‘त्यांच्या’ आनंददीपाची वात तुमच्या हाती!

अविनाश म्हाकवेकर | avinash.mhakawekar@esakal.com
Monday, 26 October 2020

आज दसरा. वीस दिवसांनी दिवाळी. आपापल्या ऐपतीप्रमाणे खरेदी करालच. मात्र, रस्त्यावर पथारी पसरून बसलेल्या, हातगाडी लावून उभ्या असलेल्या फेरीवाल्यांकडून किमान एकतरी वस्तू घ्या. कोरोनात भल्याभल्यांची वाट लागलीय, तरीही वादळात दिवा प्रज्वलित करण्याचा प्रयत्न हे लोक करताहेत. आपण तो विझू नये, यासाठी प्रयत्न करायचा नाही, असं कसं चालेल?

कोरोनाने चार-पाच महिने घराबाहेर पडूच दिलेले नाही. त्यात गुढीपाडवा, अक्षयतृतीया, रमजान, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव बंदिस्त झाले. आता निदान दसरा-दिवाळी तरी थोड्या उत्साहात साजरी करता येईल. कारण, कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी झाला आहे. कोरोनाचा फटका प्रत्येकाला बसला आहे. आता कोठे आर्थिक घडी सावरू लागली आहे. बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. ग्राहकही आसुसले आहेत. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या ऐपतीप्रमाणे खरेदी करेल. कोण लहान दुकानांच्या पायऱ्या चढेल, तर कोण शॉपिंग मॉलमधील एक्‍सलेटरवर जाईल. मात्र, खरेदी करताना एकतरी वस्तू रस्त्यावरील, हातगाडीवरील करायला हवी. गेले काही दिवस दररोज सायंकाळी पाऊस कोसळत आहे. त्याने अनेकांच्या खरेदीचा मूड ऑफ केला आहे, तर रस्त्यावर उभे राहून किरकोळ विक्री करणाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

२३ वर्षांचा उस्मान कुरेशी चिंचवड गावातील चापेकर चौकात आकाशकंदील विकतो. बारावीपर्यंत शिक्षण झाले. स्वत:चे गॅरेज होते. कोरोनाने ते बंद पाडले. पोटाचा प्रश्‍न निर्माण झाला. मरण्याचीच वेळ आली तेव्हा बायको आणि दोन मुलींच्या साहाय्याने आकाशकंदील बनवून तो बाजारात आला आहे. एका फळविक्रेत्याच्या शेजारी दिवसभर उभा असतो. याच वयोगटाचा प्रल्हाद भांदिगरे भोसरी पुलाखाली पणत्या विकतो. कुंभाराकडून आणून त्याने त्या विविध रंगांनी छान रंगवल्या आहेत. पिंपरी कॅम्पमध्ये गेलात तर रिक्षाथांब्याजवळ ६० वर्षांच्या चिमाबाई अगरबत्तीचे पुडे घेऊन उभा असलेल्या दिसतील. त्या सकाळी सातपासून दुपारी दोनपर्यंत सात घरांत पोळी लाटण्यापासून लादी पुसण्यापर्यंतची कामे करायच्या. संध्याकाळी एका खाणावळीत पुन्हा पोळ्या लाटायला जायच्या. कोरोना आला आणि काम गेले. आता त्या नातवंडांसह फिरून अगरबत्ती विकतात. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वर्षानुवर्षे फेरीवाला म्हणून काम करणाऱ्यांच्या गर्दीत या नवागतांची भर कोरोनाने पाडली आहे. कोणाची नोकरी गेली, कोणाचा व्यवसाय बुडाला. कोणीतरी कोरोनाबाधित होऊन आर्थिक पुंजी संपलेला, मानप्रतिष्ठा गेलेला... अशा असंख्य कारणांनी हे लोक आता रस्त्यावर उभे राहून किरकोळ वस्तू विकत आहेत. यात जात-पात, धर्म, शिक्षण असं काहीही नाही. पोटासाठी आलेले हे लोक आहेत. बाजारात अजून सरावलेले नाहीत. कपड्यावरून, बोलण्यावरून चांगले दिसणारे हे लोक खचलेले आहेत. आपल्याला कोण ओळखणार तर नाही ना, या विचाराने त्यांचे डोळे भिरभिरताहेत. खरेदीसाठी येणाऱ्या शेकडो प्रकारच्या लोकांबरोबर मार्केटिंग कसे करावे, हे त्यांना समजत नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनेकदा फसवणूक होणे, भाव पाडून मागणे यामुळेही ते खचत आहेत. त्यातच पावसाने तर स्वत:चे संरक्षण करायचे की मालाचे, असा प्रश्‍न समोर आहे. भिजलेल्या मालाचे करायचे काय? तो घेणार कोण? उधारउसनवारी करून घेतलेला हा माल मातीमोल होईल, अशी भीती त्यांना वाटतेय. कोरोनाचा काळ लांबला किंवा त्याने आणखी उग्र स्वरूप धारण केले, तर आपल्यावरही संकट ओढवू शकते. याचा विचार करा व बाजारात जाल तेव्हा अशा प्रल्हादपासून उस्मानपर्यंतच्या लोकांकडून खरेदी करा. दरामध्ये घासाघीस करू नका. आपली एक पणती किंवा एक आकाशकंदील त्यांच्या घरात आनंदाचा प्रकाश पसरवू शकतो.

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या