पिंपरी-चिंचवडमधील केविलवाणे राजकारण!

अविनाश म्हाकवेकर | avinash.mhakawekar@esakal.com
Sunday, 20 December 2020

पिंपरी-चिंचवडमधील राजकारणाची स्थिती सध्या केविलवाणी झाली आहे. विशेषत: भाजपमधील! कारण, दहा दिवसांपूर्वीच्या स्थायी समिती सभेत गुरगुरणारे पुढच्याच चार दिवसांत गपगार झाले आणि नंतरच्या सभेत चुपचाप बसले. कसा ‘आदेश’ पाळावा लागला, असे म्हणत स्वपक्षीयांबरोबरच विरोधकांनाही आनंदाच्या उकळ्या फुटल्या.

महापालिकेत सर्वाधिक गाजणारी सभा स्थायी समितीची असते. याचे कारण म्हणजे अर्थकारण. इथे सभागृहाबाहेर अगदी चारचौघात उघडपणे सदस्य आत्मप्रौढीने टक्केवारीविषयी बोलतात-मला किती मिळाले, याला किती मिळाले. नवा सभापती तर पद मिळाल्याबरोबरच ‘मी रेकॉर्ड ब्रेक’ करणार असे म्हणत असतो. प्रत्येक साप्ताहिक बैठक ही चर्चा आणि खिसा अशा दोन्ही अर्थाने गरमागरम होते. यातूनही मन तृप्त झाले नाही की, मग थेट हाणामारीच. महापालिकेची गंगाजळीच इतकी मोठी आहे, की टक्केवारीने लुटले तरी ‘दर्या में खसखस!'

अशा या समितीच्या नऊ डिसेंबरच्या  बैठकीत भाजपद्वयी आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील वादाचा राग माईक, ग्लास, फाइल यांच्यावर निघाला. फोडाफोडी अन् फाडाफाडी झाली. नेत्यांनी सांगितले आणि चेल्यांनी ऐकले, असा हा सारा प्रकार. रस्ता शिवसेना नगरसेवकाच्या प्रभागातील आणि भांडणं भाजपची! विरोधक राहिले बाजूला आणि सत्ताधारीच  आपापसांत भिडले. सगळं अजबच. एकमेकाला जिरवण्यातच यांच्या सत्तेची चार वर्षे संपली. पक्षानेही डोळ्यांवर कातडे ओढून घेतले होते. मात्र, वर्षभरावर आलेल्या निवडणुकीत याचा फटका बसू शकतो, असा साक्षात्कार पक्षाला झाला आणि हिवाळी अधिवेशनानिमित्त मुंबईत आलेल्या दोघांनाही समोरासमोर आणले गेले. तिथे त्यांना उपदेश केला, सल्ला सांगितला की आदेश दिला, हे समजायला मार्ग नाही. मात्र, दुसऱ्या दिवशीची  स्थायी समितीची सभा अगदी चिडीचूप झाली. वाकड रस्त्यावर चर्चा नाही, की आयुक्तांकडून खुलासा मागणे नाही. कोणती चर्चाच नाही. गेल्या चार वर्षांतील ही पहिलीच सभा इतकी शांततेत पार पडली की, शिपाई पाण्याचा ग्लास टेबलवर ठेवतानाही आवाज येत होता. 

इतकी वर्षे राजकारणात असूनही ही मंडळी एखाद्या मंडळाच्या कार्यकर्त्यांसारखे वाद घालत बसलेत याचेच वैषम्य वाटते. वादात कोण जिंकले, हा मुद्दा सध्या तरी गौण आहे. कारण आता वर वर शांत वाटत असले, तरी आतून ते धुमसत असणार. कारण मुंबई भेटीतील त्यांच्या केविलवाण्या चेहऱ्याचे फोटो जाणीवपूर्वक सोशल मीडियावर पसरवून खच्चीकरण केले आहे.

कशासाठी झेंडे फिरवले, फेर धरले?

जसे सत्ताधारी, तसेच विरोधी पक्षही. बिहारमध्ये भाजप जिंकला म्हणून इथल्या मंडळींनी पेढे वाटून जल्लोष केला होता. अगदी तसाच प्रकार पदवीधर व शिक्षक मतदार निवडणुकीत विजय मिळाला म्हणून राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना नेत्यांनी केला. दोन्हीही प्रकार हास्यास्पद. मात्र, या दोन्ही निवडणुकांतील विजयात तुमचे काय योगदान होते? बिहारला जाऊन घराघरांतून मतदार बाहेर काढलेत, की पिंपरी-चिंचवडमधील पदवीधर व शिक्षकांना हाताला धरून मतदान केंद्रांपर्यंत नेले? स्वत:च अंगावर गुलाल उधळून घ्यायची सवय जडलेली आहे. सरकार स्थापनेपूर्वी एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढणाऱ्यांनी, पत्रकबाजी करणाऱ्यांनी फुगड्यांचा धरलेला फेरही केविलवाणा होता. फोटोसेशन झाले आणि सर्व आपापल्या दिशेने मार्गस्थ झाले.

साऱ्यांनाच फुटला आहे कंठ

विद्यमान नगरसेवकांसह अनेक इच्छुकांना आगामी निवडणुकीमध्ये नगरसेवक व्हायचे आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांविषयी या साऱ्यांनाच कंठ फुटलेला आहे. प्रत्येकालाच रस्ते, भुयारी मार्ग, पुतळे, पार्किंग, रखडलेली कामे, ठेकेदारांचा नालायकपणा, भ्रष्टाचार दिसू लागला आहे. दररोज पाच-सहा पत्रके प्रसिद्धिमाध्यमांच्या कार्यालयात पोहोचू लागली आहेत. मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानांपर्यंत आणि आयुक्तांपासून विविध महामंडळांच्या अधिकाऱ्यांपर्यंत पत्रे जाऊ लागली आहेत. मीच कसा जनतेचा कैवारी, हे दाखवण्याचे प्रयत्नही केविलवाणे आहेत. चार वर्षे भूमिगत असलेले आता निवडणुकीसाठी बाहेर आले आहेत. श्रेयवादासाठी झटू लागले आहेत. यातूनच निगडी उड्डाणपुलाची दोन उद्  घाटने केली, हरीण पार्कसाठी एकाने पत्रके काढली, तर दुसऱ्याने पत्रकार परिषद घेतली... लोगों को कुछ पता नही, असं कसं होईल?

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या