‘भुंग्यां’ची भूनभून ‘कमळा’ला बाधक !

अविनाश म्हाकवेकर | avinash.mhakawekar@esakal.com
Friday, 11 December 2020

पिंपरी-चिंचवडकरांनी चार वर्षांपूर्वी भरभरून मते दिली. मात्र, भाजपची झोळीच फाटकी निघाली. सत्ता मिळवायचीच, या ईर्षेने कोणतीही पात्रता नसणाऱ्यांना उमेदवारी दिली आणि केवळ मोदी व भाजपचा बिल्ला या करिष्म्याने निवडणूनही आले. मात्र, त्यांना ‘संस्कार’च माहीत नसल्याने डोके आपटून घेण्याची वेळ पक्षावर आहे. कारभाराला चार वर्षे उलटली, निवडणूक वर्षभरावर आली; तरीही गोंधळ काही थांबत नाही.

महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची १५ वर्षे सत्ता होती आणि आम्ही ती उलथवली, असं सांगणं म्हणजे तो इतिहास झाला. आता लोकांचा सवाल आहे, तुम्हाला आम्ही सत्ता दिली ना? मग गेल्या चार वर्षांत तुम्ही या शहराला काय दिलंत? आणखी वर्षभराने तुम्ही मते मागायला दारात जाल तेव्हा तुम्हाला हेच प्रश्‍न छळणार आहेत. त्यावेळी काय सांगणार? आमची उमेदवार निवड चुकली? लोक हसतील. आताही लोक तेच करताहेत.

नगरसेवकांचे ‘बौद्धिक’ घ्यायला हवे

नेत्यांनी मुंबईतून केवळ बैठकांसाठी येऊन भाषणे झोडून न जाता आमदार, पदाधिकारी, नगरसेवकांचे ‘बौद्धिक’ घ्यायला हवे. साऱ्यांना प्रभात वर्गात डांबून भारत मातेचे स्तवन त्यांच्याकडून घोकून घ्यायला हवे. तसेच सायंशाखा, अतिसायंशाखा यामध्ये कोंडून घालून ‘आपल्या राष्ट्राचा भविष्यकाळ सामर्थ्यशील करायचा असेल, तर आपल्याला आपला परिसर, आपले गाव, आपले शहर या ठिकाणांच्या समस्यांचा विचार करून, या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील...’ असे बौद्धिक घ्यावे लागेल. कारण तुम्ही किती ओरडून सांगितलेत तरी ते तुमचे बटू नाहीत. केवळ नावाला पक्षाचे आहेत. साऱ्यांनी पक्षाला कधीच फाट्यावर मारलेले आहे. मी या भागाचा आमदार आणि हे माझे नगरसेवक! मी पक्षाचा असं म्हणायलाच कोण तयार नाही. चार वर्षात अशी एकही सभा झालेली नाही की एकमेकावर दुगुण्या झाडलेल्या नाहीत. त्यामुळे विरोधकांना यांची गंमत बघत बसण्याशिवाय दुसरे काही कामच ठेवलेले नाही.

नुकसानीचा अधिकार कोणी दिला

विधानसभा निवडणुकीत दोन्ही आमदारांना घाम फुटला होता. शिक्षक, पदवीधर मतदार संघांचा निकाल काय लागला हे साऱ्यांना माहीत आहे. वारे बदलत आहे. याचे भान कोणालाच नाही. सत्तेचे शहाणपण येण्याऐवजी मस्तवालपणा भरला आहे. यातूनच कालच्या स्थायी समिती सभेत माईक तोडले, काचेचे ग्लास फोडले, फाइल फाडल्या गेल्या. लोकांनी तुम्हाला शहराच्या विकासासाठी तिथे पाठवले आहे, महापालिकेचे नुकसान करायला नाही. सर्वसामान्य माणूस भरत असलेल्या कराची रक्कम कोट्यवधींची आहे. तिचा योग्य विनियोग कराल की स्वतः:चे खिसे भराल? कोणी दिला तुम्हाला हक्क असा बेलगाम वागण्याचा? निवडून आलात त्यावेळची शपथ आठवा. राज्यघटना वाचा. लोकप्रतिनिधींची कर्तव्य पहा आणि तशा पद्धतीने वागा. तुमची भाऊबंदकी घरी ठेवा. राजकीय ईर्ष्या आता बस्स झाली. शहराच्या विकासासाठी अभ्यासपूर्ण पुढे या.

संस्कार करण्याची वेळ निघून गेली

भाजप म्हणजे सगळं काही सुसंस्कार असं बाहेर कितीही मिरवून सांगितलं तरी पिंपरी-चिंचवडमध्ये उलट चित्र आहे. ठेकेदारी, टक्केवारी, लाथाळी आणि याला गाड, त्याला गाड म्हणजेच राजकारण असा भलताच समज इथे झालेला आहे. पक्ष पातळीवरील नेत्यांना याची सगळी माहिती आहे. भाजपचे जुने जाणते कार्यकर्ते, मतदार योग्य ती माहिती वरपर्यंत पोचवतात. मात्र, कानात वारू शिरलेल्यांना वेसण घालणे शक्‍य नाही, हे प्रदेश नेतृत्वाने स्वीकारलेले असावे, असे म्हणण्याइतपत शंका निर्माण झाली नाही. कारण आता ‘संस्कार’ करण्याची वेळ निघून गेली आहे.

अनुद्‌गार पडताहेत महागात

भाजपच्या अजेंड्यानुसार नगरसेवक, नेत्यांकडून काम करून करता येणार नाही, हे पक्षाला ज्ञात झाले असावे. भाजपचा स्वयंसेवक कसा असतो? नूतन उपमहापौर केशव घोळवे यांच्यासारखा! ‘दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाकिस्तान, चीनमधून फंडिग होत आहे. रोजंदारीने लोक आणले जात आहेत’, असे पक्षातर्फे पसरवणे सुरू आहे. बरोबर असेच विधान महापालिका सभेत घोळवे यांनी चार दिवसांपूर्वी केले. शहरात याची किती तीव्र प्रतिक्रिया उमटते याची ‘लिटमस टेस्ट’ यानिमित्ताने पक्षाने केली. ‘माफी मागेपर्यंत घोळवे यांना महापालिकेत पाऊल ठेवू दिले जाणार नाही’, असा इशारा विरोधी पक्षांनी दिला आहे. मात्र, ते माफी मागणार नाहीत.

इतर ब्लॉग्स