कलेचा नृत्याविष्कार

Sharvari luth blog.jpg
Sharvari luth blog.jpg

भारत हा नानाविध भाषा व संस्कृती असणारा देश आहे. भारतात संस्कृती व विकासाच्या सर्व अडथळ्यांवर मात करत वेगवेगळ्या जाती-जमातींना एकत्र आणण्याचे काम नृत्य व संगीताने केले आहे. नृत्य हे आनंद व्यक्त करण्याचे महत्त्वाचे साधन असून, समजण्यास सोपा असा कलाप्रकार आहे. नृत्य हा पूर्वापार भक्तिभावाचा भाग होता. देवळातील मूर्ती, खांब, चित्रे याचे दाखले आहेत. माणूस व प्राण्यांमधील अभाषिक संवाद, निर्जीव गोष्टींची हालचाल उदाहरण (वाऱ्यामुळे होणारी पानांची सळसळ) तसेच काही संगीतप्रकार व्यक्त करण्यासाठीही नृत्याची मदत घेतली जाते. नृत्याची मांडणी व रचना करण्याची कला म्हणजे नृत्यदिग्दर्शन (कोरिओग्राफी), तर जी व्यक्ती हे काम करते तिला नृत्यदिग्दर्शक (कोरिओग्राफर) म्हणतात. नृत्याची व्याख्या सामाजिक, सांस्कृतिक, कलात्मक नैतिक मर्यादांवर अवलंबून असते. लोकनृत्य ते नृत्यनाट्य (बॅले) अशी नृत्याची व्यापक कक्षा आहे. 

भारतातील नृत्याचा सर्वांत जुना पुरावा सिंधू संस्कृतीतून मिळतो. हडप्पातील पुरुष नर्तकाचा पुतळा व मोहेंजोदरोमधील नर्तकीची तांब्याची मूर्ती हे या संस्कृतीतील कलेचे दोन महत्त्वाचे पुरावे आहेत. या मूर्ती तत्कालीन मूर्तिकारांच्या कलात्मकलेचा वा कौशल्याचा केवळ पुरावा नाहीत तर त्या वेळच्या समाजजीवनातील नृत्यकलेचे असाधारण महत्त्व व नृत्यकलेची विकसित प्रगतावस्था यांचेही पुरावे आहेत. डोळ्यांच्या हालचाली, चेहऱ्यावरचे भाव व मुद्रा यातून होणारी भावनांची अभिव्यक्ती म्हणजे नृत्य. जेव्हा गोष्ट वा कल्पना साहित्य मुद्रा व अभिनयाच्या माध्यमातून मांडली जाते तेव्हा नृत्य साकारते. भारतात नृत्यांचे अभिजात नृत्य (क्‍लासिकल डान्स) व लोकनृत्य (फोक डान्स) अशी विभागणी झालेली दिसते. भरतनाटयम, कथक, कथकली, मणिपुरी, ओडिसी, कुचिपुडी, मोहिनीअट्टंम हे नृत्यप्रकार अभिजात सदरात येतात, तर बिहू भांगडा, घुमर, गरबा, दांडिया रास, कोळीनृत्य, देशावतार बोहाडा, लेझीम, गोफ, ढोल, तंबोरी, नारदीचा नाच, राधा गौळण हे लोकनृत्यात मोडतात.
 
महाराष्ट्राला अभिजात नृत्याची परंपरा नसली तरी लोकनृत्याचा समृद्ध वारसा आहे. महाराष्ट्रातील गोंड भिल्ल, कातकरी ठाकूर, कोरकू इत्यादी आदिवासी जमातींचे वैशिष्ट्यपूर्ण नृत्यप्रकार आहेत. ज्या वाद्यांच्या साथीने ही नृत्ये केली जातात त्याच वाद्यांच्या नावाने ती ओळखली जातात. ढोलाचा नाच, तंबोरीचा नाच, तारपीचा नाच इत्यादी महाराष्ट्रातील काही मागास जमातींत, कडकलक्ष्मी, भगत, वीर अशी विशिष्ट धार्मिक विधींशी संबंधित लोकनृत्ये आहेत. सागरकिनाऱ्यावरील भागात कोळीनृत्याचे अनेक प्रकार रूढ आहेत. महाराष्ट्रातील नागरी समाजात टिपरी व गोफनृत्ये लोकप्रिय आहेत. लेझीम हाही एक नृत्यप्रकार देवदेवतांच्या पालख्या, मिरवणुका, जत्रा, उत्सवप्रसंगी बघायला मिळतो. हल्ली पाश्‍चिमात्य नृत्याची पाळेमुळे भारतात रुजलेली पाहावयास मिळतात. प्रामुख्याने आजची तरुण पिढी याकडे आकर्षित झालेली दिसते. पाश्‍चिमात्य नृत्याच्या इतिहासात पुरातन काळापासून आजतागायत अनेक आधुनिक नृत्यप्रकारांनी स्थान मिळविलेले आहे. पाश्‍चिमात्य देश, युरोप त्याचप्रमाणे जिथे जिथे युरोपियन वस्त्या होत्या, तेथील नृत्यात जलदगतीने बदल होत त्यात वैविध्यता आली. 

पाश्‍चिमात्य नृत्याने समाजातील विविध स्तरांतील धार्मिक जातीय व सामाजिक नृत्यांना आपल्यात सामावून घेतले, तर पूर्वेकडील नर्तक मात्र शतकानुशतकांपासून चालत आलेल्या नृत्यप्रकारातच गुंतलेले राहिले. पाश्‍चिमात्य संगीतावर आधारित अनेक नृत्यप्रकार व शैली ज्या अमेरिकन देश व पाश्‍चिमात्य संस्कृतीशी निगडित होत्या त्या ग्रामीण (कंट्री) वा काउबॉय या नावाने प्रसिद्ध झाल्या. पाश्‍चिमात्य युगल नृत्य हा सामाजिक नृत्याचाच प्रकार आहे. टू स्टेप, वॉल्टझ, हिपहॉप, काउबॉय, चाचा, पोलका टेन स्टेप, स्कॉटिश, इस्ट कोस्ट स्विंग, वेस्ट कोस्ट स्विंग, नाइट क्‍लब टू स्टेप हे पाश्‍चिमात्य संगीतावर आधारित काही नृत्यप्रकार आहेत. बॉलरूम, जॅझ, स्विंग लॅटिन, टॅप डान्सिंग टॅंगो, लाइन डान्स आणि इतरही अनेक नृत्यप्रकार आहेत. अमेरिकेची ज्युलिअर्ड स्कूल ऑफ डान्सिंग, यू.के.ची गिल्डहॉल स्कूल ऑफ म्युझिक या जगविख्यात नृत्यशाळा आहेत. बॅले हा आणखी एक अतिशय सुंदर पाश्‍चिमात्य नृत्यप्रकार. हा अत्यंत काटेकोर व औपचारिक पदन्यास व हावभाव असलेला संगीतावर आधारित कलापूर्ण नृत्याविष्कार रेनेइसन्स काळात इटलीत याचा आरंभ झाला. स्वेतलाना झाकरोवा, मिस्टी कोपलॅंड या काही ख्यातनाम बॅले नर्तिका आहेत. 

नृत्य हा एक सुंदर कलाप्रकार आहे. आविष्कार व अभिव्यक्तीसाठी यात शरीराचा साधन म्हणून उपयोग केला जातो. मुलांना स्वत:बरोबर आपली संस्कृती व जगाची चांगली ओळख नृत्यातून होते. उदय शंकर यांनी भारतीय नृत्यप्रकारात आधुनिक पाश्‍चिमात्य बॅलेचा प्रवाह आणला. महाराष्ट्रात अभिजात नृत्यप्रकारांचा प्रसार व नृत्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय उदय शंकर व मेनका या नृत्यकारांकडे जाते. दमयंती जोशी, पार्वती कुमार, रोहिणी भाटे, मंदाकिनी मालवीय, कनक रेळे, हेमामालिनी, सुचेता भिडे यांनीही नृत्याला एका उंचीवर नेऊन ठेवले. उगाच नाही मार्थ ग्रॅहमने "नृत्यालाही आत्म्याची अदृश्‍य भाषा' असे म्हटले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com