पप्पीचा बायोपिक

पप्‍पीचा बायोपिक
पप्‍पीचा बायोपिक

दररोजच्या जीवन जगण्याच्या रुटीनमध्ये आपण बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टीपण विसरतो किंवा त्या आपणाकडून दुर्लक्षिल्या जातात; पण कधीतरी "गोष्ट छोटी पण डोंगराएवढी' याचा प्रत्यय आपणास आल्याशिवाय राहात नाही. असेच काही दिवसांपूर्वी आमचे एक स्नेही आमच्याकडे आले आणि गप्पांच्या ओघात म्हणाले, "मॅडम, आमच्या लग्नाला 15 वर्षे झाली; पण माझ्या आवडीनिवडी अजून माझ्या बायकोला समजलेल्या नाहीत.' त्यांना थोडक्‍यात असं म्हणायचं होत, की "आमच्या आयुष्यात खूप रटाळपणा आलायं.' आता मलाचं काहीतरी करावं लागेल? 
तुमच्याकडे काही युक्ती असेल तर सांगा..! 

मी म्हटलं... काही नाही सरं खूप सोप्पय... ते म्हणाले - काय..? मी म्हटलं, ""तुम्ही अधूनमधून त्यांची एक पप्पी घेत जा'' आणि आम्ही दोघंही दिलखुलास हसू लागलो. पुढे जाऊन "पप्पी'चा "रामबाण उपाय' अचूक लागू पडला आणि ते नेहमीच असा सल्ला विचारू लागले. 

आता थोडा आई- मुलांच्या नात्याचा विचार करू. आई अगदी कुठेही समाज वा चार चौघांसमोर, शाळेत, चौकात, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी, एसटीत आपल्या बाळाचे आंजरुन- गोंजारून चुंबन घेते. तिचे त्यातून कधीच मन भरत नाही; पण त्या बाळाला आणि आईला त्या पप्पी स्पर्शातून "एकमेकांच्या अतूट नात्याची जणू क्षणाक्षणाला जाणीव होत असते.' जेव्हा पप्पी घेतघेत मुलं लग्नाच्या वयाची होतात. तेव्हाही अगदी निसंकोचपणे बाबा आपल्या मुलीची आणि आई आपल्या मुलाची पप्पी घेतच असतात. मनात अशा काही भावना दाटतात, की मुलांनी आपली बरोबरी गाठली मात्र आपल्याला अजूनही ती पूर्वीइतकीच लहान आहेत. या पप्पी घेण्याला इतर लोक फारसं मनावर घेत नाहीत; पण हेच जर एखाद्या प्रियकर- प्रेयसी बाबतीत घडलं आणि त्यांनी खुलेआम एकमेकांची पप्पी घेतली तर..? ""आजही त्यांना आणि पाहणाऱ्यांनाही खूप मोठा अपराध केला असं वाटेल.'' म्हणून यांना पप्पी घेण्यासाठी आडोसा शोधावा लागतो. 

पप्पीचा विनोद आठवला म्हणून सांगते... 
एका महत्त्वाच्या इंटरव्ह्यूसाठी काही परीक्षार्थींना एका अधिकाऱ्याने गंमतीबाज प्रश्‍न विचारला... "तुम्ही एखाद्याच्या घरी गेला असता, बेल दाबताच आणि दरवाजा उघडताच तुमच्यासमोर विनावस्त्र मुलगी आल्यास तुम्ही काय कराल?' या प्रश्‍नावर बरेच परीक्षार्थी निरुत्तर झाले..! मात्र एक विद्यार्थी पास झाला. त्याने दिलेले उत्तर असे. ""मी तिला उचलून घेईन व तिची पप्पी घेईन.'' कारण, माझ्यासमोर विनावस्त्र येणारी मुलगी म्हणजे ""ती जानू नसून सोनू असणार आहे.'' 

"पप्पी' घेण्याचे तसे काहीच लिखित नियम नाहीत. तुम्ही ती ओठावर, गालावर, कपाळावर, तुमच्या आवडीनुसार व सोयीनुसार कुठेही घेऊ शकता. त्यातून तुम्हाला आनंदच मिळेल. तो ही गगनात मावणार नाही असा... शिवाय ही पप्पी तुम्हाला कुठल्याही टप्प्यावर घेता येते. बालपणी, तारुण्यात, म्हातारपणात... त्याची अशी काही निश्‍चित वेळ काळ ठरलेली नाही; परंतु त्यातून नेहमी एकच प्रत्यय येतो. 
तू मला अजूनही तितकाच हवाहवासा वाटतो. आजही तू मला तितकीच आवडते. ""समजा तुम्हाला कुणाही एक्‍स व्यक्तीचा किस घेण्यासाठी पैजवजा काही लाखात बक्षीस देऊ केले, तर तुम्ही ते स्वीकाराल काय? 

बाबू अमेरिका स्थित आहे. तो अमेरिकन संस्कृतीत रुळला असला तरी त्याचे खरे प्रेम व ओढ भारतीय संस्कृतीवरच आहे. अधूनमधून फोन केल्यावर गप्प्यांच्या ओघात तो पप्पी मागतोच. खूप वर्षे भेट न झाल्यामुळे लटकेच बाबूला म्हणते, ""मला तू नको आणि तुझी पप्पी नको'' मग बाबूने मोठ्या प्रेमाने म्हणायचं, अगं अस काय करतेस? माझे एटीएम कार्ड तुझ्याकडेच राहू दे ना. कायमचं. फक्त त्यावर जमा झालेली "पेन्शन' काढू नको, तशीच ठेव. मी येईपर्यंत सगळा राग मेणबत्तीसारखा वितळून गेला. तिकडं अमेरिकेत एकमेकांची "पप्पी' घेतली जाते. मात्र भारतात अजूनही तिचा इतका मोकळेपणाने प्रसार झालेला नाही. म्हणूनच अमेरिकेत कमी; पण भारतात "पप्पी' जास्तच महत्त्वाची आहे. 

माझ्या धाकट्या बहिणीची दोन गोंडस मुले माझ्यापासून दूर अंतरावर आहेत. त्यांची माझी भेट लवकर होत नाही; परंतु कधी काळी फोन केल्यावर ते फोनजवळ येतात. कान देऊन आमच्या दोघींच बोलणं ऐकतात. त्यांना काय बोलावं काहीच कळत नाही; पण मी पप्पी मागितली, की त्यांनी फक्त फोनवर तोंड टेकवावं आणि मी म्हणावं, "पप्पीचा आवाज नाही आला' लगेच दादू आणि दिदीने आवाज करत पप्पी द्यावी. पप्पी देण्यासाठी बिलकूल खर्च येत नाही. मात्र, आपण कुणाला तरी खूप काही देऊ शकतो. त्याचा आनंद त्या बालचमूंनाही मिळतो. खरंच, आपण किती श्रीमंत आहोत, की आपली मावशी, काका- काकू, मामा- मामी, आजोबा- आजी आपल्याला नेहमी पप्पीच मागतात. आपल्याकडे यांच्यासारखा बॅंक बॅलन्स नाही. चार चाकी गाडी नाही. नावे स्थावर किंवा जंगम मालमत्ता नाही, की जे पुनः पुन्हा आपल्याला पप्पीच मागतात. मग तीन वर्षांचा छोटा दादा त्याच्या स्टाईलमध्ये म्हणतो "काय राव सारखी पप्पी मागतात.' अशी ही ओढ लावणारी गोड पप्पी. माणसाच्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. तुमचा मूड चेंज करण्यासाठी आनंद मिलिंद यांच संगीत असले. अलका आणि उदीत नारायण यांनी स्वरबद्द केलेलं, ते सर्वांनी आवर्जून ऐकावं असं गीत आहे. 
"एक चुम्मा तू मुझको उधार दै दे और बदले में यु. पी. बिहार लयै ले'' 
एकदा मन लावून ऐका आणि जरा मनावर घ्याच. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com