Badminton Champion : राज पटेलच्या निमित्ताने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RAJ PATEL

Badminton Champion : राज पटेलच्या निमित्ताने

रविवार, १८ सप्टेंबर २०२२ चिकोत्रा नदीच्या उगमाच्या दिशेने सावंतवाडीच्या वरच्या अंगाच्या जंगलात शिरलो होतो. चढ-उतारांच्या वाटा, आडवी पडलेली झाडे, ओल्या वाटांवरील जळवा, प्रवाहातले शेवाळलेले निसरडे दगड या साऱ्यांना सलाम करीत त्यांच्याच आधाराने वाटचाल सुरू होती. निसर्ग यात्रेतून बाहेर आलो तेव्हा साऱ्या दऱ्याखोऱ्या, पठारं अरण्यासह ठार अंधारात बुडून गेल्या होत्या. हळूहळू मोबाईलना जाग येऊ लागली आणि ते बोलू लागले. त्यावरील एका ओळीने मात्र अस्वस्थ करून टाकलं… ‘‘सातारा मॅरेथॉनदरम्यान कोल्हापूरच्या तरुण धावपटूचा दुर्दैवी मृत्यू’’ कोण हा धावपटू? राज पटेल? आमच्या जिवश्चकंठश्च मित्रांच्या परिवारातीलच एक, नव्या पिढीचा उमदा प्रतिनिधी. महत्त्वाकांक्षी धडपड्या तरुण.

शारीरिक क्षमतेचा कस पाहणाऱ्या विश्वात त्याचा सतत सहभाग. गेल्या काही वर्षांत अशा कस पाहणाऱ्या मोहिमांमध्ये साधनांची मुबलक उपलब्धता आणि त्याचबरोबर होणारे अपघात आणि मृत्यूंचे वाढते प्रमाण या बातम्यांनी अस्वस्थ व्हायला झालं, हे असं अधिक प्रमाणात का घडू लागलंय? या विचारानं मनात ठाण मांडले.

पूर्वतयारीपासून प्रत्यक्ष सहभागापर्यंत सर्व विचारपूर्वक आणि निसर्ग संकेतानुसार केलं पाहिजे, या विचारांवर मन ठाम झालं. अशा घटनांचा विचार एकांगी करून चालणार नाही. तो व्यक्ती -कृती -संयोजन-निसर्ग असा सर्वच बाजूंनी करायला हवा. शारीरिक क्षमतेचा कस लावणारे असे उपक्रम मग ते गिर्यारोहण असो, दुर्गभटकंती असो., धावस्पर्धा असो हे सर्व निसर्गाधीनच असतात. निसर्ग हाच त्यांच्या केंद्रस्थानी असतो. नेमकं आपल्या क्षमतांचं आणि मर्यादांचं भान की ज्यात वैद्यकीय अंग आणि सल्ला अंतर्भूत होतो.

हल्ली या सर्व गोष्टींना एकत्रित फिटनेस असं गोंडस नाव दिलं जातं; परंतु सुमारे साडेचार दशकांच्या या क्षेत्रातील अनुभवावरून सांगतो की वैद्यकीय फिटनेस म्हणजे कोणत्याही ऋतूत, वातावरणात कोणत्याही धाडसी उपक्रमासाठी आपले शरीर कसेही आणि कुठेही वापरण्याची मुभा आहे.

निसर्गाच्या बदलणाऱ्या अवस्थांबरोबर शरीराच्याही क्षमता बदलत असतात आणि हे संतुलन साधूनच धाडसी उपक्रम आखावेत आणि त्यात सहभागही घ्यायला हवा. सदासर्वकाळ सर्व ऋतूंत वैद्यकीय फिटनेस तोच असतो आणि मी फिट आहे, मला काहीही होणार नाही, हे गृहीत धरून चालणे योग्य नाही. अशा आयोजनांची सर्व वयोगटाच्या व्यक्तींमध्ये अशा प्रकारच्या धाडसी उपक्रमांचे एक विचित्र आकर्षण निर्माण झाले आहे.

कोणीही उठावं, आकर्षक जाहिरातबाजी करावी आणि ते पाहून सहभागी व्हावं, असं चक्रच सुरू आहे. अर्थात काही संस्था अत्यंत शिस्तबद्ध, शास्त्रोक्त आयोजन करत असतातच. सहभागी होताना सर्व बाबींचा बारकाईने विचार करा. आयोजक संस्था नोंदणीकृत आहे की नाही? संस्थेचा पूर्वानुभव काय? टीम लीडर्स प्रशिक्षित आहेत की नाही? आदी गोष्टींचा बारकाईने विचार केल्यास धोके कमी होऊ शकतात. उत्तम ट्रेकर बनणे, क्षमतेचा धावपटू बनणे, चांगला गिर्यारोहक बनणे ही एक प्रक्रिया आहे.

त्यासाठी क्षमतेच्या आणि सरावाच्या पायऱ्या चढाव्याच लागतात. अनुभव यावा लागतो, निसर्ग अनुभवावा लागतो, त्यांच्याशी मैत्र जुळवावं लागतं. मग तोच तुमचा रक्षणकर्ता बनतो, ऊर्जा भरतो. या सर्व विषयांचे शास्त्रोक्त प्रबोधन करणारी विशेष कार्यशाळा मैत्रेय प्रतिष्ठानतर्फे आयोजित केली होती. त्यात तज्ज्ञ वैद्यकीय आपत्कालीन सेवा तज्ज्ञांचा, अनुभवी गिर्यारोहकांचा, क्षमतावान धावपटूंचाही सहभाग होता.

अशा कार्यशाळांचे व्यक्ती आणि संस्थांसाठी सातत्याने आयोजन आवश्‍यक आहे. राजचे केवळ व्यक्तिगत जाणे एवढ्यापुरता हा विषय मर्यादित नाही. त्याच्याबरोबर एका पिढीची गुणवत्ता, आशा-आकांक्षा, झेप, संशोधन, प्रगती हे सारं काही संपून जातं, हा खरा धक्का आहे. सर्व काळजी घेऊनही काहीच अघटित घडणार नाही, असं कधीच शक्‍य नाही; परंतु किमान योग्य ती काळजी घेऊन, सतर्कता दाखवून अशा धाडसी उपक्रमातील धोके कमी करण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया. ही त्याला खरी आदरांजली ठरेल.

आयआयटी रँकर ते बॅडमिंटन चॅम्पियन

राजचा जन्म १९९१ मधील. त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण छत्रपती शाहू विद्यालय, तर महाविद्यालयीन शिक्षण स्वामी विवेकानंद महाविद्यालयात पूर्ण केले. २००८ मध्ये आयआयटीमध्ये प्रवेश मिळविताना २४३१ रॅंक त्याने पटकावली. बी. टेक/ एम. टेक पदवी त्याने २०१३ मध्ये मिळवली. आयआयटी पूर्ण करीत असताना Inter IIT Badminton स्पर्धेत सलग चार वर्षे सहभाग नोंदवत दोनदा सुवर्ण पटकावले होते. आयआयटी पदविका पूर्ण केल्यावर अनुभवासाठी SRF Ltd व RCF मध्ये दोन वर्षे काम केले.

- डॉ. अमर अडके, दुर्गअभ्यासक