काय मिळत असतं त्यांना? 

best thoughts for helping others
best thoughts for helping others

वेड घेऊन जगणारी माणसंच खरं जगतात. विहिरीत दोर टाकून, अनवाणी पायानं माठ भरणारा अज्ञात पाणी देत नसतो केवळ; तो तर "देत राहावं' या संस्कृतीचा दूत असतो... या अशा दूतांनीच, ओलाव्यांनीच प्रवासी सुखावतात... काय मिळत असतं त्यांना? 

रणरणत्या उन्हात, दूरवरच्या विहिरीतून पाणी आणून अनवाणी पायांत काटे रुतत असतानाही रस्त्यावरच्या तांबड्या, काळ्या माठात दुसऱ्यांसाठी पाणी देणाऱ्यांना काय मिळत असतं? 

हेच माठ, भांडी जवळच्याच दगडाने फोडून निघून जातात काही पुढे... हसत-हसत... त्यांनाही काय मिळत असतं? फुटलेले माठ पुन्हा भरता येत नसतात, तरीही पुन्हा नवे माठ आणून, "तहान भागू दे दुसऱ्याची! सगळीच माणसे वाईट नसतात,' असं म्हणून पुन्हा विहिरीत दोर सोडणाऱ्यांना नेमकं काय मिळत असतं? घराचे पाश रात्रीत सोडवून उगवतीकडे प्रवास करत करत, जंगल दऱ्याखोऱ्यातून भटकत भटकत जाणाऱ्या जिप्सींना काय लाभतं... तसंच खोलीची खिडकी श्रावणातही न उघडता, आढ्याकडे बघत जीवन जगण्याची स्वप्ने बघणाऱ्यांना काय मिळतं? 

तसं सगळंच अज्ञात, अद्‌भुत, अनोळखी. हिमालय. अपरिचित. दुखऱ्या नसा सांभाळत, पुढचं पाऊल पुन्हा अज्ञाताकडे टाकणारा साधू विरक्त असतो; पण त्याला काय मिळतं अंतिमतः? 

आयुष्याची मिळकत सारी, क्षणात एखाद्या जुगारात घालविणारा आणि पुन्हा नशिबाला कौल लावून, पुन्हा कधीतरी जिंकेन, या विश्‍वासानं उभारी घेण्याची तयारी करणारा- काय मिळतं त्याला? 

फसत जातात प्रयोग. चुकत जातात निरीक्षणं- आखाडे, अंदाज. अनुभव-ज्ञान-मेहनत यश देत नाही. तरीही रात्री-अपरात्री प्रयोगशाळेत अस्वस्थ येरझाऱ्या मारणाऱ्या संशोधकाला एक नवी संधी खुणावत असते. जणू हे शेवटचं दार. 

पुन्हा नवी समीकरणे- नवे तत्त्व - पुनःपुन्हा अपयश... तरीही प्रयोगशाळा सुटत नाही, शेवटपर्यंत- का असं असतं? बोटाच्या पेराएवढ्या पोस्टाच्या तिकिटासाठी, मैलोमैल प्रवास करून, परभाषा, परदेशात जाऊन ते तिकीट संग्रहात चिकटवून, असे संग्रह कपाटभर साठवून, धुंदीत जगणाऱ्या संग्राहकांना कशाचा आनंद असतो? 

ही यादी थांबेल? अशी वेड घेऊन जगणारी माणसंच खरं जगतात. विहिरीत दोर टाकून, अनवाणी पायानं माठ भरणारा अज्ञात पाणी देत नसतो केवळ; तो तर "देत राहावं' या संस्कृतीचा दूत असतो... या अशा दूतांनीच, ओलाव्यांनीच प्रवासी सुखावतात. प्राणी-पक्षी-किडा-मुंगी जगण्याची साखळी घट्ट करतात... 
दर्यावर्दी खलाशी जमिनीवर बेचैन असतो. सगळी सुखं जमिनीवर मिळतात... हा भ्रम असतो आपला. त्या दर्यावर्दीला हवं असतं बेभान, न ठरलेलं, आव्हानांनी फडफडणारं शीड. ते कुठं असणार? 

कुटुंबीयांचा दरवेळी निरोप घेताना, त्याच्या भावना काय फक्त कर्त्या पुरुषाच्या असतील? पाऊल घराबाहेर पडताच, समुद्राचा आवाज ऐकण्यासाठी त्याची उत्सुकता- त्याला समुद्राचाच भाग बनविते... त्याला हवं ते धाडस, त्याची रग, जिज्ञासा, सर्व पूर्ण करतो- समुद्र! त्याला म्हणजे समुद्राला काय मिळतं? त्याला एक जिवंत चैतन्य मिळतं. दर्यावर्दी जगणं! अथांग समुद्रात नाव पुढे नेणारी एक मानवी जिद्द. वादळातून, लाटांतून बुद्धी- अल्पशक्ती यातून पुढं गेलेली चैतन्यरेषा. 
समुद्राला केवळ नद्याच समृद्ध करत नाहीत... समुद्रावर प्रेम, राग, लोभ, माया करणारे लाखो खलाशी- कोळी - आपल्या ऊर्मी, भावना, वासना, प्रेम यांच्या ओंजळी त्याच पाण्यात विसर्जित करतात- पण पुढे जातात... समुद्र आपला समजून! समुद्राला असे मित्र आवडतात... 

वेड वेगाचं असतं, भोगाचं असतं, त्यागाचं... 
गावात आलेल्या सर्कशीसोबतच सर्कसचा, त्या वातावरणाचा भुलैय्या आवडून, हत्ती, वाघ, उंट, पोपट यांच्या पिंजऱ्यामागे पावलं टाकणारे... जगभर फिरून येतात... ते पगार - कष्ट - मान-अपमान या पलीकडे जातात... त्या मुक्‍या प्राण्यांची काळजी, प्रेम-स्पर्श यात त्यांचे आयुष्य असते... आवडत्या प्राण्याचा मृत्यू झाल्यावर, त्याला पुरल्यानंतर डोळ्यांत येणारं पाणी... दर्यावर्दी खलाशाला भुलवणाऱ्या समुद्राइतकंच खारट असतं! 

अज्ञात खजिने शोधण्यासाठी पहाडात जिंदगी खर्चणाऱ्याला खजिन्याची विरक्ती येतच असेल... पण दुसरं कोणतंच आव्हान इतकं महत्त्वाचं न वाटल्यानं, किंवा खजिना असा मिळत नसतो हे अंतर्मनाला पटलं तरी, कुदळीवरील त्याची पकड सैल कशी होईल? 

ताकद संपेल. डोळ्यांतील स्वप्ने हरवतील... खजिना न शोधता, जेव्हा तो परतेल. निष्कांचन - वृद्ध - थकलेला... पराभूत... एकटा... तेव्हा मायेचे पाश शोधेल... प्रवास करून, दरमजल करून... गावाकडे वळेल... पाय ओढत... जीर्ण कपड्यानिशी, तेव्हा रणरणत्या उन्हात कुणीतरी भरून ठेवलेला थंड पाण्याचा माठ त्याची तहान भागवेल.. डोळ्यांत विझत गेलेला प्रकाश क्षणभर उजळेल... 

खजिने हे असेच सापडत असतात. 
प्रवास थांबवायचा नसतो... 
""काय मिळतं त्यांना?'' हे प्रश्‍न उरत नाहीत मग! 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com