पोलिसात भरती होताना शपथ घेतलीय, मग कोरोनाला घाबरुन का घरी जाऊ....लढणार अगदी शेवटपर्यंत

विकी पिसाळ
Saturday, 9 May 2020

आज अनेक पोलिस बांधवांची कुटूंबं त्यांच्यापासून दूर गावी आहेत. अनेकजण ड्यूटीवरच झोपतात, बहूतांश वेळा खायलाही वेळेवर मिळत नाही. गावी कुटुंबालाही घशाखाली घास उतरवत नाही. हे दिसतं तितकं सोप नसलं तरी पोलिस प्रशासन, आरोग्य खात्यातील अगदी आशा वर्करपासून परिचारिका, डॉक्टर, सफाई कर्मचारी अत्यावश्‍यक सेवेतील सर्वच आज कोरोनासारख्या कठीण प्रसंगातही काम करत आहे. म्हणूनच आज पीएसआय किरण पिसाळ यांच्यासारख्या अनेक कर्तव्यदक्ष, नेहमी सकारात्मक असणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना एक कडक सॅल्युट करावासा वाटतोय. दोन भाऊ फोनवर संवाद साधतात तेव्हा एकाचा अभिमानाने ऊर भरुन येतो, अन दुसऱ्याला आणखी मिळतं बळ जगायला, कोरोनाला हरवायला....

पोलिस उपनिरीक्षक किरण पिसाळ (घाटकोपर, मुंबई) यांचा काही दिवसापूर्वीचा हा फोनवरील संवाद. फोनवरील त्यांचा हा संवाद ऐकून मी क्षणभर स्तब्ध झालो होतो. त्यांची काळजी वाटते म्हणून खरंतर दोन दिवसाआड माझे त्यांना फोन त्यांना सुरु आहेत. कसा आहेस....काळजी घेतोयस ना..शासनाने दिलेल्या गोळ्या नियमित घेतोयस ना..वगैरे प्रश्न माझे रोजचे. खरंतर काळजी घेतोयस ना हे वाक्य आता गुळमुळीत झालंय. पण त्याच वाक्याचा आधार आहे मनाला.
कोरोना दिवसेंदिवस बळकट होत चालला आहे. निभावाला काळजी घे म्हणताना ही मन भरुन येतेच. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात त्याच्याशी संपर्कात असताना त्यांनी कोरोनाची गंभीरता फोनवरुन सांगितली होती. मी म्हणलं ही.. मग आता सुट्ट्यांच काय रे तुझ्या? तो म्हणला. लोक टेंशनमधे आहेत. रोज पाहतोय. कोरोना लवकर आवरेल याची शक्यता कमीच, पोलिसांवरही भरपूर ताण वाढतोय, कित्येक पोलिस कोरोनाबाधित होतायत, अन मी या अशा काळात गावाला येऊन करु काय..याचा अर्थ सरळ होतो की मी कोरोनाला घाबरतोय. मग भरती का झालो इतका अभ्यास करुन.. ते यासाठी?

बरं आणि आलोच गावी. तर ती सल आयुष्यभर राहील. जी मला कधीच दुरुस्त करता येणार नाही. जे होईल ते होईल. माझ्यावर माझा पुर्ण विश्वासय. म्हणून मी मुंबईतल्या ड्यूटीवरुन कुठेही हलणार नाही. मोठी जबाबदारी ही माझ्याकडे आहे. साप्ताहिक सुट्टी ही आता कोरोना संपेपर्यंत घेणार नाही. अन गावी येण्याचा आता प्रश्नच नाही. त्याचे हे उत्तर ऐकून मी काळजीत पडलो. पण त्याचे उत्तर त्याच्या स्वभावाला साजेसे होते. आणि त्याच्याबद्दल असलेला आजवरचा आदर त्याच्या या उत्तराने आणखीनच द्विगुणित झाला.

किरण फोनवर बोलत होता.....इतकी शांत मुंबई आजतागायत पाहिली नव्हती रे. पण जेव्हा मोकळ्या रस्त्यावरुन फिरतो तेव्हा ही शांत झालेली मुंबई पाहतो, रस्ते पाहतो, गल्लीबोळ पाहतो, समुद्र पाहतो. तेव्हा वाटतं..लवकरच हे सगळं पुर्ववत होईल. अन् ही मुंबई पहिल्यासारखी गर्दीत हरवून जाईल. किरणचा गावाइतकाच मुंबईवर फार जीव. ज्या मुंबईने आपल्याला सांभाळलं. आज तिच्यासाठी मागे हटायचं नाही. चल.. ठेवतो फोन.. राऊंडला जायचय आता. इतकं बोलून त्यांनी फोन ठेवला नी मी क्षणभर मोबाईलच्या स्क्रिनवर त्यांच्या नंबरकडे पाहत उभा होतो.

आशेच्या ‘किरण’ने मागे वळून पाहिलेच नाही...       
सुरुवातीला मुंबईत कांदीवलीला बहिणीकडे थांबून तुटपुंज्या पगारावर एका खासगी कंपनीत असताना तिथले काम पाहत अभ्यास करत, नंतर कित्येक पोलिस भरत्या ट्राय करुन, कित्येकदा नाऊमेद ही होऊन चौदा वर्षापुर्वी मुंबई पोलिसमधे अफाट कष्ट करुन भरती झालेला किरण अखेर कॉन्स्टेबल झाला. पण फक्त कॉन्स्टेबल या पदावरच तो समाधानी नव्हता. ते त्याने सुरुवातीलाच उघड बोलून दाखवलं होतं. कॉन्स्टेबल पदावर मुंबईत तो भरती होऊन त्याने स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरूच ठेवलेला. वडील रेल्वेत कामाला.

एकूण पाच बहीण भावंड. लहानपणीची शाळा कापडाच्या नाहीतर नायलॉनच्या पिशवीचं दप्तर बनवून केलेली. पुढे सुरुवातीला चालत, नंतर सायकलवरुन रोजचं आठ किलोमीटर येऊन जाऊन कॉलेज पूर्ण करणारा हा किरण. अगदी अभिमान वाटावा असाच. नावाप्रमाणेच त्याच्यासह कुटुंबात ही आशेचा किरण बनून राहिलाय. हवं तर तो वडिलांच्या नंतर रेल्वेत जाऊ शकला असता. पण त्याने तो मार्ग सोडून स्वत:च्या हिमतीचा मार्ग पत्करत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालूक्यातून सुरु झालेला त्यांचा कष्टाचा प्रवास, भायखळ्यानंतर आज घाटकोपर येथे पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदापर्यंत येऊन पोहोचलाय.

आज अनेक पोलिस बांधवांची कुटूंबं त्यांच्यापासून दूर गावी आहेत. अनेकांना पोलिसांना ड्यूटीवरच झोपावं लागतं, तर बहूतांश वेळा खायलाही वेळेवर मिळत नाही. गावी कुटुंबालाही घशाखाली घास उतरवत नाही. हे दिसतं तितकं सोप नसलं तरी त्यातून कर्तव्याची जाण ठेवत, तुमची आमची काळजी घेत पोलिस प्रशासन, आरोग्य खात्यातील अगदी आशा वर्करपासून परिचारिका, डॉक्टर, सफाई कर्मचारी अत्यावश्‍यक सेवेतील सर्वच आज कोरोनासारख्या कठीण प्रसंगातही काम करत आहे.

म्हणूनच आज पीएसआय किरण पिसाळ यांच्यासारख्या अनेक कर्तव्यदक्ष, नेहमी सकारात्मक असणाऱ्या अधिकाऱ्यांना एक कडक सॅल्युट करावासा वाटतोय. दोन भाऊ फोनवर संवाद साधतात तेव्हा एकाचा अभिमानाने ऊर भरुन येतो, अन दुसऱ्याला मिळतं बळ जगायला, कोरोनाला हरवायला..... तेव्हा एक पाऊस पुढे या. किरण पिसाळ यांच्यासारख्या अनेक अधिकाऱ्यांचे आपण मनोबल वाढवूयात. त्यांच्या सकारात्मकतेला प्रोत्साहन देऊयात. आणि खाकी वर्दीतल्या या मातीशी इमान राखणाऱ्या स्वाभिमानी अवलियांना आपण सर्वजण सलाम करुयात.

 

इतर ब्लॉग्स