गावाकडंची माती...

मेघना जाधव (सातारा)
गुरुवार, 21 मे 2020

लोक या ना त्या गोष्टीवरून एखाद्या गोष्टीची माती झाली असं सहज बोलतात. पण त्याच मातीतून नव्याने सोनं पिकवता येतं हे तू दाखवून दिलंस. तू नाती जपलीस म्हणून माझा नात्यावर विश्वास आहे... तू माझ्यात प्रामाणिकपणा, विश्वास, संयम, धैर्य, चिकाटी यांसारख्या बऱ्याच गोष्टी पेरल्या आहेत... 

प्रिय, 
एका छोट्याशा गावात माझा जन्म झाला आणि मी तुझ्याशी जोडले गेले. तुझ्यासोबत खेळण्यात माझं बालपण गेलं. मग आपलं नात घट्ट होत गेलं. हळूहळू समजत होते मी तुला... तू खूप काही केलंस माझ्यासाठी. माझ्या शेतकरी बापाच्या चेहऱ्यावर आनंद पिकवलास. आईच्या चेहऱ्यावर समाधान पसरवलंस आणि बांधून ठेवलंस आमच्या घराला सुखाच्या धाग्यांमध्ये... 

काळ भराभर निघून गेला आणि मी शिक्षणासाठी घरटं सोडलं... तेव्हा खूप आठवण यायची तुझी. आपल्या माणसांची. बाहेरचं व्यवहारी जग, पावलोपावली आपल्या भोळेपणाचा फायदा घेणारे लोक आणि आपला चांगुलपणा जपता जपता होणारी दमछाक, तो मानसिक त्रास, या सगळ्यात जीव मेटाकुटीला यायचा. वाटायचं सोडून द्यावं सगळं अन्‌ परतावं तुझ्याकडे... आईच्या कुशीत जाऊन मन भरून रडावं... बाबांसोबत गप्पा मारत तुझ्यासोबत अंगणात बसावं आणि आपल्याच धुंदीत गावभर फिरावं..., शेतात फेरफटका मारावा आणि मग पाहतच राहावं तुझ्या गर्भातून जन्म घेतलेल्या, वाऱ्यावर दिमाखात डुलत असलेल्या त्या दाण्यांनी भरलेल्या कणसांच्या ताटांकडे... 

मला नेहमी प्रश्‍न पडायचा गाव आणि शहरामधल्या माणसांमध्ये एवढा फरक का..? पण शहरात गेल्यावर लक्षात आलं... जिथं माती नाही तिथं मातीतले संस्कार होणार तरी कसे? संस्कार देणाऱ्या घटकांशी एकदा मनाने जोडलं गेलं की आपोआप संस्कार होतात आणि ते तुझ्यामुळे मिळाले. जग भयंकर रोगाच्या विळख्यात सापडले असताना, गावाला आणि तुला विसरून गेलेले कित्येक लोक पुन्हा परतले आणि तुही मोठेपणानं त्यांना आपलंसं केलंस आणि तुझ्याबद्दलचा आदर अजून वाढला. 

तुझ्या आणि माझ्या नात्यामध्ये फक्त एका वेलांटीचा अडसर आहे. पण त्याच वेलांटीने कडी बनून आपल्या नात्याला जोडलंय, हे विसरता येणार नाही... लोक या ना त्या गोष्टीवरून एखाद्या गोष्टीची माती झाली असं सहज बोलतात. पण त्याच मातीतून नव्याने सोनं पिकवता येतं हे तू दाखवून दिलंस. तू नाती जपलीस म्हणून माझा नात्यावर विश्वास आहे... तू माझ्यात प्रामाणिकपणा, विश्वास, संयम, धैर्य, चिकाटी यांसारख्या बऱ्याच गोष्टी पेरल्या आहेत... प्रेम म्हणजे काय? हे तुझ्याइतकं कुणीच शिकवू शकलं नाही. अगं दुःख झाल्यावर सुध्दा अश्रू जपून ठेवून लोकांचे संसार फुलवणारी तू माझ्या काळजात भली मोठी वस्ती करणारी प्रेरणा आहेस... 

माझे माय बाप तुझ्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतात गं... तू कोरडी पडल्यावर स्वतःचा घाम गाळून ते तुझा ओलावा जपतात आणि तू माणुसकीचा ओलावा जपतेस. आम्हाला भरभरून देतेस. आज तू आहेस म्हणून आम्ही आहोत... तुझे आभार मानून कधीच परकं करणार नाही तुला. पण तुझ्या ऋणात मात्र नेहमी असेन... 
- तुझीच, 
एक गावाकडची लेक 

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या