाई जरी एकट्या एकट्याने लढायची असली तरीही ती सांघिक आहे. या लढाईतील शिपाई म्हणून पुन्हा कोरोना वॉर्डात मी कामाला लागले. ‘सखे साजनी’कार प्रा. ज्ञानेश वाकुडकर म्हणतात, 
पुन्हा घ्यायचे शस्त्र हातात 
पुन्हा माणसांची लढूया लढाई; 
मनाला धार लावू नव्याने 
मनासारखे शस्त्र कुठेच नाही... 

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या