लॉकडाउनमधील कलात्मक प्रवास 

युवराज यादव 
Tuesday, 14 July 2020

आजवर केवळ प्रमोशनसाठी वापरत असलेल्या सोशल मीडियाचाच वापर यासाठी करायचा ठरवतो आणि मग सुरू होतो लॉकडाउनमधल्या सृजनाचा एका वेगळ्या वाटेवरचा विविधांगी प्रवास... 

कोणतीही कला सादर करण्यासाठी किंवा तिची निर्मिती करण्यासाठी एकत्र येणं, हे अनिवार्य. कोरोनामुळे मात्र प्रत्येक जण आपापल्या घरात, शहरात, भागात अडकून पडला आहे. अशा अवस्थेत मग त्याच्यातील कलात्मक, सृजनात्मक मन तडफडू लागतं. त्यासाठी तो नवी वाट शोधू लागतो. नवनव्या संकल्पनांचा विचार करू लागतो. आजवर केवळ प्रमोशनसाठी वापरत असलेल्या सोशल मीडियाचाच वापर यासाठी करायचा ठरवतो आणि मग सुरू होतो लॉकडाउनमधल्या सृजनाचा एका वेगळ्या वाटेवरचा विविधांगी प्रवास... 

या कलात्मक प्रवासाची सुरवात होते ती भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकारांपासून. स्टार ऑफ मिलेनियम अमिताभ बच्चन, सुपरस्टार रजनीकांत आणि देशभरातील प्रसिद्ध कलाकार याचे प्रमुख साथीदार होतात. अमिताभ यांचा काळा चष्मा हरवतो. मग इतर कलाकारांची त्यांचा चष्मा शोधण्यासाठी धडपड सुरू होते आणि एक भन्नाट संकल्पना सादर होते. इथे प्रत्येक जण आपल्या घरात बसून यात सहभागी झालेला. ही संकल्पना लॉकडाउनमधील स्थितीमुळेच सुचली आणि मग लॉकडाउनमधील सृजनाची एक साखळीच तयार झाली. वेगवेगळे कलाकार वेगवेगळ्या संकल्पनांवर काम करू लागले... "चला हवा येऊ द्या' आणि "महाराष्ट्राची हास्य जत्रा'च्या कलाकारांनीही अशाच प्रकारचे व्हिडिओ बनविले. प्रायोगिक नाटकांतील कलाकारांनीही अभिनय कल्याण या संस्थेतर्फे क्‍वारंटाईन थिएटर उभे केले. दिग्दर्शक अभिजित झुंजारराव यांनी बालाजी सुतार यांच्या व्हॉट्‌सऍपवरील अभिव्यक्‍ती स्वातंत्र्यावरील एका पोस्टवर व्हिडिओ बनविला. अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याच्या स्थितीवर यात त्यांनी भाष्य केले. त्यांचा हा प्रयोग असाच पुढेही सुरू होता. 

लॉकडाउनमुळे कवींच्या काव्यप्रतिभेला नवे धुमारे फुटले. सोशल मीडियावरून त्यातील अनेक कविता आपल्याही मोबाईलच्या स्क्रिनमध्ये उतरल्या असतील. यातील एक महत्त्वाची म्हणजे- कवीश्रेष्ठ गुलजार यांची- 
गुजर जाएगा 
मुश्‍कील बहोत है, मगर वक्‍त ही तो है- गुजर जाएगा 
जिंदा रहनेका ये जो जज्बा है, फिर उभर आयेगा- गुजर जाएगा 

थबकलेल्या अनेकांना या काव्यपंक्‍तींनी नवी आशा, नवी उमेद दिली असणार. अशा अनेक वैयक्‍तिक कवितांबरोबरच सामूहिक कविता सादरीकरणाचेही विविध प्रयोग फेसबुक पेज, व्हॉट्‌सऍपवर रंगताना दिसतात. एका फेसबुक पेजने आपला तिसरा मासिक प्रयोग थेट फेसबुक लाईव्ह कवी संमेलन आयोजित करून साजरा केला. यात सौरभसाठी, पूजा भडांगे, रश्‍मी मरडी, चैतन्य जोशी आणि स्वरराज शेंडे यांनी सहभाग घेतला. आणखी एक वेगळा प्रयोग म्हणजे गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी आखला. तो म्हणजे "तरही मुशायऱ्याचा'. भारतरत्न रविशंकर यांची जन्मशताब्दीनिमित्त त्यांची कन्या अनुष्का शंकर यांच्या संकल्पनेतून आणि रविशंकर यांच्या शिष्यांच्या सहभागातून 7 एप्रिलला "संध्या रागा'ची ऑनलाईन जुगलबंदी रंगली. 

याशिवाय, इतरही अनेक कलात्मक, सृजनात्मक प्रयोग, विविध संकल्पना या दरम्यान पाहायला, ऐकायला, वाचायला मिळाल्या. शब्दमर्यादेच्या बंधनात सर्वांचेच इथे उल्लेख शक्‍य नाहीत; मात्र संकल्पनेच्या आकाशाला अंत नाही, हेच यावरून साऱ्या कलाकारांनी सूचित केले. ते यापुढेही असेच सुरूच राहणार आहेत. लॉकडाउन संपेपर्यंत आणि त्यानंतरही... 

संपादन - युवराज यादव

इतर ब्लॉग्स