शैक्षणिक स्‍पर्धेत टक्‍केवारीपासून सावधान..!

प्रशांत लाड
मंगळवार, 19 मे 2020

वाढत्या स्पर्धेमुळे आपण फार व्यवहारी बनलो. अभ्यासक्रमात असणाऱ्या मूल्यांपेक्षा गुणांना जास्त महत्व प्राप्त झाले. आम्हाला ज्ञानेश्वर 10 मार्कला आहेत. विवेकानंद आठ मार्कांना आहेत, असे आपण म्हणू लागलो. सत्वापेक्षा अस्तित्वाला महत्व प्राप्त झाले. आपल्या मुलांना असणारी टक्केवारी हा सोशल स्टेटसचा भाग बनला. माणसापेक्षा आकडे मोठे झाले आणि यात कोठेतरी आपण निरागस जगण्याचा आनंद हिरावून बसलो. 

मागील 15-20 वर्षात शिक्षण क्षेत्रात अनेक बदल झाले. या बदलाचे अनेक सकारात्मक व नकारात्मक परिणाम समाज जीवनावर झाले. जगात क्रांती घडवायची असेल तर शिक्षणासारखे दुसरे प्रभावी अस्त्र नाही. स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाची सुंदर व्याख्या आपल्याला सांगितली. शिक्षण म्हणजे अशी प्रक्रिया की ज्यामुळे चारित्र्य घडते, मन:शक्ति वाढते, बुद्धिमता धारधार होते आणि या सर्वांमुळे माणूस स्वत:च्या पायावर उभा राहू शकतो. तो परिपूर्ण माणूस बनतो. पण, काळाच्या ओघात ही व्याख्या मागे पडली. वाढत्या स्पर्धेमुळे गुणांना महत्व प्राप्त झाले. मूल्ये आणि गुण या लढाईत गुण नेहमीच विजयी होऊ लागले. 

शिक्षण क्षेत्रात काम करून आज जवळ जवळ 20-22 वर्षे पूर्ण झाली. दहावी, बारावीचे निकाल लागले की अनेक पालक मार्गदर्शनासाठी बोलावतात. मागील वर्षी एका नातेवाईकांकडे जाण्याचा असाच एक प्रसंग आला. मुलाला दहावीला 72 टक्‍के मार्क पडले होते. घरचे वातावरण एकदम गंभीर होते. सुरवातीला मला वाटले की शासनाने कदाचित यावर्षीपासून उत्तीर्ण होण्यासाठी 75 टक्‍के गुण आवश्‍यक केले असावे. त्यामुळे मुलगा नापास झाल्यासारखे घरचे वातावरण गंभीर असावे. परिस्थितीचा अंदाज घेतला असता लक्षात आले की मुलाला मार्क कमी पडल्यामुळे पालक नाराज होते. त्यांनी मुलाला 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मार्क पडतील अशी अपेक्षा केली होती व मार्क कमी पडल्यामुळे पालक नाराज होते. याच्या सर्व मित्रांना 80 टक्‍क्‍यांपेक्षा पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. आता पुढे काय करायचे, याचे कसे होणार, या चिंतेने त्यांना ग्रासले होते. एकूण आशय माझ्या लक्षात आला. 

पगाराचे पाकीट हरविलेल्या माणसाला खरंतर "पाकीट कसं सांभाळावे' या सल्ल्यापेक्षा त्या महिन्याचा खर्च चालविण्यासाठी "पैसे कसे उभारावेत' याची गरज जास्त असते. हे तत्व सल्ला देताना नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. 
मी प्रथम त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की, तुमच्या मुलाला मिळालेले गुण छान आहेत. तुम्ही इतरांशी तुलना न करता या गोष्टीकडे बघा. आम्ही आमच्या सनबीम (सी-डॅकचे अधिकृत प्रशिक्षण केंद्र) या संस्थेमध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षणाचे विविध प्रगत असे अभ्यासक्रम चालवितो. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जवळ-जवळ 98 टक्‍के विद्यार्थ्यांना आमच्या प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकऱ्या मिळतात. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नावाजलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या प्लेसमेंटसाठी येतात. त्या कंपन्याच्या काही अटी असतात. दहावी, बारावी व इंजिनिअरिंगचे मार्क 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असले पाहिजेत ही प्राथमिक अट असते. 70 किंवा 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त अशी अट नसते. हे मी तुम्हाला बरं वाटावे म्हणून सांगत नाही. प्लेसमेंटसाठी आलेल्या बऱ्याच कंपन्या या बहुराष्ट्रीय कंपन्या असतात. त्यामुळे कमीत कमी 60 टक्‍के गुण असणे, हे जगाने मान्य केलेले तत्व आहे असे समजायला हरकत नाही. बऱ्याच वेळा 65 टक्‍के मार्क असणारा विद्यार्थी मुलाखत चांगली दिल्यामुळे नोकरीसाठी निवडला जातो व 75 टक्‍के असणारा विद्यार्थी मुलाखत चांगली न दिल्यामुळे नाकारला जातो. 

हे सर्व ऐकून त्यांना बरं वाटले. मनावरचा ताण कमी झाला. 15 दिवसांनी परत त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. आता वातावरण बरेच बदलेले होते. मागच्यापेक्षा वातावरण बरेच प्रसन्न होते. मागच्या वेळीस फक्त कॉफी मिळाली होती. आज कॉफीच्या अगोदर गरमा- गरम कांदेपोहे आले होते. त्यानंतर पाच-सहा महिन्यांनंतर गाठ पडली तेव्हा समजले की मुलाने कॉलेजला प्रवेश घेतलाय. खूप जोमाने व उत्साहाने अभ्यास सुरू आहे. ऐकून फार आनंद झाला. निरागसपणे वाहणाऱ्या एखाद्या झऱ्याच्या प्रवाहात एखादा छोटासा दगड यावा व त्यामुळे त्याचे निरागस वाहणे तात्पुरते खंडित व्हावे व तो दगड काढण्याचे भाग्य आपल्याला मिळावे व झऱ्याचा प्रवाह पुन्हा पूर्ववत व्हावा यासारखा दुसरा आनंद नाही. 

ही घटना आपल्याला खूप काही सांगून जाते. यात दोष कुणाचा? मुलांना चांगले गुण मिळाले पाहिजेत याबाबत खरंतर कुणाचेही दुमत असणार नाही. पण चांगले म्हणजे किती हे आपण ठरवले पाहिजे. यात दोष कुणाचाच नाही. वाढत्या स्पर्धेमुळे आपण फार व्यवहारी बनलो. अभ्यासक्रमात असणाऱ्या मूल्यांपेक्षा गुणांना जास्त महत्व प्राप्त झाले. आम्हाला ज्ञानेश्वर 10 मार्कला आहेत. विवेकानंद आठ मार्कांना आहेत, असे आपण म्हणू लागलो. सत्वापेक्षा अस्तित्वाला महत्व प्राप्त झाले. आपल्या मुलांना असणारी टक्केवारी हा सोशल स्टेटसचा भाग बनला. माणसापेक्षा आकडे मोठे झाले आणि यात कोठेतरी आपण निरागस जगण्याचा आनंद हिरावून बसलो. 

आपण मुलांवर केलेले हे टक्केवारीचे संस्कार इतके खोलवर रुजतात, हे आपल्या लक्षातच आले नाही. आपल्याला भविष्यातही याचे परिणाम जाणवतात. या टक्केवारीमुळे नव्याने बांधलेले रस्ते एका पावसात खराब होतात. नव्याने बांधलेले पूल चार- पाच वर्षाच्या आतच पडतात. आपण यंत्रणेला दोष देतो. पण इतरांकडे एक बोट दाखविताना चार बोटे आपल्याकडे असतात हे आपण सोयीस्करपणे विसरतो. आपणही थोड्या प्रमाणात का होईना याला जबाबदार आहोत याचा विसर पडला. 

या टक्केवारीच्या भूतांना आपण वेळीच आवर घातला पाहिजे. नाहीतर ही भूते आपल्यापुढे फेर धरून नाचू लागतील. माणसापेक्षा आणि माणुसकीपेक्षा मानवी जीवनात आम्हालाच कसं जास्त महत्व आहे असे आपल्याला ओरडून सांगतील. त्यांचे ते सगळे शांतपणे सहन करण्यावाचून दुसरा पर्याय आपल्यापुढे नसेल. आकडे हे जीवनातले वास्तव सांगतात हे खरे असले तरी त्यांनी मानवतेचा गळा दाबला नाही पाहिजे हेही तितकचं खरं. शिक्षणक्षेत्रातच नाही तर आज प्रत्येक क्षेत्रात हे असेच झालंय. जपमाळ किती झाली याची नोंद आपण ठेवतो पण वृती किती सात्विक झाली याचे मोजमाप केले जात नाही. म्हणून टक्केवारीपासून सावधान..! 

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या