आजही वाजेल शाळेची घंटा ! 

School_bell
School_bell

सकाळी सातची वेळ होती. मी रोजच्याप्रमाणे व्यायाम म्हणून चालायला निघालो. चालत चालत माझे पाय सहजच माझ्या शाळेकडे फिरले. शाळा बंद होती. ती शाळेची घंटा अजून वाजते का, याकडे माझे लक्ष गेले. पुसटशा शाळेच्या आठवणी मनात येऊ लागल्या. 

मी खरं तर राहणारा सोलापूरचा; परंतु माझे शिक्षण पाचगणीच्या संजीवन विद्यालयामध्ये झालेले. क्षणात आठवणीची ओढ मला पाचगणीला घेऊन गेली. सोलापुरामध्ये असताना मी एका खासगी शाळेत शिक्षण केले. सोलापुरात शिक्षण झाले. आता वेळ आली होती ती की थोडे परिवर्तन करण्याची. 

आई-वडिलांनी सर्वतोपरी प्रयत्न करून आणि विचारधारणेला धरून नवीन शाळेचा अभ्यास केला. पाचगणीच्या संजीवन विद्यालय व न्यू एरा शाळेविषयी खूप ऐकले होते. संस्कृतीला साजेशा संजीवन शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचे ठरवले गेले. प्रथम शाळा पाहण्यासाठी आई, बाबा, मी, माझा भाऊ व माझी बहीण सर्व पाचगणीला पोचलो. सुंदर असे शाळेचे रूप आम्हास दाखवणारे एक आर्मी रिटायर शिक्षक होते. हॉस्टेल म्हणजेच वसतिगृहात राहण्याची आमची पहिली वेळ होती. ती पण जेव्हा आम्ही शाळेचे रूप, इमारत, संस्कार पाहिले तेव्हा मनात ठरवले की याच शाळेत दाखला घ्यायचा. वसतिगृहात राहण्याच्या गोष्टीचे आई-वडिलांना दडपण आले होते; परंतु मी, माझा भाऊ व बहीण राहणार असल्यामुळे थोडी काळजी कमी झाली होती. ती एकमेकांना साथ होती. 

थोड्या दिवसांतच आमची परीक्षा झाली. थोड्या काळानंतर दाखला मिळण्याचे पत्र आम्हा तिघांनाही आले. त्याकाळी संजीवन विद्यालय अतिशय उत्तम शाळा होती. महाराष्ट्रात नव्हे, भारतातच नव्हे तर परदेशातही शाळेची कीर्ती होती. 

आईवडिलांनी आणि आम्ही तिघांनीही शाळेची तयारी केली. अर्थात वसतिगृह आणि त्यात राहणीमान कसे असेल याची उत्सुकता होती; परंतु आईवडिलांना सोडून जायची खंत मनात होती. आजही मला शाळेचा पहिला दिवस आठवत आहे. मी शांतपणे माझ्या बिछान्यापाशी बसलो होतो. थोडी तयारी करत आईवडिलांनी माझा निरोप घेतला. तेव्हा क्षणभर मन भरून आले. आईवडील दुःख लपवत तेथून निघून गेले; पण मला आजही त्यांची काळजी व त्याग दोन्ही लक्षात आहे. पोरं मोठी झाली की आपलं घर सोडतात, हे त्यांना ठाऊक असावे खरे; पण तरी मनावर दगड ठेवून दोघेही तेथून निघून गेले. 

माझ्या नवीन प्रवासाची सुरवात झाली. शाळेत मी तीन वर्षे होतो. नावाप्रमाणे संजीवन विद्यालय नवसंजीवनी देणारे होते. सर्व क्षेत्रात वरचढ व गुणांना वाव देणारी शाळा ठरली होती. अभ्यासात, कलेत, खेळात तसेच संस्कारात भर पडत गेली. वसतिगृहात राहताना स्वतःच्या जीवावर, स्वबळावर स्वतःमध्ये सुधारणा होताना दिसून आले. वसतिगृहात राहताना स्वतःचे निर्णय घ्यायची ताकद निर्माण झाली. स्वतःचे निर्णय आणि त्यातून मिळालेला अनुभव व्यक्तिमत्त्व विकासाला पूरक ठरली होती. माझ्यामध्येच नव्हे तर सर्व विद्यार्थी वर्गात हा अनुभव समानच होता. नेतृत्वगुण विकसित झाले. दृष्टिकोन बदलला गेला. आयुष्याला मिळणारी प्रेरणा कशी जागवावी हे वसतिगृहात राहून शिकलो. अनेक मित्र झाले. मित्रांच्या संगतीत राहात गुण - कौशल्यामध्ये भर पडली. कलागुणांची मेजवानी या शाळेतच मिळाली. व्यायाम, खेळ यात कौशल्य सर्वांनाच मिळत गेले. शिक्षकवर्ग सर्वांना अप्रतिम गुणांचा खजिना करून ठेवत होते. अशाप्रकारे व्यक्तिमत्त्वाचा विकास होत गेला. आज जीवनाच्या प्रवासात शाळेची आठवण येते. पण त्या शाळेत शिकलेले धडे आयुष्यभर कामाला येतील असा मला व सर्वांचा विश्वास आहे. 

आज शाळा सोडून वीस वर्षे झाली. शाळा पाहण्याची इच्छा होत असताना माझे मन शाळेकडे वळले. मी पाचगणीला पोचलो; परंतु शाळेत जायची हिंमत होईना. शाळा आता तशी राहिली नव्हती, ती जशी आमच्या काळात होती. पाचगणीच्या अनेक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद झाल्या होत्या असे समजले. मी शाळेत वीस वर्षांनी पाऊल ठेवले. शाळेच्या भिंती थकल्या होत्या. तडे गेलेली भिंत होती. ते विद्याथी, त्यांची किलबिल व घंटानाद सर्व शांत वाटत होते. माझी शाळा आता थकली होती. ती शाळेची घंटा शांत झालेली दिसत होती. विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये दुवा असणारी शाळा आता शांत झालेली दिसली, तेव्हा मन सुन्न झाले. 

ज्या शाळेने अनेक विद्यार्थी घडवले आणि त्यांना प्रेरणा दिली, ती शाळा, तो घंटानाद शांत पाहवत नव्हता. शाळेच्या समोर मोठे प्रश्न असतील, पण त्यातून मार्ग निघेल आणि पुन्हा ही शाळा विद्यार्थी वर्गासाठी प्रेरणास्रोत ठरेल असे वाटत आहे. एकंदरीतच, आज अनेक प्रश्न शाळेसमोर उभे आहेत; पण समाज, राज्य, देश आणि जग घडवायचे असेल तर सर्व शाळांना व विद्यार्थ्यांना बळकटी दिली पाहिजे, हे तेवढेच खरे आहे. 

आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक शाळा बंद होत आहेत. शाळेसमोर गंभीर प्रश्न उभारले आहेत. त्यातच विद्यार्थी आणि शाळा या दोघांचेही नुकसान होऊ नये असेच वाटत आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा; जेणेकरून शाळा, विद्यार्थी आणि शिक्षण प्रणाली ही विकसित व्हावी, असे वाटते. 

- ऋत्विज चव्हाण 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com