डॉ. शंतनू अभ्‍यंकर
डॉ. शंतनू अभ्‍यंकर

मोक्षमार्ग

सातारा सातारा सातारा

कोणत्याही अननुभूत सौंदर्याचा अनुभव हा मोक्षपदी पोचवणाराच असतो. मोक्षाचे मार्ग अनेक. पण निव्वळ सौंदर्याच्या भव्योत्कट दर्शनाने, नकळत, अलिप्तता उन्मळून पडावी आणि अनावर आनंदाश्रूंचे झरे फुटावेत असं खूप खूप क्वचित होतं. असा एक क्षण मला गवसला दार्जिलिंगला. तिथला सूर्योदय हा एक खास सौंदर्यानुभव. 

इथे पश्‍चिमेकडे तोंड करून सूर्योदय बघायचा असतो. म्हणजे सूर्य पूर्वेलाच उगवतो पण आपण बघत रहायचं पश्‍चिमेला. कारण पश्‍चिम क्षितीजावरच्या पर्वतराजीतील कांचनगंगेचे शिखर सूर्योदय होताच सर्वप्रथम दीप्तीमान होते आणि ते दृश्‍य अद्‌भूत असते. पहाटे चारलाच उठावं लागतं. सुरवातीला मिट्ट काळोख असतो. काहीच दिसत नाही आणि तो क्षण येतो. भुरकट, धुरकट क्षितिजाच्या झिरझिरीत, अस्पष्ट, पडद्याआड ठिणगी पडावी आणि विझूच नये असा एक प्रकाशबिंदू अचानक लकाकतो आणि आपल्या काळजाची तार छेडून जातो. पूर्वक्षितीजावर तेजोनिधीच्या पावलाची ही पहिली पश्‍चिम चाहूल. हे किरण कांचनगंगेच्या शिखराला स्पर्श करतात, तो क्षण अविस्मरणीय. दुसऱ्याच क्षणी तो ठिपका विस्तारतो, जणू विजेचा लोळ होतो आणि त्या हिमपर्वताच्या कडांवर गडद केशरी निऑनच्या झगमगत्या नळयांची आरास उमटते. हा तेज:पुंज दिव्य क्षण आपण अनुभवेपर्यंत तो प्रकाश लखलखत्या रेशीमधारा होऊन शिखरावरुन खाली ओघळू लागतो आणि कांचनगंगेच्या कडेकपाऱ्या आपल्या परिसस्पर्शाने झळाळून टाकतो. हळूहळू मलमली पडद्याआड आसपासची शिखरे उजळू लागतात. तीही क्षणभर ही प्रकाशशलाका अंगाखांद्यावर खेळवतात आणि पुढच्याच क्षणी त्या स्वर्गीय प्रकाशात न्हाऊन निघतात. सुर्वणरसाचा अभिषेक करावा तसा हा प्रकाशाचा लाव्हा वहात वहात जातो. आपण शहारून जातो ते निव्वळ थंडीने नाही. 

इतक्‍यात आपल्यापासून ते त्या शिखरांपर्यंत गुबगुबीत गालिचा अंथरलेला असावा तसे ढगांचे पुंजके दृष्यमान होतात. असं वाटतं की या पायघड्यांवरुन गेलो तर त्या शिखराशी आपण सहज पोहोचू. क्षणात गुलाबी तर क्षणात सोनेरी प्रभा त्या ढगात खेळू लागते. विजेच्या वेगाने समोरचे रंग बदलत राहतात. आपण दंग होऊन जातो. ते ढग खूप खूप खाली, खोल दरीत असतात आणि आपण असतो आकाशाच्या कुशीत. वर नजर जाताच मघाशी सुवर्णरसानी ओथंबलेली शिखरे आता स्वच्छ उन्हात, शुभ्र चांदीची चमचम ल्यालेली दिसतात. हिमालयाचा हेमालय आणि हेमालयाचा रजताद्री असा नजरबंदीचा हा खेळ. 

उन्हे वर येतात. अचानक एक कोवळी तिरीप आपल्या अंगाला स्पर्श करते. हा तमसो मा ज्योतिर्गमयी खेळ याची डोळा बघितल्याची लोभस जाणीव, याची देही करून देतात. त्या उन्हात उजळलेल्या धुक्‍याच्या कणांत आपल्याला आपणच दिसायला लागतो. पृथ्वी नावाच्या ह्या वेटोळ्या गोळ्याच्या काठावर असा खेळ अव्याहत चालू असणारा आणि ह्यापेक्षाही कित्येक पट असे कोट्यवधी सूर्य, त्यांचे त्याहून अधिक ग्रहगोलक. त्यांची उत्पत्ती, स्थिती, गती आणि लय निर्हेतुकपणे चालूच. पण या साऱ्यात आनंद शोधणारं, साऱ्यात हेतू शोधणारं मानवी मन. ब्रम्हांड सोहोळ्याची ही सारी लीला मला असह्य होते. कोणती पुण्ये अशी आली फळाला, असा प्रश्न पडतो. एवढे सुख सहन करणं माझ्या शक्तीपलीकडे असतं. नकळत डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. हे नेमके आनंदाश्रू की आणखी काही हे सांगता येत नाही. मोक्ष मोक्ष म्हणतात तो हाच असावा बहुतेक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com