चहा तो चहाच..!

डॉ. शंतून अभ्यंकर (वाई, जि. सातारा)
रविवार, 21 जून 2020

चहा- पोह्यावरून आठवलं.... आमच्या एका मित्राकडे येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत करण्याची त्रिसूत्री होती. पहिल्यांदा आलात तर पोहे आणि चहा, दुसऱ्यांदा आलात तर नुसताच चहा आणि तिसऱ्यांदा आलात तर फक्त अहा..!! अर्थात हा प्रकार मला मात्र आवडत नाही. आल्या- गेल्याला निव्वळ चहासुद्धा देण्याची माणुसकी असू नये म्हणजे फार झालं. 

कल्पना करा, तुम्ही या मित्राकडे चालला आहात. चांगली टळटळीत दुपार आहे. चहा त्याच्याकडे होईलच या भरवशावर, तुम्ही घराचा चहा धुडकावून लावता आणि हा तुम्हाला नुसतंच "अहा' म्हणून कटवतो..!! कसं वाटतं? चहा आणि अहा यमक जुळत असलं, तरी चहाची जागा काही अहा घेऊ शकत नाही. चहा तो चहाच..! 

फक्त तोच चहा, की जो साग्रसंगीत तयार केला जातो आणि तितकाच तन्मयतेने प्यायला जातो. अशी रससिद्धी साधून जाणे हे साधं काम नाही. यासाठी आधी पाण्याला उकळी आली पाहिजे. नंतर साखर टाकली पाहिजे. साखरही कशी? वर कणभर जरी टाकली तरी जास्त होईल अशी. त्याच वेळी दुसऱ्या शेगडीवर दूध तापत असलं पाहिजे. चहा उकळल्यावर नंतर दूध तापवलं तर दूध तापेपर्यंत चहा गार होतो. साखर विरघळली की मगच चहा पावडर टाकायची. त्या फेसाळत्या पाण्यात त्या चहाचा अर्क छानपैकी उतरतो. तात्काळ गॅस बंद करून चहावर झाकण ठेऊन तो मुरू द्यावा. लोणचं मुरतं तसा चहा सुद्धा मुरतो बरं आणि अट्टल चहाबाजांना चहा मुरला किंवा नाही हे लगेच कळते. असो. आता दूध तापलं असेल. आता चहा गाळावा आणि त्यात दूधही गाळून घालावे. चहात साय घालणं हा फौजदारी गुन्हा ठरवला पाहिजे. चहा म्हणजे लस्सी नाही. सायीमुळे चहाची सगळी रयाच जाते. साय नावाचा तो गिळगिळीत पदार्थ घुटक्‍या सरशी गिळणारी मंडळी पाहिली की पट्टीच्या चहाबाजांच्या अंगावर शहारा येतो. असो. तर अशा रीतीने सिद्ध झालेला चहा आता गार होण्याच्या आत घुटके घेत घेत संपवायचा आहे. 

चहाचा वास वातावरणात दरवळण्यापासून खरंतर तुम्ही चहा प्यायला सुरुवात करता. मग कपबशांचा मंजूळ किणकिनाट कानी येतो आणि तो वाफाळता कप किंवा गिलास कलिजा खलास करून जातो. चहासमोर आल्यावर तुम्ही आधी नजरेने चहा पिता आणि मग जिभेनं. पहिल्याच घोटात ओठ आणि जीभ किंचित पोळायला हवी..! चहा बशीत ओतून, फुंकून, फुंकून, फुंकून गार करून पिणं म्हणजे सोळाव्या वर्षी लग्न करून 96 व्या वर्षी संबंध प्रस्थापित करण्यासारखं आहे..! चहा गरम नाही प्यायचा म्हणजे काय? म्हणे तोंड भाजतं... अहो, भाजलं तर भाजू देत. काही वेदना या सुखकर असतात हे या वयात तरी तुमच्या लक्षात यायला पाहिजे. 

एकदा चहाचे तुम्ही रसिक चाहते बनलात, की मग तुम्हाला, "घाईचा चहा लागणं' म्हणजे काय हे कळेल आणि नुसतंच "अहा' वर कटवणाऱ्या मित्राबद्दल मला एवढा राग का तेही कळेल. बाकी या चहाची खुमारी काही औरच आहे. अगदी तस्साच केलेला चहा स्थळ- काळ, प्रसंगानुरूप वेगवेगळा लागतो हे मी अनुभवलं आहे. सकाळच्या पहिल्या चहाबरोबर वर्तमानपत्राच्या कागदाचा वास हवा. शिवाय रविवार असेल तर चांगली जाडजूड पुरवणी हवी. याशिवाय त्या चहाला पूर्तता नाही. संध्याकाळच्या चहाआधी चांगली लांबलचक जबडाफाड जांभई हवी आणि आळोखेपिळोखे देत संपूर्ण शरीरावर्तनी आळस हवा. पावसाळ्यात जर तुम्ही चहा पिणार असाल तर पाऊस धुवाधार बरसत असताना प्या. उगाच नळ गाळावा तसा पाऊस गळत असेल तर ती चहाची वेळच नाही. धुवाधार पावसाबरोबर थंडी आणि धुकं असेल तर मग चहा प्यायल्यावर आभाळ ठेंगणं होत. थंडीतही चहाची खास वेळ आहे. हात पाय चांगले गार पडले, की मग चहाकडे वळावं. चहाच्याच कपानं हात शेकत शेकत तो प्यावा. थंडीत चहा कपानं न पिता चांगले मोठे मग घ्यावेत. उन्हाळ्यात मात्र चहा थोडा थोडा आणि बऱ्याचदा प्यावा. अगदी बोळक्‍यानं किंवा बोंडल्यानं चहा प्यायलाही हरकत नाही. अर्थात पट्टीचे चहाबाज असतात त्यांना चहा कोणत्याही वेळी वर्ज्य नसतो. फक्त काही वेळा तो अधिक प्रिय असतो एवढंच. 
(क्रमच: सॉरी क्रमशः) 

शेंड्यांचं दुकान बंद झालं..!

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या