गावगाड्यावरचं दुःख कधी नजरेस पडणार?; बुरुड व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

रजनी कांबळे, कोळिंद्रे (खालसा) ता. चंदगड
Thursday, 17 September 2020

दुष्काळात तेरावा महिना म्हणतात, तसं कोरोनाचं जागतिक संकट आलं. स्थानिक बाजारपेठा आणि आजूबाजूचं सगळं दळणवळण पूर्णपणे बंद झाल्याने तयार झालेल्या कच्च्या मालाचं आणि उत्पादनाचं करायचं काय?, असा प्रश्न बुरुड व्यावसायिकांना पडू लागला. बाजारपेठाच बंद झाल्या तर उत्पादन घेऊन करायचं काय? म्हणून व्यापाऱ्यांनीही पूर्णपणे पाठ फिरवली. बरं, आजूबाजूच्या गावागावात जावून विकावं तर तेही शक्य नव्हतं. प्रत्येक गावानं आपापल्या वेशी बंद केल्या. त्यामुळे दुसर्‍या गावात शिरायचंही अवघड आणि हे संकट टळायचंही नाव घेईना.

गावगाडा म्हटलं की, बारा बलुतेदारी आली आणि त्या अनुषंगाने येणारा प्रत्येक समाजाचा वेगवेगळा व्यवसाय! शेतीबरोबरच बुरुड व्यवसाय हा आमचा जोडधंदा. तसा हा आमचा वर्षानुवर्षे चालत आलेला वडिलोपार्जित व्यवसाय. चिव्याच्या (लहान बांबू किंवा वेळू) बेटीतून सरळ आणि लांब वाढलेले चिवे (वेळू) तोडून त्यांचा पाला साफ केला जातो. चिव्याचं वैशिष्ट्य असं की, त्याला उसाला असतात. तसे डोळेही असतात. जे पुढील प्रक्रियेमध्ये अडचणीचे ठरतात. त्यामुळे ते सुद्धा कोयत्यानं तासून काढले जातात.

यानंतर ज्या प्रकारचं उत्पादन तयार करायचं आहे, त्यानुसार साहित्य तयार केलं जातं. उदा-बुट्टी तयार करायची असल्यास लांब सरी, ज्यामध्ये दोन प्रकार असतात. बुट्टीच्या आकारानुसार पातळ खांबी तयार केल्या जातात. याचप्रमाणे धान्य साठवायच्या कणगी आणि तट्टे, सुपं, कोंबड्या आणि बकऱ्यांची लहान पिल्लं झाकण्यासाठी पांजरा, अंगण झाडायचा खराटा, फुलदाण्या, शेतावरच्या खोपीला लावायला ताटी, जिला आम्ही तडकी असंही म्हणतो. त्याचबरोबर पावसाळ्याच्या दिवसात शेतात काम करणार्‍या बाया-माणसांचा एकमेव आधार असलेलं गोराब; ज्याला इरकलं असंही म्हणतात. अशाप्रकारे वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं आम्ही तयार करतो. आमच्या चंदगडी भाषेत त्यांना आयदानं असंही म्हणतात.

कच्चामाल स्थानिक पातळीवर उपलब्ध होत असल्याने, वाहतूक करणं सोयीचं असल्याने व स्थानिक बाजारपेठ उपलब्ध असल्याने अजूनही बर्‍याच ठिकाणी हा व्यवसाय तग धरुन आहे. उत्पादनाच्या आकारानुसार याची किंमत ठरलेली असते. यामध्ये एका मध्यम आकाराच्या बुट्टीला ६० ते ७० रुपये आकारले जातात. पांजरा २०० ते २५०, तट्टा १०० ते १५० रुपये हात (साधारण आठ ते दहा हाती असतो), खराटा ४० ते ४५, गोराब ३५० ते ४०० रुपये अशा किंमतीत मिळतात. 

काही वेळा धान्याच्या बदल्यातही अशी आयदानं विकली जातात. त्यामुळे गावगाड्यातील इतर व्यवसायाप्रमाणेच बुरुड व्यवसाय हा सुद्धा लोकांच्या उपजीविकेचं महत्त्वाचं साधन आहे, असं म्हणायला हरकत नाही. पण, बाजारात प्लास्टिकची उत्पादनं आल्यानंतर या उत्पादनांच्या मागणीत बरीच घट झाली. असण्यापेक्षा दिसण्याला महत्त्वं देण्यामुळे शहरी भागात चिव्याच्या उत्पादनांपेक्षा प्लास्टिकच्या उत्पादनांना जास्त मागणी वाढू लागली. त्यामुळे हळूहळू हा व्यवसाय तोट्यात जावू लागला.

याची दुसरी आणखी एक बाजू अशी की, स्थानिक पातळीवर २५ ते ३५ रुपयांना उपलब्ध होणारा चिवा (वेळू) पेपरमील किंवा इतर वापरासाठी जास्त किमतीत बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर पाठवू लागल्यामुळे, तसेच मोठ्या काॅन्ट्रॅक्टरांनी दर वाढवल्यामुळे वेळू उत्पादकही त्याच दरानं बुरुड व्यवसायिकांनी वेळू घ्यावा, अशी अट ठेवू लागले. त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या या बुरुड  व्यवसायिक लोकांवर उपासमारीची वेळ येते की, काय अशी भीती वाटू लागली. स्थानिक बाजारपेठेबरोबरच हा तयार होणारा माल बेळगाव, निपाणी इत्यादी मोठ्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर मागवला जात असे. हल्ली तर काही मोठे व्यापारी हा माल थेट उत्पादकांच्या घरातूनच उचलत असत. त्यामुळेबुरुड व्यवसायिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचत असे.

वर्षानुवर्षे संकटांना तोंड देत बुरुड व्यवसाय आजही तग धरुन

दुष्काळात तेरावा महिना म्हणतात, तसं कोरोनाचं जागतिक संकट आलं आणि यांना सुद्धा जागच्या जागी थांबावं लागलं. स्थानिक बाजारपेठा आणि आजूबाजूचं सगळं दळणवळण पूर्णपणे बंद झाल्याने तयार झालेल्या कच्च्या मालाचं आणि उत्पादनांचं करायचं काय?, असा प्रश्न बुरुड व्यावसायिकांना पडू लागला. बाजारपेठाच बंद झाल्या तर उत्पादनं घेऊन करायचं काय? म्हणून व्यापाऱ्यांनीही पूर्णपणे पाठ फिरवली. बरं, आजूबाजूच्या गावागावात जावून विकावं तर तेही शक्य नव्हतं. प्रत्येक गावानं आपापल्या वेशी बंद केल्या. त्यामुळे दुसर्‍या  गावात शिरायचंही अवघड आणि हे संकट टळायचंही नाव घेईना. बघता-बघता सात महिने झाले. मोठ्या प्रमाणावर तयार झालेली उत्पादनं वाळवी आणि बुरशी लागून कधीच नाहीशी झाली.

या सगळ्या जंजाळात एक प्रश्न मात्र कायमचा त्या लोकांच्या कपाळावर कोरला गेला तो म्हणजे, जगावं की मरावं...? बुरुड व्यवसायाप्रमाणेच कोरवी (कोरीव काम नव्हे) काम करणाऱ्या, जे जंगलातून कारवीच्या सरळ काट्या आणून बुट्ट्या आणि कणगी बनवायचे, पण जंगलात जाण्यावर बंदी आल्याने तो व्यावसायही कधीच बंद झालाय. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, उघड्यानं फुगडी घालणाऱ्या नट नट्यांच्या मागं धावणार्‍या आणि त्यांना अवास्तव महत्व देणाऱ्या आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणावणार्‍या माध्यमांना गावगाड्यावरचं हे दुःखं जराही नजरेस पडू नये, यापेक्षा शरमेची दुसरी कोणती गोष्ट असू शकते...?

संपादन : बाळकृष्ण मधाळे

इतर ब्लॉग्स