काय सांगो संतांचे उपकार!

Article by Kailash Gawli
Article by Kailash Gawli

कोरोनामुळे यावर्षी वारीला जाता येणार नाही. आज हा भव्य सोहळा बाह्यस्वरूपात दिसत नसला तरी प्रत्येक वारकऱ्याच्या अंतरंगात मात्र चिरंतन सुरू आहे, याचे कारण तुकाराम
महाराज सांगतात, 
‘पंढरीची वारी आहे माझे घरी, आणीक न करीं तीर्थव्रत।’ 
आज वारीला न जाताही सर्व वारकरी पांडुरंगाच्या भक्तीचा ठेवा हृदयात साठवून आहेत आणि हाच अनमोल भक्तिमार्ग सर्व संतांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे. संतांचे हेच उपकार
तुकाराम महाराज मानतात आणि म्हणतात, 
 

‘काय सांगो आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती।’ 
संत कबीर सांगतात, मी तर देवाच्या आधी संतांचं नाव घेतो; कारण त्यांनीच मला खरा देव दाखवला आहे. ते आपल्या दोह्यातून म्हणतात, 
गुरु गोविन्द दोऊ खड़े काके लागूं पाय। 
बलिहारी गुरु आपनो, जिन गोविन्द दियो बताय।। 

म्हणूनच आपल्यासाठी संतांचं महत्त्व अधिक आहे. संतांचा स्वामी सखा पांडुरंग आहे. संतांचा सन्मान म्हणजे साक्षात पांडुरंगाचाच सन्मान आहे. हेच संत तुकाराम महाराज आपल्या
अभंगात सांगतात, 
सेवका स्वामीसाठी मान, त्याचे नाम त्याचे धन। 
तुका म्हणे जाण, तुम्ही संत यदर्थी ।। 

समाजातील संतांचं अति महत्त्व आणि भक्तांची भोळी श्रद्धा यामुळे भोंदू साधूंचं फावतं. स्वतःला हिरा म्हणणाऱ्या अशा गारा हातोड्याची भेट होईपर्यंतच आनंदी राहू शकतात. एकदा
हातोडा पडला की त्यांचा भूगाच! अशा गारांपासून आपली फसगत टाळण्यासाठी संत तुकाराम महाराज आपल्याला सावध करताना सांगतात, 
‘म्हणविती ऐसे अइकतो संत, न देखिजे होत डोळा कोणि। 
हिऱ्या ऐशा गारा दिसती दुरोन, तुका म्हणे घण न भेटे तो।। 

मग आपला उद्धार करणारे खरे संत कसे ओळखावे? खरा हिरा ओळखण्यासाठी संत तुकाराम महाराज सांगतात, 
हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घणी। 
तुका म्हणे तोचि संत, सोसि जगाचे आघात।। 

एकदा का असे खरे संत कळले, की त्यांच्या उपदेशाने आपण आपले हित जोपासावे. अशा संतांचा उपदेश संत तुकाराम महाराजांच्या पुढील अभंगातून कळतो. ते म्हणतात, 
हित ते करावे देवांचे चिंतन, करुनिया मन एकविध। 
यामाणे सर्वच खऱ्या संतांनी आपणास मनाची एकाग्रता हीच ईश्वरभक्ती आहे, असा उपदेश केला आणि सर्व कर्मकांड स्पष्टपणे नाकारले आहे. त्यासाठी संत तुकाराम महाराज म्हणतात, 
तीळ जाळिले तांदूळ, काम क्रोध तैसेचि खळ। 

म्हणजेच कुठलेही कर्मकांड न करता मनाची शुद्धी हीच खरी भक्ती आहे, असे ते सांगतात. संत कबीर तर देवाला शोधायला कुठेही जाऊ नका, देव तुमच्यातच आहे, असे सांगताना ते
म्हणतात, 
ज्यों नैनन में पुतली, त्यों मालिक घर माँहि। 
मूरख लोग न जानिए , बाहर ढूँढत जाहिं।। 

अशा प्रकारे संतांनी योग्य मार्ग दाखवल्यावर त्यांचा उपदेश केवळ ऐकणं आणि उच्चारणं म्हणजे खरी भक्ती नसून त्यानुसार सदैव आचरण करणे आणि आपल्यात इष्ट ते बदल करून
अधिक समाजाभिमुख होणे म्हणजे खरी ईश्वरभक्ती होय. हे पटवून देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेवटी सांगतात, 
संतांसी सर्वांचेच बरे व्हावे, ऐसे वाटे जीवेभावे। 
परि ज्यांनी कर्तव्य करावे, तेचि होती अधिकारी।। 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com