छत्रपती संभाजीराजे : आदर्श स्वराज्यरक्षक (जयंती विशेष)

Article by Shivanand Bhanuse on Chhatrapati Sambhaji Raje
Article by Shivanand Bhanuse on Chhatrapati Sambhaji Raje

त्रपती संभाजीराजे,इतिहासाच्या पानोपानी सुवर्णाक्षरांनी कोरले गेलेले नाव. तेजस्वी मुद्रा,आणि तितकेच तेजस्वी प्रखर कार्यकर्तुत्व.... स्वच्छ सुंदर नितीमत्तेने भरलेली जीवनशैली. निर्व्यसनी आणि चारित्र्यसंपन्न. शिवछत्रपतींच्या परिवारातील सर्वार्थाने पराक्रमी पुरुष म्हणून संभाजी राजांना इतिहासाने गौरवले आहे.स्वराज्याचा वारसा खऱ्या अर्थाने सांगणारा पुरुषार्थ संभाजीराजे मध्ये होता.मुघली सत्तेला शह देणारा एक मुत्सद्दी राजकारणी,शत्रूच्या सैन्याला रणमैदानात नामोहरण करणारा धुरंधर सेनानी. म्हणून त्यांची नोंद इतिहासाने केलेली आहे.त्याचबरोबर संभाजी महाराज हे अत्यंत सुसंस्कृत व विद्वान होते. त्यांनी संस्कृतमध्ये लिहिलेला 'बुद्धभूषण' ग्रंथ त्यांच्या विद्वत्तेची प्रचीती देतो.त्याचबरोबर 'नखशिक', 'नाइकाभेद' व 'साथशतक' हे ग्रंथ त्यांच्या उच्च शिक्षणाची व विद्वत्तेची साक्ष देतात. शिवरायांनी संभाजी राजांना शस्त्रास्त्रांच्या शिक्षणासोबतच कुशल प्रशिक्षक नेमून भाषा, व्याकरण, धर्मशास्त्रे, इतिहास, तत्त्वज्ञान, साहित्य, काव्य, राजनीति,विविध कला व क्रिडा इत्यादी अनेक गोष्टीचे शिस्तबद्ध प्रशिक्षण दिले. त्यामुळेच ते धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, चांगला राज्यकर्ता, न्यायप्रिय प्रशासक, लेखक-कवी, युद्धकुशल सेनानी म्हणून विकसित झाले.त्यामुळे त्यांना केशव पंडितानी 'सकलशास्त्र विचारशील आणि धर्मज्ञ शास्त्रकोविंद' अशा शब्दात गौरवले आहे. गागाभट्टाने आपला संस्कृत ग्रंथ 'समयनय' युवराज संभाजीराजांना अर्पण केला होता.  

शिवरायांनी संभाजी राजांना जाणीवपूर्वक प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करण्याची सवय लावली.ते आठ वर्षाचे असताना मोगलांकडे ओलिस म्हणून ठेवले. शत्रूच्या छावणीत न घाबरता वावरण्याची त्यांना सवय लागली. शत्रूची बलस्थाने व कमजोर स्थाने त्यांना माहीत झाली.आग्र्याला शिवराय कैदेत असताना ते रोज मोगल दरबारात जात होते. यामुळे त्यांना मोगल दरबारातले वातावरण, औरंगजेबाची कार्यपद्धती माहिती झाली. औरंगजेबाच्या अनेक सरदारासोबत त्यांचा स्नेह होता. या सर्व गोष्टीचा त्यांना संघर्षाच्या काळात उपयोग झाला. याचबरोबर शिवरायांनी त्यांना विविध महत्त्वाच्या संधी दिल्या. वयाच्या आठव्या वर्षी मोगलांचे पंचहजारी मनसबदार, दहाव्या वर्षी सप्तहजारी मनसबदार, तेराव्या वर्षी अनेक मोहिमांना सोबत नेणे व वऱ्हाड प्रांताची जबाबदारी देणे आणि चौदाव्या वर्षी दहा हजार तुकडीचा प्रमुख करून स्वतंत्र प्रशासकीय अधिकार देणे, यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला संधी मिळाली आणि त्यांच्या क्षमता विकसित झाल्या. प्रशासकीय काम, युद्धकला यामध्ये निपुण झाले.

वयाच्या पंधराव्या वर्षी शिवरायांनी त्यांना विलायती वकिलांशी चर्चा व करार करण्याचे अधिकार दिले. इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज वकिलांशी चर्चा केल्यामुळे त्यांचा मुत्सद्दीपणा व संभाषणकौशल्य विकसित झाले.परिणामी आपल्या कारकिर्दीत त्यांना या सर्व विलायती व्यापार्‍यावर जरब ठेवता आला.याचबरोबर त्यांना बालपणापासून मैदानी खेळाची आवड होती. त्यामुळे त्यांचे शरीर सुदृढ व बलदंड होते. शिवराय दक्षिण दिग्विजयाला गेल्यानंतर शंभुराजे शृंगारपुरला असताना त्यांच्या दिनचर्या बद्दलचे अनेक वर्णने आढळतात. युवराज संभाजीराजे रोज नियमाने व्यायाम व कसरती करत असत. त्यांना मल्लखांबाची व मैदानी खेळाची आवड होती. रायगडावर ही एक लोहस्तंभ आहे. त्याला संभाजीचा मल्लखांब म्हणतात. इतिहास, नीतिशास्त्र, कायदे व नियम यांचा अभ्यास ते करीत असत.आणि आपल्या उत्कृष्ट न्यायदानामुळे सामान्य रयतेचे समाधान करीत असे.त्यांनी धनुर्विद्या व अन्य शस्त्रकलांची तालीम करून स्वतःला युद्धकुशल बनवीले. मलखांब, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे व विविध मैदानी खेळामुळेच ते कसून तयार झाले. त्यामुळेच सततच्या मोहिमा लढाया व घोडदौड सुरू असूनही त्यांचे आरोग्य उत्तम होते.ते आजारी पडल्याची एकही नोंद सापडत नाही. याच शारीरिक ताकतीमुळे औरंगजेबाने सतत एक महिना अमानुष छळ करून देखील त्यांचे मनोबल कायम होते.

अत्यंत निडरपणे त्यांनी औरंगजेबाचा सामना केला. याचबरोबर शिवरायांनी संभाजी राजांना विविध देशी-विदेशी महत्त्वाच्या भाषा व बोली भाषा शिकवण्याची व्यवस्था केली होती.या भाषा शिकून पारंगत झालेल्या संभाजीराजांनी विलायती वकिलांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधला. त्यांनी स्वराज्य हिताचे अनेक करारमदार केले. त्यांच्या बहुभाषिकतेमुळे त्यांच्यापासून काही लपवणे या विदेशी व्यापाऱ्यांना शक्य नव्हते. या भाषाकौशल्या मुळेच त्यांना कर्नाटक, गुजरात मधील राजकारण व्यवस्थित हाताळता आले. त्यात भाषिक ज्ञानाचा खूप उपयोग झाला.त्यांनी एक संस्कृत तर हिंदी व इतर भाषेत तीन ग्रंथ लिहिले.मानवी मनात येणारे विचार, कल्पना,सुचणारे काव्य यांचे आयुष्य अत्यंत कमी असते. वाचलेली, ऐकलेली, सुचलेली महत्त्वाची गोष्ट क्षणभंगुर असते. मग ती गोष्ट ज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रातील असो. ती एकदा विस्मरणात गेल्यावर पुन्हा लवकर आठवत नाही. त्यामुळे मनात आलेले महत्त्वाचे विचार व कल्पना कागदावरच लिहून काढणे अत्यावश्यक ठरते. संभाजीराजांनी वाचलेल्या, ऐकलेल्या, सुचलेल्या सर्व विचारांच्या वेळोवेळी व्यवस्थित नोंदी ठेवल्या. 

संभाजीराजांचे शेतकरी व शेती विषयक धोरण आजही मार्गदर्शक ठरते. महसुलाची वसुली, वतनदारावर जरब, नद्यांचे पाणी अडवून कालव्याद्वारे शेतीला देणे, उतारावरून वाहून जाणारे पावसाचे पाणी बांध घालून आडवीणे, दुष्काळात कर्जमाफी व सारामाफी, शेतकऱ्यांचा सन्मान. शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध करून देणे. इत्यादी उपायोजनामुळे त्यांच्या राज्यात शेतकरी सुखी होते. याचबरोबर वैदिकांनी धर्माने शूद्र ठरून सर्व हक्क अधिकारापासून वंचित ठेवलेल्या स्त्रीला संभाजीराजांनी सन्मान दिला. त्यांनी येसूबाईला स्वतंत्र शिक्का देऊन अभिषिक्त राजाचे राजाज्ञा काढण्याचे अधिकार दिले आणि गुलामी प्रथा बंद केली. त्यांनी विषमतावादी वैदिक धर्माची गुलामगिरी नाकारून समतावादी शाक्त धर्माचा स्वीकार केला. संभाजीराजांनी भारतीय समाजात शोषणाचे मूळ असलेली जातीव्यवस्था व स्त्रीदास्य नाकारले. त्यांनी आपल्या राज्यात नेमणुका देताना जात-पात न पाहता फक्त कर्तुत्वाच्या आधारे नेमणुका केल्या. हलक्या समजल्या गेलेल्या जातीच्या लोकांना, अस्पृश्य,आदिवासींना महत्त्वाची पदे दिली.ते धर्मवीर नव्हते ते स्वातंत्रवीर होते. त्यांचे राजनैतिक कौशल्य आपल्या कर्तव्यप्रती व सामान्य जनतेप्रती त्यांची बांधीलकी, त्यांची अभ्यासूवृत्ती, त्यांची बेडरवृत्ती, आत्मविश्वास व मुत्सद्दीपणा यासह वरील सर्वच गोष्टी अनुकरणीय आहेत. ते आदर्श स्वराज्यरक्षक होते.या सर्वांमधून सर्वांनी त्यांचा अदर्श घेऊन एक समतावादी, कर्तुत्ववान, बुद्धीप्रामाण्यवादी, विज्ञानवादी, संवेदनशील व आनंदी समाजाची निर्मिती करणे हीच शंभूराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली ठरेल.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com