‘राष्ट्रवादी’च्या भ्रमराला ‘कमळा’ची मोहिनी

अविनाश म्हाकवेकर | avinash.mhakawekar@esakal.com
Monday, 9 November 2020

राज्यातील आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यातून विस्तव जात नाही. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात अगदी गुण्यागोविंदाने कारभार सुरू आहे. अगदी दोनच दिवसांपूर्वीची घटना आहे, उपमहापौर निवडणुकीत सत्ताधारी भाजपने विनंती केली आणि विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेतली. सगळे कसे फिलगुड!

राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येणार, असा तमाम राजकीय धुरिणांचा दावा गेल्या विधानसभा निवडणुकीत होता. मात्र, राष्ट्रवादीचे नेते पायाला भिंगरी लावून फिरत होते. यातूनच साताऱ्यातील सभेत धो-धो पाऊस सुरू झाला आणि वातावरण असे काही बदलले की ‘धो डाला’. पाऊस हे एक निमित्त झाले; पण नेतेमंडळी पावसाची वाट बघत बसले नव्हते. आपल्या वयाची, प्रकृतीची तमा न बाळगता दिवसात चार-चार सभा घेत कित्येक किलोमीटरचा प्रवास करीत राहिले. या अथकतेतूनच आघाडी सरकार स्थापन झाले याची साऱ्यानांच माहिती आहे. मात्र, यातील बोध पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी घेतलेला नाही. अन्यथा उपमहापौर निवडणूक रिंगणातून त्यांनी पळ काढला नसता. 

दोन दिवसांपूर्वी उपमहापौरपदी सत्ताधारी भाजपच्या केशव घोळवे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक झाली असती तरी तेच निर्विवाद विजयी झाले असते. कारण त्यांच्याकडे बहुमताचा तसा आकडा आहे. विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर केला. तसेच अर्ज भरल्यानंतर आता माघार नाही, शिवाय गुप्त पद्धतीने मतदान घ्यायला लावणार अशी गर्जनाही केली. मात्र, अर्ज माघारीच्या दहा मिनिटे अगोदर भाजपचे आमदार महेश लांडगे शहराध्यक्ष या नात्याने विरोधी पक्ष नेता दालनात गेले. त्यांनी ‘विनंती’ केली आणि दुसऱ्याच मिनिटात पळापळ झाली. अर्ज मागे घेतला गेला. वाह व्वा. महापालिका निवडणूक अवघ्या तेरा महिन्यांवर आली आहे आणि तुम्ही मैदानातून पळ काढलात? खरेच तुम्ही कौतुकास पात्र आहात.

विधानसभा निवडणूक प्रचारात ‘मला समोर कोणी पैलवानच दिसत नाही’ असे वाक्‍य भाजपवर उलटले होते. शहरात याची सुतराम शक्‍यता नव्हती. तरीही राष्ट्रवादीला याचे विस्मरण पडलेले आहे. वास्तविक निवडणूक लढवायला हवी होती. कारण रणांगणात उतरून स्वीकारलेला पराभव अधिक आनंददायी असतो. गुप्त पद्धतीने मतदानाची मागणीचा रेटाही लावला नाही. तो मान्य झाला नसता. समजा झालाच असता आणि तुमच्या मतानुसार त्यांची एकदोन मते जरी मिळाली असती तर आगामी निवडणुकीची ती लिटमस टेस्ट ठरली असती. परंतु, हे साऱ्यांच्या आकलनापलीकडचे आहे. ‘भाजपला विनंती करावी लागली’ अशा गावगप्पा हाणायला आता सगळेजण मोकळे.

राज्यात भाजप आणि आघाडी सरकार यांच्यातून विस्तव जात नाही. मात्र, गेल्या चार वर्षात शहरात असा हा साऱ्या गुण्यागोविंदाचा कारभार सुरू आहे. सभेत ऐनवेळचे विषय म्हणून कोट्यवधींच्या कामांचे प्रस्ताव भाजप घुसडतो; मात्र राष्ट्रवादीकडून साधा विरोधही होत नाही. भाजपमधीलच कोणीतरी भ्रष्टाचाराचे प्रकरण उकरून काढतो. आयता विषय हाती मिळतो, तरीही राष्ट्रवादीकडून आरडाओरड केली जात नाही. याची कारणे अगदी उघड आहेत. खासगीत भाजपचे नेते याच्या सुरस कथा सांगत असतात. त्यामुळे ते कधीतरी बोलतील आणि आपण उघडे पडू अशीच भीती राष्ट्रवादीमधील अनेकांना वाटत असावी. कोणीही सभागृहात किंवा रस्त्यावर उतरून आंदोलन केलेय, भाजपला माघार घेण्यात भाग पडलेय असे एकदाही झालेले नाही. मग सत्ता मिळवायची स्वप्ने कशाच्या बळावर पडत आहेत, याची काही कल्पना नाही. 

आगामी पुणे पदवीधर मतदारसंघ निवडीसाठी भाजपने केवळ शहरात १८ हजार पदवीधरांची मतदार नोंदणी करून घेतली. पक्षाने त्यांना १५ हजाराचे उद्दिष्ट दिले होते. म्हणजे तीन हजारने अधिकच केले. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीची काय तयारी आहे? भाजपने गेल्या चार वर्षात शहरात काहीच विकासकामे केली नाहीत, असे केवळ म्हणून उपयोग नाही. आपल्या पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रभागात भाजपपेक्षा चांगली कामे झाली आहेत, असे तुम्हाला म्हणता यायला हवे. भाजपला विरोधही करणार नाही, स्वतःची चार वर्षांतील कामगिरीही तुम्ही सांगणार नाही, असं कसं चालेल? विजिगीषू वृत्ती सोडून ‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी’ अशा मानसिकतेच्या राष्ट्रवादीला महापालिका निवडणुकीस शुभेच्छा.

इतर ब्लॉग्स